Homeपब्लिक फिगरराष्ट्रपतींचा खरा अपमान...

राष्ट्रपतींचा खरा अपमान काँग्रेसकडूनच!

ज्या राष्ट्रपतींचा उल्लेख यांच्या नेत्यांनी राष्ट्रीय पत्नी, असा करून अपमान केला, ज्या काँग्रेसने राष्ट्रपतींच्या पहिल्या भाषणावर बहिष्कार घातला, आणि आता याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर, एका आदिवासी महिलेवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी काल एका पत्रकार परिषदेत केली.

याच नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. या निमित्ताने राष्ट्रपतींच्या अपमानाचा राग आळवणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी मुर्मू यांना बिनविरोध निवडून येण्यासाठी का पुढाकार घेतला नाही, का त्यांच्यासमोर आपला उमेदवार दिला, असा सवाल त्यांनी केला. संसद भवन हे लोकशाहीचे प्रतीक आहे. भारत किती मोठा प्रगतीशील देश आहे हे दाखवण्याची ही संधी आहे. ती नाकारताना पंतप्रधानांना हुकूमशहा म्हणायचे कितपत योग्य आहे? इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी लादली गेली. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात डांबले गेले. याला म्हणतात हुकूमशाही… आज जर देशात हुकूमशाही असती तर संजय राऊत, त्यांचे मालक, त्यांची मुलं जेलमध्ये असती. पत्रकार मनाला येईल ते लिहू शकले नसते, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जितके बाळासाहेब ठाकरे समजले, त्यांनी जितका त्यांचा आदर केला, तितका आदर तुमच्या मालकांनी तरी केला का? माझा बाप चोरला.. माझा बाप चोरला.. असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत आपल्या वडिलांचे स्मारक तरी बांधले का? देशातल्या तमाम हिंदूंचे राजकीय प्रेरणास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान फक्त आपल्या बापापुरता मर्यादित करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. जे उद्धव ठाकरे अडीच वर्षात आपल्या वडिलांचे स्मारक उभारू शकले नाही त्याचठिकाणी पंतप्रधान मोदींनी देशाला अभिमान वाटेल अशी नव्या संसद भवनाची वास्तू उभी केली, असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी काय केले? आपल्या कुटुंबासाठी काय केले? एक गोष्ट दाखवा. तुम्ही ज्या सरकारला, ज्या मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य म्हणता, त्याच मुख्यमंत्र्यांकडे एमएमआरडीए खाते आहे आणि त्याच खात्याकडून तुमच्या वडिलांचे स्मारक बांधले जात आहे. तुम्हाला किंचितसा जरी स्वाभिमान असेल तर हे स्मारक मी सरकारच्या नाही तर स्वतःच्या पैशाने बांधीन, असे जाहीर करा, असे आव्हान त्यांनी दिले. या स्मारकाच्या ठिकाणी म्हणजेच जुन्या महापौर निवासात रात्रीच्या वेळी तुमचा मुलगा, भाचा आणि त्यांची नाईट लाईफ गॅंग कुठची गाणी वाजवतात, त्याचे व्हिडिओ दाखवू का? ही पवित्र वास्तू आहे ना… मग इथे घाणेरडे प्रकार होतात कसे, असा सवालही त्यांनी केला. बाळासाहेबांचे हे स्मारकच नाही तर त्यांचे स्मृतिस्थळाचा खर्चही मुंबई महापालिका करते. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथीनिमित्त होणारे कार्यक्रम हेही मुंबई महापालिकेकडूनच आयोजित केले जातात. हे एक पैसा खर्च करत नाही. मग कर्जतच्या फार्म हाऊसवर उभारलेल्या २०००च्या नोटांचा कारखाना काय कामाचा, असे ते म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर हेच उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही नाती जपतो. त्यांचे हे शब्द किती हास्यास्पद आहेत हे त्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना आणि त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना माहीत आहे. नारायण राणे यांना मारण्याची सुपारी यांनीच दिली. राज ठाकरे यांचा वारंवार अपमान यांनीच केला. यांच्या बंधूंनी न्यायालयाचे प्रतिज्ञापत्रे दिली आहेत ती वाचली की यांनी नाती कशी जपली, हे सर्वांना समजून येईल. यांनी नाती फक्त पाटणकर आणि सरदेसाईबरोबरच जपली. याच उद्धवजींनी केजरीवाल यांचा उल्लेख राजकारणातील राखी सावंत असा केला होता. मग ता आम्ही काय म्हणायचे, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

ज्या कामांचे भूमिपूजन आम्ही करतो, त्यांचे उद्घाटनही आम्हीच करतो. ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. त्यांचे विचार आहेत आणि संस्कार आहेत. कोविडचा काळ जो उद्धवजींना फार आवडतो, त्यावेळी तयार झालेले कोविड यु टी आणि कोविड ए यु, हे व्हायरस आम्ही एकनाथ शिंदे नावाच्या व्हॅक्सिनने कायमचे संपवले आणि संपूर्ण महाराष्ट्र या व्हायरसपासून मुक्त केला, असेही ते म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content