Homeकल्चर +चीनची औद्योगिक व...

चीनची औद्योगिक व आर्थिक प्रगती प्रशंसनीय..

चीन हा भारताचा अगदी शत्रू क्रमांक एक असल्याचे मानले तरी त्यांनी औद्योगिक आणि आर्थिक आघाडीवर जी बाजी मारली आहे, त्याबद्दल चीनची प्रशंसा करायलाच हवी आणि शिकायलाही हवे, असे मत मेजर जनरल नीतिन गडकरी (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन संवादामध्ये मेजर जनरल नीतिन गडकरी (निवृत्त) बोलत होते. भारतातील सोशल मीडियाच्या शस्त्राला कसे रोखावे, या विषयावरील एका महत्त्वपूर्ण संवादात त्यांनी खूप मोलाची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ही संवादवजा मुलाखत घेतली. मुलाखतीचा हा दुसरा भाग होता. महाजन यांनी विविधांगी प्रश्न विचारले.

२५ वर्षांपूर्वी चीनने गावांमध्ये शाळा तयार केल्या. त्यामुळे गावांमधून लेबर फोर्स शहरात आला आणि त्याचा फायदा त्यांना कुशल कामगार मिळण्यात वा तयार करण्यात झाला. भारतात काय आहे तर गावात शिक्षण नाही, स्कील लेबर नाही, सक्षम कामगार नाही. सर्वोत्कृष्ट कुशल कामगार शहरात आहेत. गावात नाहीत. चीनमध्ये ते तयार केले गेले. त्यामुळे हा घटकही मोठा महत्त्वाचा आहे. साधे कारण असले तरी पण तितकेच महत्त्वाचे आहे. मेक इन इंडियासाठी हे लक्षात घेणे नक्कीच गरजेचे आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचे धोरण हवे

सोशल मीडिया झपाट्याने बदलत असून त्याची व्याप्तीही मोठी आहे. या माध्यमाची व्याप्ती असली तरी त्यातवर कोणाचे नियंत्रण नसल्याने त्यातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला, अफवांना बळी पडता कामा नये. त्याबाबत सावध राहिले पाहिजे. हे एक दुधारी शस्त्रच असून लोकप्रियता विशेष करून सवंग लोकप्रियता हा त्या माध्यमाच्या यशाचे गमक झाले आहे. मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला धोरण आणावे लागेल, आर्थिक तरतूदही त्यासाठी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

या सोशल मीडियामध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप असे विविध घटक येतात. लोकांना काय आवडते यावर हे सोशल मीडियाचे प्रकार असून त्यावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे. हे त्यामुळे एक प्रकारचे शस्त्रच झाले आहे. प्रिंट मिडियासारखे जबाबदारीने बोलणारे वा जबाबदारी घेणारे येथे कोणीच नसते. त्यामुळे अफवा वा खोट्या बातम्यांना बळी पडणे हे प्रकार होतात. त्यात मिळणाऱ्या लाइक्सवर ही लोकप्रियता अवलंबून राहाते. विचार डावा असो वा उजवा त्यात सुधारणावादी विचारांना मात्र येथे विचारातही घेतले जात नाही. लोकांची मते, दृष्टिकोन विभाजित करणे व दुही पसरवणे हीच संकल्पना येथे निर्माण झाली आहे. ही बाब सोशल मीडियाला शस्त्रासारखे स्वरूप देणारी ठरली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

चीन, पाकिस्तान व युरोपातील माहिती

चीन, पाकिस्तान वा युरोपातीलही देशातील प्रिंट मीडियावरील व सोशल मीडियावरील बातम्या, माहिती यामुळे हे सर्व शस्त्रीकरणच चालले आहे. त्यांना योग्य उत्तर देणे, त्वरेने खोटेपणा उघड करणे गरजेचे आहे. परदेशातील सामाजिक प्रसारमाध्यमांमधील, प्रिंट मीडियामध्ये भारतविरोधी बातम्या वा माहिती प्रसिद्ध होते. त्यांना उत्तर त्यांच्या स्पर्धक माध्यमातून देता येऊ शकते. उत्तर देण्याचे ते प्रमाण वाढवायला हवे. मुळात हे प्रकार थांबणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.

चीनचे कच्चे दुवे

चीनचेही कमकुवत घटक आहेत. त्यावर लक्ष ठेवायला हवे. त्यांचे राजकीय कच्चेदुवे आहेत. मुळात चीनच्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ या सत्ताधारी पक्षाला नियंत्रित करणारे शी जिन पिंग हे एकमेव असून अंतर्गत विरोधकांनाही त्यांनी त्यामुळे रोखून ठेवले आहे. त्यामुळे तेथील त्यांच्या विरोधकांना फोडणेही सोपे नाही. त्यांची टर्म दोन वेळा पूर्ण करता येते. ती आता २०२२मध्ये पूर्ण होईल. मात्र त्यांना पद व अधिकार सोडावयाचे नाहीत. अद्याप त्यांनी वारसदारही घोषित केला नाही. ते कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा झाले आहेत.

त्यांनी सत्तेवर येताच भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधकांना तुरुंगात टाकले होते. तेथील रचनेबद्दल भारतातील एका पत्रकारानेही चीनमधील आपल्या कामानंतर परतल्यावर पुस्तक लिहिले आणि त्यात अभेद्य भिंतीसारखे तेथील मंत्री व कम्युनिस्ट पार्टीचे नेते एका विलगीकृत भागात राहात असल्याचे लिहिले होते. आता सत्तासंघर्ष तेथे होईल तेव्हाच काय त्या पक्षाच्या ढाच्यावर परिणाम होऊ शकेल.

जी-७मध्ये होणार केवळ रोडमॅप

जी-७ राष्ट्रांच्या परिषदेवर तसेच चीनविरोधात असलेला वेस्टर्न युरोपातील संताप आदी बाबींच्या प्रतिक्रिया तेथे पडणार आहेत. त्यामुळे चीनला काही ना काही प्रकारे शिक्षा मिळाली पाहिजे असे त्यांना वाटते. मात्र त्यातील निर्णय रोडमॅपसारखे असतील. महामारीचा आढावा घेत विचार होईल. तशी चर्चा होईल आणि नंतर भविष्यात चीनमधून उद्योग हलतील. ते दक्षिण आशियात हलतील हे नक्की. मात्र हे त्वरेने होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content