कमी वजनाच्या तसेच जन्मतः जीविताला धोका असणाऱ्या नवजात बालकांमध्ये मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुग्धदानाचे योगदान अतिशय मोलाचे ठरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय रूग्णालयाच्या प्रयत्नांमुळे मागील पाच वर्षांमध्ये १० हजारांहून अधिक नवजात बालकांना दुग्धदानाचा मोलाचा फायदा झाला आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत ४३ हजार ४१२ मातांनी स्वेच्छेने दुग्धदानाचे कर्तव्य बजावले आहे.
या रूग्णालयातील मातृ दुग्ध बँकेमुळे अनेक नवजात बालकांना जन्मानंतर मातृदूध मिळवून देणे शक्य तर झाले आहेच मात्र, त्याहीपुढे एक पाऊल टाकत आता या रूग्णालयाची मातृदुग्ध बँक पश्चिम भारतात नव्याने होऊ घातलेल्या मातृदुग्ध बँकांच्या उभारणीसाठीदेखील सहकार्य करत आहे.
नवजात बालकांना जन्मानंतर सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असे मातृदूध पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेचा आदर्श घेऊन अधिकाधिक राज्यांना तसेच महाराष्ट्रातील इतर रूग्णालयांना मातृदुग्ध बँक निर्मितीसाठी मदत करण्याचे कार्यदेखील यानिमित्ताने करण्यात येत असल्याची माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
जन्मतः पुरेशी वाढ न झालेल्या तसेच कमी वजनाच्या बालकांना या रूग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (निओनॅटल इन्टेसिव्ह केअर युनिट) मातृदुग्ध बॅंकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो. रूग्णालयात दरवर्षी सरासरी १० हजार ते १२ हजार बालकांचा जन्म होतो. त्यापैकी १५०० ते दोन हजार नवजात बालकांना या मातृदुग्ध बॅंकेच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो.
गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण ५१ हजार २१४ मातांचे दुग्धदानासाठी समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी ४३ हजार ४१२ मातांनी दुग्धदान केले. या दुग्धदानातून सुमारे ४ हजार १८४ लीटर दूध जमा झाले. कमी वजनाच्या तसेच पुरेशी वाढ न झालेल्या एकूण १० हजार ५२३ नवजात बालकांना या मातृदुधाचा पुरवठा करण्यात आला. ज्या मुलांचे वजन जन्मतःच कमी असते त्यांना अथवा पुरेशी वाढ न झालेल्या बालकांना या दुधाचा पुरवठा करण्यात येतो. तसेच प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे बाळाला दूध न पाजू शकणार्या तसेच कमी दूध असणाऱ्या मातांच्या बाळाला हे दूध पाजण्यात येते.
मातृदुग्ध बँकेसाठी लोकमान्य टिळक रूग्णालय पश्चिम भारतासाठी विभागीय सल्लागार केंद्र (झोनल रेफरन्स सेंटर) म्हणून २०१९पासून कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासकीय तसेच खासगी रूग्णालयाच्या ठिकाणी मातृदुग्ध बँक निर्माण करण्यासाठी विविध सल्ला आणि पर्यवेक्षकाच्या स्वरूपातील कार्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. या केंद्राशी संलग्न राज्यांमध्ये गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दमण आणि दिव तसेच महाराष्ट्रातील रूग्णालये संलग्न आहेत. या केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी प्रशिक्षणाचे नियमितपणे आयोजन केले जाते.