या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वत्र फिरत आहे. गावोगावी दादांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा लेखाजोखा नागरिक मांडत आहेत. त्याचवेळी काही प्रलंबित विषयही समोर येतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहीन, असं आश्वासन देतानाच तुम्ही संधी दिली तर नक्कीच चांगलं काम करुन दाखवेन. त्यासाठी सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं, असे आवाहन महायुतीच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथून सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला काल सुरुवात करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी काल दिवसभर बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले.


