Homeन्यूज अँड व्ह्यूजआता अवकाशात भ्रमण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या काळातला आहे. आणि व्यवसायात उत्तम कामगिरी केली असल्यामुळे धनदौलतीला काही कमी नाही. मात्र जेव्हापासून माणसे अवकाशात जायला लागली तेव्हापासूनच माझ्याही मनात एकदातरी अवकाश प्रदक्षिणा करून यावी अशी इच्छा बळावली आहे. आता खासगी अवकाशयाने जाऊ लागली आहेत. त्यात जाण्यासाठी मी प्रयत्न केले. पण आरोग्याच्या कारणाने जमले नाही. तर आता माझ्या मृत्यूनंतर किमान माझ्या अस्थींना तरी अवकाश परिक्रमा केल्याचे श्रेय लाभेल. तेव्हा तुम्ही हे करायलाच हवे.

माणसे वयस्क होतात तेव्हा ती हट्टीही होत असतात. मुलांनीही आता असा हट्ट पुरवायला सुरूवात केली आहे. आता अनेक अवकाशयाने उडू लागली आणि त्यातली काही सदेह परतदेखील आली. त्यामुळे अवकाशयात्राची आस असलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांनी अवकाशात अस्थिभ्रमणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अवकाशात आता अस्थिभ्रमण हा नवीनच प्रकारचा उद्योग सुरु झाला. अमुक एका जागी वस्तू पाठवायची असेल तर त्याचा वस्तू आणि तिच्या वजनानुसार एक दर असतो. ग्राहक मिळत असतातच. तसे जवळजवळ १०० लोकांच्या मुलाबाळांनी पैसे भरले आणि आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या.

असेच एक अवकाशयान नुकतेच स्पेसेक्स फाल्कन ९ या अग्निबाणाच्या सहाय्याने अमेरिकेतील एका अवकाश उड्डाणकेंद्रावरून रवाना झाले. त्यात केवळ सामान आणि वस्तू यांच्याशिवाय दीड मेट्रिक टन वजनाचे पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करू शकेल असे एक एक छोटे अवकाशयानदेखील होते. कारण कमी उंचीवरील या भ्रमणकक्षेत परिक्रमा केल्यानंतर अवकाशयान पुन्हा पृथ्वीवर येणार होते. त्यानंतर आपापल्या प्रियजनांच्या अस्थी मुलाबाळांना परत केल्या जाणार होत्या. या प्रदक्षिणेला “शक्य मोहीम” असे गोंडस नावदेखील दिले गेले होते. अवकाशात वस्तू अथवा सामान घेऊन जाणारा हा एक नवा ‘स्टार्ट-अप’ उद्योग होता. ही कंपनी ३०० किलो वजनाच्या वस्तूंना अर्थात अस्थींना अवकाश परिक्रमा घडवून परत आणणार होती. यात काही लोकांच्या अस्थी तर इतर काहींचे डीएनए होते आणि स्मरणीय अंत्यसंस्कार करणारी एक कंपनी यांचा हा उद्योग होता. एक संशोधनात्मक कामगिरी म्हणून ही काम होत होते असे सांगितले गेले.

आजवर अननुभूत अशा या अवकाश परिक्रमेसाठी प्रत्येक कुटुंबाने किती खर्च केला हे विचारण्याची अथवा त्यांनीही सांगण्याची गरज नाही. कारण त्यांची ही कामगिरी आपल्या नातेवाईकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी होती. हे अवकाशयान सुखरूप परत आले असते तर या कुटुंबाना एक ‘वचन’ पूर्ण केल्याचे समाधान मिळाले असते. आताही ते समाधान आहेच. फक्त या अस्थी आता पॅसिफिक महासागराच्या कुशीत चिरनिद्रा घेत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर पुन्हा प्रवेशासाठी जे यान होते त्याचा पॅराशूट काही कारणामुळे उघडू शकला नाही आणि हे यान पॅसिफिक महासागरात कोसळले.

गेल्या वर्षीदेखील या कंपनीने पृथ्वीपासून कमी अंतरावरील भ्रमणकक्षेच्या एका अवकाशयात्रेची तयारी केली होती. परंतु हे उड्डाणच रद्द करावे लागले होते. यावेळची परिक्रमा तयारीनिशी होतीच. परंतु अयशस्वी ठरली आहे. अर्थातच संशोधक आणि उद्योजकही सुरुवातीला येणाऱ्या कोणत्याही अपयशाने खचून जात नाहीत तर ते अधिक तयारी करून पुढील मोहिमा आखतात. त्यामुळे यापुढे तरी हौशी अवकाशयात्रींच्या अवशेषांची अवकाशपरिक्रमा लवकरच घडवून आणली जाईल, अशी आशा करायला हरकत नाही.

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल......
Skip to content