गेले दोन महिने मी उन्हातान्हात तापतोय आणि मी तुम्हाला विचारतोय की, देशात उष्णतेची कमतरता आहे का? खरे तर हा प्रश्नच चुकीचा आहे असे तुम्हाला वाटू शकेल. पण आपल्याबद्दल बाहेर काय बोलले जाते आणि ते किती खरे आहे हेदेखील बघायला हवे.
पॅरिसमध्ये जागतिक पातळीवरच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. तेथेही उन्हाळा तापतो आहे. पण तेथे त्यांनी वातानुकूलन बंदच केले अशी बातमी आहे. अशावेळी कसे राहणार खेळाडू एअर कंडिशनरशिवाय म्हणजेच एसीशिवाय? हा प्रश्न तर येणारच. हाच धागा पकडून थोडे पुढे जाऊ या.
आपल्या देशात उन्हाळा अधिक तापणार आहे अशा बातम्या आल्याबरोबर सर्वात आधी काही होत असेल तर या वर्षी एसी घ्यावाच लागणार अशी मानसिकता तयार होते. त्यासाठी घरातील सर्वांचा होकार
असतोच, नव्हे तो आग्रह असतो. याच्या अगोदर हिवाळ्यामध्ये एसी कंपन्या जाहिराती लावून लावून थकलेल्या असतात आणि थोडीफार सवलतही देतात. पण यावेळी आपल्याला ते जमणार नसते. का म्हणून विचारू नका. हेच महिने आयकराची रक्कम भरण्याचे असतात.
उन्हाळा सुरु होतो. काही दिवस मुलांची उन्हाळ्याच्या सुट्टीची हौस पुरवायचे असतात. ते काम झाले की पुन्हा आपण घरी येतो आणि पंख्याची गरम हवा आता बोचरी होऊ लागते. हिशेब पाहिले जातात आणि एसीसाठी लागणारे कर्ज घेण्याची तयारी सुरु होते. कर्ज मिळते.. रक्कम फार मोठी नसली तरी अडचण होऊ शकेल अशी असते. कर्जाचे हप्ते एकतर सरळ पगारातून वजा होतात, नाहीतर दर महिन्याचे धनादेश दिलेले असतातच.
एसीला वीजबीलसुद्धा बरेच येते. त्यामुळे वेळेचे रेशनिंग केले जाते. अर्थात घरातील एकाच खोलीत एसी बसविण्याची जेमतेम आर्थिक पात्रता असते. बाकी सर्व कर्ज काढूनच.. एका अंदाजानुसार २०२८पर्यंत एसी विक्री अंदाजे ३५० कोटी रुपयांपर्यंत गेली असेल असे मानले जाते. भारत हा माझा देश आहे आणि जोपर्यंत उन्हाळ्यातील तापमान सामान्य होत नाही तोपर्यंत जमेल त्या मार्गाने एसी खरेदी करून उन्हाळ्यावर मात करणे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणारच. नाही का?