Homeकल्चर +मुंबईत आजपासून ‘मध...

मुंबईत आजपासून ‘मध महोत्सव’!

महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मधमाशीपालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशीपालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सकाळी झाले. या महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

मधमाशी केवळ मध व मेण एवढ्यापुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशी हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाची जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने मध केंद्र योजना तसेच मधाचे गाव या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशीपालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलीस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती, मधमाशीपालन उद्योगाचे प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येत आहे.

मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेली उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधमाशीपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या मध महोत्सवात मधमाशीपालनासाठी लागणारे साहित्य, मधाचे व मधमाशांचे विविध प्रकार व मधापासून तयार होणारी विविध उत्पादने, तसेच सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मधापासून विविध पाककृतीचे प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

मध महोत्सवाच्या माध्यमातून मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आज, १८ जानेवारीला शेती व मधमाशा पालन, गुणवत्तापूर्ण मध आणि मूल्यवर्धित उत्पादने, १९ जानेवारीला मध व आरोग्य, मधुक्रांतीसाठी महाराष्ट्राचे पाऊल या विषयांवर परिसंवाद होणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचा ‘मधुबन’ हा मधाचा ब्रॅंड आहे. हे दर्जेदार मध २० टक्के सवलतीच्या दराने नागरिकांना येथे उपलब्ध असणार आहे असेही साठे म्हणाले. 

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव, प्रति किलो पाचशे रुपये, देणारे राज्य आहे. त्याचबरोबर मधमाशीपाळांची माहिती संकलन करण्याची योजनासुद्धा राबविण्यात येणार आहे. राज्यात १० गावांची निवड मधाचे गाव यासाठी करण्यात आलेली आहे. डोंगराळ भाग, मध हा पारंपरिक व्यवसाय असणे आणि फुलोरा या निकषांवर गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात प्रशिक्षण व  जनजागृती करण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवाय मधमाशीचे विष हे दुर्धर आजारावरसुद्धा उपयुक्त आहे याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रिम प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना अनुभवता येणार आहे.

राज्यात मधमाशांच्या ५ जाती आहेत. सातेरी, मेरीफेरा, आग्या, फ्लोरिया आणि पोया. यातील सातेरी आणि मेरीफेरा ह्या अंधारात राहणाऱ्या आणि पाळीव मधमाशा आहेत. या मधमाशांची शेती उत्पादन वाढण्यासाठी मदत होते. याच मधमाशीचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाबळेश्वर आणि पश्चिम घाटातील १२ जिल्हे आणि ६३ तालुक्यात सातेरी मधमाशी सापडते. कोकणात पोयाच्या छोट्या मधमाशांचे अस्तित्त्व आढळते, विदर्भात सातेरी तर मराठवाड्यात मेरिफेरा या मधमाशीचे जतन करतात. सूर्यफूल, ओवा, जांभूळ, आग्या माशांचे मध असे विविध प्रकारचे मध या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी दिली.

Continue reading

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...
Skip to content