अजित पवार भल्या पहाटे उठून काम करतात तर मी रात्री उशिराच कामं करतो, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज पत्रकार परिषदेत हंशा पिकवला. पुढच्या वाक्यात देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे निर्देश करून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, आणि हे तर काय ऑलराऊंडर आहेत. हे गुगली टाकतात, विकेट घेतात, सिक्सर मारतात, सगळेच करतात. आता सरकारमध्ये फडणवीस यांच्याबरोबर अजितदादाही उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा वेग प्रचंड आहे आणि त्यांच्या गतीमुळेच विरोधकांची अशी गत झालेली आहे. मुख्यमंत्री शिन्दे असे म्हणताच पुन्हा हंशा उसळला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदाही पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला.
शिन्दे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. शासन आपल्या दारी योजनेतून आम्ही लोकांच्या दारात जाऊन त्यांना विविध योजनांचे लाभ देत आहोत. कालच नाशिक जिल्ह्यात अकरा लाख लोकांना त्यांच्या दारात जाऊन विविध प्रमाणपत्रे दिली. बाळासाहेब ठाकरे कायम सांगायचे की लोकांना मंत्रालयात खेटे घालायला लावू नका आणि आम्ही तेच शासन आपल्या दारीमधून करत आहोत. या गोष्टी घरात बसून होत नाहीत. आम्ही फक्त आपल्या कुटुंबापुरते बघत नाही तर संपूर्ण जनतेची काळजी घेतो, असा टोला त्यांनी लगावला.

गोंधळलेला, आत्मविश्वास गमावलेला आणि अवसान गळालेला विरोधी पक्ष समोर असला तरीही विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या जनतेच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन जनतेला न्याय देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी दिली. गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांचा पाढाच त्यांनी वाचला. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या स्ट्रीट फर्निचरच्या कथित घोटळ्याची चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली.
विरोधकांकडून ग्रंथ सादर – फडणवीस
विरोधी पक्षांना प्रोसिजरच माहीत नाही की काय असे वाटण्यासारखी स्थिती आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले की, सरकारला निवेदन म्हणून विरोधी पक्षांनी जणू काही एक ग्रंथच सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या सर्व लक्षवेधी सूचनांचे एकत्रिकरण केलेले आहे. मात्र, त्यात मांडलेल्या सर्व प्रश्नांना सरकार उत्तरे देईल.
आता तिघे मिळून कूटनीती करू…
एकनाथ शिन्दे यांच्याबरोबर निवडणूक लढलो आणि राजकीय कूटनीतीचा भाग म्हणून अजित पवार यांना बरोबर घेतले आहे, असे सांगून फडणवीस एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की आता आम्ही तिघे मिळून कूटनीती करणार आहेत.
केवळ बहुमताने कामकाज रेटणार नाही – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की सरकारकडे भक्कम संख्याबळ असले तरीही सभागृहातील कामकाज कार्यक्षमतेने केले जाईल. मंत्री सभागृहात उपस्थित राहतील, हे बघितले जाईल. संबंधित खात्याचे मंत्री दुसऱ्या सभागृहात असले तर मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एक जण तरी सभागृहात थांबून समर्पक उत्तर देऊन जनतेचे प्रश्न सोडवू. संख्याबळाच्या आधारे केवळ बहुमताने कामकाज चालवणार नाही.

