शाडू मातीच्या तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना काही प्रमाणात शाडू मातीदेखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविधस्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. याच अंतर्गत यावर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या ४ फूट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार करणे बंधनकारक असणे; यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
निसर्गास हानी पोहोचू नये तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावे, यासाठी पालिकेकडून विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव-२०२३ साजरा करण्यासंदर्भात भाविक, मूर्तीकार तसेच गणेशमूर्ती साठवणूकदारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘परिमंडळ २’चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी कळविली आहे.
केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडविणारे मूर्तीकार पालिकेतर्फे यंदाच्या वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर ७ जुलैपासून प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. ही संगणकीय प्रणाली २३ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत राहणार आहे.
मूर्ती घडविण्यास मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार
गणेश मूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी तसेच साठवणूकदारांना मूर्ती ठेवण्याकरीता मंडप उभारण्यासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) > Online Murtikar/Stockist Permission या लिंकवर जाऊन २३ ऑक्टोबर २०२३पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल. याठिकाणी पोलिस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. परवानगीसाठी एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. मूर्तीकार तसेच मूर्ती साठवणूकदारांना सोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
पर्यावणपूरक मूर्ती घडवणाऱ्यांना नवरात्रीपर्यंत नि:शुल्क जागा
शाडूच्या मातीपासून किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर व “प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” या धर्तीवर महापालिकेतर्फे निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणारी जागा नवरात्री उत्सवाच्या समाप्तीपर्यंतच्या कालावधीपर्यंत वापरता येईल. त्यासाठी त्यांना शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविणारे मूर्तीकार, साठवणूकदार असल्याबाबतचे हमीपत्र महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. या मूर्तीकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर, ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा ३ x ५ फूट एवढ्या आकारमानाचा फलक लावणे बंधनकारक आहे. शाडू, पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडविण्याचे तसेच साठविण्याचे वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश सन २०२३च्या नवरात्रौत्सवादरम्यानदेखील लागू राहणार असून त्यासाठी स्वतंत्र निर्देश देण्यात येणार नाहीत. सन २०२३ च्या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास, संबंधित व्यक्ती पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये कारवाईस पात्र ठरतील.
घरगुती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक
घरगुती गणपतींची उंची ४ फुटांपर्यंत असावी तसेच घरगुती गणपती मूर्ती शाडू किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच घडविणे बंधनकारक आहे. सर्व घरगुती गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही बिरादार यांनी कळविले आहे.

