तीन महिन्यांपूर्वी पेपरात बातमी वाचली ‘अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर यांचं निधन झालं..’ आणि मन भूतकाळात गेलं. १९७७मध्ये आमचं कुटूंब गिरगावातून विक्रोळीत इमारत क्रमांक १७६मध्ये राहायला गेलं. जूनमध्ये आम्ही मुलं विकास हायस्कूलचे विद्यार्थी झालो. मी पाचवीत प्रवेश घेतला.आमचे सख्खे शेजारी अँथनी फेरी अंकलबरोबर आमच्या बाबांची मैत्री झाली. दोघेही जवळपास समवयस्क होते. दोघांच्या मैत्रीतला एक समान धागा म्हणजे दोघेही रोज इंग्रजी वर्तमानपत्र वाचून त्यातील राजकीय बातम्यांवर चर्चा करायचे. संपूर्ण इमारतीत फक्त आमच्या दोन कुटुंबांकडेच इंग्रजी वर्तमानपत्र यायचं. आमच्या घरी त्यावेळी दोन वर्तमानपत्रं यायची. एक इंग्रजी आणि एक मराठी. फ्री प्रेस जर्नल किंवा इंडियन एक्सप्रेस आमचे बाबा वाचायचे. दुसरं म्हणजे लोकसत्ता, जे आम्ही मुलांनी वाचावं, यासाठी आणलं जायचं. माझी मोठी बहीण सोडली तर कोणीही ते वाचत नसे.
फेरी अंकलचं अमेरिका-इंग्लंडच्या बातम्यांवर विशेष लक्ष असे. त्यांचे कोणी नातेवाईक अमेरिकेत राहत होते. आमची नाताळची सुट्टी संपत आली होती. १ जानेवारी १९७८ यादिवशी नवीन वर्ष साजरं होत होतं. त्यादिवशी सकाळी फेरी अंकल गॅलरीत उभे राहून, हातातला न्यूजपेपर फडकवत आमच्या बाबांना सांगत होते “मिस्टर कौलगी, जिम्मी कार्टर हॅज विश्ड हॅपी न्यू इयर टू इंडिया”… “हिज मदर वॉज इन विक्रोली सम इयर्स बॅक”… आम्हाला त्यातलं ओ की ठो कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण जिम्मी कार्टर, हॅपी न्यू इयर आणि विक्रोळी हे शब्द कानावर पडले आणि ते लक्षातही राहिले.
पुढे जसजसा मोठा होत गेलो तसतशी मला पेपरवाचनाची गोडी लागली. पेपरमधल्या बातम्या समजून घेण्याचं ते वय नव्हतं. पण त्या वयातल्या जुजबी पेपर वाचनाच्या सवयीचा मला सामाजिक कार्यात प्रवेश केल्यावर खूप उपयोग झाला. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठीच तर आमच्या घरी दोन वर्तमानपत्रे आणली जायची हे नंतर कळलं. फेरी अंकलच्या त्यावेळच्या वाक्याचा अर्थ, फेरी अंकल आणि बाबांच्या संभाषणातल्या अनेक गोष्टी मला नंतर कळल्या. त्यातले संदर्भ नंतर कळले. तो अर्थ असा होता की, जिम्मी कार्टर यांनी भारताला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, जिम्मी कार्टरची आई काही वर्षांपूर्वी विक्रोळीत राहायला होती. जिम्मी कार्टर भारतप्रेमी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची नाळ भारताशी जोडली गेली होती.

आंतरराष्ट्रीय राजकारणात गमतीने असं म्हणतात की, अमेरिकन प्रेसिडेंट एखाद्या देशाच्या किती प्रेमात आहेत, यावरून त्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरतं. अमेरिका ही एक महासत्ता असल्यामुळे जगाच्या राजकारणात तिला दादा समजलं जातं. १९७७मध्ये भारताचा रशियाबरोबर असलेला दोस्ताना जगजाहीर होता. अमेरिका आणि रशियामध्ये त्यावेळी शीतयुद्ध चालू होतं. दोघेही एकमेकांना पाण्यात पाहायचे. त्यामुळे अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारतविरोधी होते. अनेक राष्ट्राध्यक्ष न्यूट्रल असायचे. पण काही मोजके राष्ट्राध्यक्ष चक्क भारताच्या प्रेमात होते, असं म्हणतात. त्यात सर्वात वरचा नंबर जिम्मी कार्टर यांचा होता. याचं कारण म्हणजे त्यांच्या आईमुळे भारताशी असलेला त्यांचा कनेक्ट असावा बहुतेक. जिम्मी कार्टर यांची आई लिलीयन कार्टर पारिचारीका होत्या. लिलीयन कार्टर ६७व्या वर्षी पीस कोअर, या संस्थेबरोबर काम करत असताना भारतात येऊन राहिल्या होत्या.आणि गंमत म्हणजे नुसतं भारतात नव्हे तर महाराष्ट्रात येऊन राहिल्या होत्या. पुढची गंमत म्हणजे त्या चक्क आमच्या विक्रोळीत येऊन राहिल्या होत्या. मानव सेवेचं व्रत घेउन विक्रोळीमध्ये आरोग्य स्वयंसेविका म्हणून माझी आई काम करायची, असं खुद्द जिम्मी कार्टर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. म्हणजे जिम्मी कार्टरचा नुसताच इंडियन कनेक्ट नव्हता तर जिम्मी कार्टर यांचा त्यांच्या आईमुळे थेट आमच्या विक्रोळीशी कनेक्ट होता. आज मला गमतीने जिम्मी कार्टरना “जिम्मी विक्रोळीकर” असं म्हणावसं वाटतं.
सहज मनात आलं की, लिलीयन कार्टर आज्जी जेव्हा १९६० साली विक्रोळीत येऊन राहिल्या असतील, तेव्हा त्या कुठे कुठे गेल्या असतील? विक्रोळीच्या खाडीची सैर त्यांनी केली असेल का? खाडीमधल्या खेकड्यांचं कालवण त्यांना कोणी खाऊ घातलं असेल का? १९६०मधलं कन्नमवार नगर कसं असेल? ज्या म्हाडा वसाहतीमध्ये माझं बालपण गेलं, ती म्हाडाची वसाहत १९६०मध्ये नसणारच. मग त्यावेळी लिलीयन कार्टर आज्जी कुठे राहिल्या असतील? १९६०मध्ये विकास हायस्कूल नव्हतंच. तिथे एक मोकळं मैदान असावं, असा आपला माझा कयास. याच मैदानावर लिलीयन आज्जींनी गोरगरिबांसाठी एखादं मोफत आरोग्य शिबिर घेतलं असेल का? लिलीयन आज्जींनी केलेल्या पुण्यकर्मामुळेच तर या मोकळ्या मैदानावर पुढे विकास हायस्कूल नावाचं पवित्र मंदिर उभं राहिलं असणार असा माझा भोळाभाबडा तर्क.
बरोबर ४७ वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर १९७७ यादिवशी जिम्मी कार्टर भारतात आले होते. २ जानेवारी १९७८ यादिवशी त्यांचं भारतीय संसदेसमोर भाषण झालं. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे १ जानेवारी १९७८ यादिवशी भारतातल्या सर्व वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स होत्या, “हॅपी न्यू इयर इंडिया”. बातमीसोबत जिम्मी कार्टरचा सुंदर हसरा फोटो होता. बातमीत त्यांनी भारताला दिलेल्या शुभेच्छा छापून आल्या होत्या. ३१ डिसेंबर १९७७पासून ते ३१ डिसेंबर २०२३पर्यंत जिम्मी कार्टर दरवर्षी भारताला नवीन वर्षाच्या शुभेच्छा मनापासून देत राहिले. पण मागच्या वर्षी मात्र त्यांचा नेम चुकला. १ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या वयाचं शतक झळकावल्यानंतर ३० डिसेंबर २०२४ रोजीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. २०२५साठी आपल्याला “हॅपी न्यू इयर” करण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला, म्हणून खूप हळहळ वाटली. मानवसेवेचं व्रत घेतलेल्या लिलीयन कार्टर आज्जीची सेवा करण्यासाठी बहुतेक देवाने त्यांना बोलावून घेतलं असावं. आमचे बाबा आणि फेरी अंकल देवाघरी जाऊनसुद्धा बराच काळ लोटला आहे. कुणी सांगावं, जिम्मी कार्टर देवाघरी जाऊन आमच्या बाबांना आणि फेरी अंकलनासुद्धा “हॅपी न्यू इयर” विश करत असतील. गुड बाय मिस्टर जिम्मी विक्रोळीकर..