Homeमुंबई स्पेशलमुंबईत पालिकेची उद्याने...

मुंबईत पालिकेची उद्याने व मैदाने राहणार १५ ते १७ तास खुली!

बृहन्मुंबई महानगरातील, महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने नागरिकांसाठी तब्बल १५ ते १७ तास खुली ठेवण्याची निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण १५ तास) नागरिकांसाठी उद्याने व मैदाने खुली राहतील. आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण सलग १७ तास) उद्याने व मैदानांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीतजास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी महानगरपालिकेची उद्याने व मैदाने सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असायची. तथापि, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱ्या अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरूक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीतजास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाने घेतला आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.

मुंबई महानगरात एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी नमूद केले.

वाढीव वेळेच्या अनुषंगाने, या निर्णयासंदर्भात महानगरपालिकेने सुधारित परिपत्रक क्रमांक एसजी/ओडी/६२२, दि. २८.०२.२०२३ निर्गमित केले आहे. त्यानुसार,

१) बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील.

२) त्याचप्रमाणे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील.

३) विशिष्ट उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करू शकतील.

४) सदर परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून उद्यानांच्या वेळेबाबत यापूर्वी निर्गमित केलेली सर्व परिपत्रके रद्द समजण्यात येतील.

५) उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने नागरिकांना खुली असण्याच्या वेळेतील बदल दर्शविणारे फलक उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने यांच्या दर्शनी भागावर लावलेली असतील.

६) नागरिकांच्या माहितीसाठी सदर बदललेल्या वेळा या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.   

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content