Sunday, September 8, 2024
Homeमुंबई स्पेशलउद्यापासून मुंबई मेट्रो...

उद्यापासून मुंबई मेट्रो २ अ आणि ७ धावणार रात्री ११ वाजेपर्यंत!

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत म्हणजेच रात्री ११ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७वरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहाऐवजी ११ वाजता सुटणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे.

या निर्णयानुसार उद्या, शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ वाजेपर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे. हा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूकप्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आहे.

मेट्रो

दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मुंबई महानगर प्रदेशात एक भक्कम सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले आहेत. नागरिकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. मेट्रोची वेळ वाढविल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन, वेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो आपल्या मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याचे सुचविले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अच्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता रात्री साडेदहाऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ सेवा साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री १०नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिमदरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मेट्रो

मेट्रो मार्ग २ अ आणि ७वर आतापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना आम्ही राबवित आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णयदेखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content