महाराष्ट्राचे माजी मंत्री, खान्देश नेते रोहिदास तथा दाजी पाटील आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे गेले असतानाच गेल्या आठवड्यात प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फुफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फुफ्फूस तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील, आमदार कुणाल पाटील सोमवारपासून कोल्हापूरलाच आहेत. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच रोहिदास पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.