Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण...

मुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण ठिकाणी बसणार जिओ नेटिंग!

मुंबईतल्या घाटकोपरच्या आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर यानिमित्ताने सुरू झाला आहे.  

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात ३१ ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी जिओ नेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने घाटकोपर येथे हनुमान टेकडी (आझाद नगर) परिसरात काम सुरू आहे. स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच अशा जिओ नेटिंगच्या तंत्रज्ञानावर आधारित काम करण्यात येत आहे. मुंबईतील नागरिकांना या पद्धतीने होणाऱ्या कामामुळे नक्कीच सुरक्षिततेचा पर्याय मिळणार आहे. पावसाळ्यातही ही बोल्टिंगची कामे सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एक दिलासा देणारा पर्याय या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उपलब्ध होणार आहे. हजारो लोकांच्या जीविताची काळजी करतानाच याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत धोका निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्व उपाययोजना सुरू आहेत.

स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करत बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. एकूण २५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बोल्टिंगचा वापर करत दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकूण १६ जणांचा प्रशिक्षित चमू दोन पाळ्यांमध्ये हे काम करत आहे. माती तसेच काळा पाषाण (ब्लॕक बसाल्ट) या दरडप्रवण क्षेत्रात आहे. बोल्टिंगचा उपयोग हा पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो. ड्रिल करून सुमारे ८ मीटर इतके आत दगडात ते वापरण्यात येतात. प्रत्येक २ मीटर अंतरावर हे ड्रिलिंगचे काम करण्यात येत आहे. कॉरेक्स, डेल्टेक्स आणि ३२ इंच व्यासाचा अँकर या स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करून बोल्टिंगचे काम करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हजारो कुटुंबे हनुमान टेकडी परिसरात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेत आहोत. दरडप्रवण क्षेत्रातील घरांबरोबरच म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार आहोत.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे. हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत. पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content