कुर्ल्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे शक्ती कायद्याबाबत पाठपुरावा करावा तसेच महिलेचा आत्मविश्वास वाढावा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच दि. ३० नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या कुर्ला परिसरातील ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्त मनोज पाटील व तपासी अधिकारी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा केली. तसेच भाभा हॉस्पिटलचे डीन डॅा. डोळस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला असून आवश्यक ती कलमे दाखल केली आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या अहवालानुसार इतर कलमांचा विचार होईल व कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
सदर महिलेचा आत्मविश्वास वाढवा यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी उपायुक्तांना केली. पोलिसांनी एक चतू:सुत्री कार्यक्रम राबवावा अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.
पोलिसांनी त्यांच्या झोनच्या हद्दीत जे गुन्हे घडतात व जे आरोपी जामिनावर सुटले असतील त्यांच्यासंदर्भात कठोर कारवाई व्हावी. ज्या अपहरण झालेल्या मुलींना पोलीस शोधून काढतात व परत त्यांना मुख्य प्रवाहात आणतात त्या मुलींनी परत त्या चक्रात सापडू नये यासाठी या मुलींना सायबर साक्षरताचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ज्या केसेसमध्ये महिलांविरुद्ध ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी एक वेगळी नोंदवही तयार करावी. बीट स्तरावरील महिला मोहल्ला दक्षता समितीच्या बैठका घेण्यात याव्यात. ज्या केसेसचे बी समरी रिपोर्ट झालेले आहेत त्या केसेसचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्तांना केल्या.
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शक्ती कायदा पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात यावा यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

