Homeबॅक पेजअखेर जागतिक खो-खो...

अखेर जागतिक खो-खो स्पर्धेचे बिगुल वाजले!

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन आता या खेळाला जागतिक पातळीवर नेण्याच्या मोठ्या कार्याची पूर्तता केली. या स्पर्धेच्यानिमित्ताने खो-खोच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे आता भारतात या खेळाला अधिक अच्छे दिन येतील अशी आशा करायला हरकत नाही. या पहिल्या जागतिक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला विभागात १९ संघांचा मोठा सहभाग लाभला. खास करून विदेशी संघांची उपस्थिती मोठी होती. आजवर कोणत्याही खेळाच्या पहिल्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनात बहुधा एवढा मोठा प्रतिसाद पहिल्यांदाच लाभला. जगात सर्वात लोकप्रिय असलेल्या पहिल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत १३ देशांचा सहभाग होता. तर १९७५ साली इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेत अवघे ८ देश सहभागी होते.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पेरु, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, हॉलंड, जर्मनी, न्युझीलंड, दक्षिण कोरिया हे बलाढ्य देश या पहिल्या खो-खो स्पर्धेत सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या दोन्ही संघांना मात्र केंद्र सरकारने व्हिसा नाकारल्यामुळे त्यांची गैरहजेरी स्पर्धेत चांगलीच जाणवली. त्यामुळे खो-खो प्रेमींची काहीशी निराशा जाणवली. अपेक्षेप्रमाणे यजमान भारताचेच वर्चस्व या स्पर्धेवर राहिले. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने शानदार खेळ करुन जेतेपदाला गवसणी घालून दुहेरी मुकुटाचा मान संपादन केला. भारताच्या दोन्ही संधांनी आपले सर्व सामने सहज जिंकून आपणच या जगज्जेतेपदाचे योग्य दावेदार असल्याचे खो-खो विश्वाला दाखवून दिले. आपला वेग, कौशल्य आणि चपळता या तीन प्रमुख गोष्टींचा सुरेख संगम साधत भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांना लीलया नमविले. भारताच्या आक्रमक खेळासमोर प्रतिस्पर्धी संघांकडे प्रत्त्युत्तर नव्हते. काही संघांविरुद्ध तर भारताने शतकी गुणांची नोंददेखील केली. एक आठवडा चाललेल्या स्पर्धेमध्ये नवी दिल्लीत जणू काही खो-खोमय वातावरण निर्माण झाले होते. पुरुष गटात भारताने नेपाळचा पराभव करुन आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ केला. महिला विभागात भारताने दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवून आपले विजयी अभियान सुरु केले. त्यानंतर पुरुष अ गटात असलेल्या भारताने पेरु, ब्राझील, भूतान यांना आरामात पराभूत करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. मग उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचे आव्हान भारताने सहज परतवून लावले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने अंतिम फेरीत मजल मारली. याच गटात जेतेपदाची मोहोर उमटवताना भारताने नेपाळवर ५४-३६ गुणांनी विजय संपादन केला.

महिला गटात भारताने सलामीची लढत जिंकल्यानंतर मलेशिया आणि इराणला या खेळाचे धडे देत उपांत्यपूर्व फेरीत सहज धडक मारली. उपांत्य फेरी गाठताना भारतीय महिलांनी दुबळ्या बांगलादेशला १०९-१६ गुणांनी आणि त्यानंतर अंतिम फेरीत मजल मारताना भारताने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान मोडीत काढले. निर्णायक लढतीत महिलांनी नेपाळवर ७८-४० गुणांनी दणदणीत विजय मिळवला. नेपाळला दोन्ही विभागात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कर्णधार प्रियांका इंगळे, रेशमा राठोड यांनी अंतिम सामन्यात छान चमक दाखवली. विजेत्या दोन्ही संघाचे कर्णधार महाराष्ट्राचे होते. प्रतिक वाईरकरकडे पुरुष संघाची आणि प्रियांका इंगळे हिच्याकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपविण्यात आली होती. पुरुष संघात वाईरकरसोबतच सुरेश गरगटे, आदित्य गणपुले, रामजी कश्यम, अनिकेत पोटे आणि महिला संघात प्रियांकासोबतच अश्विनी शिंदे, रेशमा राठोड या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. शिरिन गोडबोले आणि प्राची वाईकर हे अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. हे दोघेदेखील महाराष्ट्राचेच आहेत. त्यामुळे भारतीय विजयात महाराष्ट्राचा मोठा हातभार होता असे म्हटले तर वावगे ठरु नये.

आशियातील काही देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात भारतातून काही प्रशिक्षक पाठवण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेत आशिया संघातच कडी स्पर्धा बघायला मिळाली. त्या तुलनेत आफ्रिका, युरोप आणि लॅटिन अमेरिका या खंडातील देश मात्र या खेळात बरेच मागे असल्याचे चित्र बघायला मिळाले. या स्पर्धेच्या निमित्ताने आशियाई देश वगळता, इतर खंडातील देशांना एक नवी अनुभवाची शिदोरी प्राप्त झाली, जेणेकरून भविष्यात ते आपल्या खेळात नक्कीच सुधारणा करु शकतात. गेली ४ दशके खो-खोचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु होता. आता तो जागतिक स्पर्धेच्या टप्प्यावर पोहोचल्यामुळे भविष्यात राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत या खेळाचा समावेश व्हायला फारसे जड जाणार नाही. परंतु ऑलिंपिक स्पर्धेतील समावेशासाठी मात्र आणखी काही वर्षे तरी वाट पाहवी लागले हे नक्कीच. खो-खो अल्टिमेट लिगला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आखिल भारतीय खो-खो महासंघाने विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य पेलले.

खो-खो हा खेळ महाराष्ट्रात वाढला, रुजला आणि नंतर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आजही हा खेळ भारतात महाराष्ट्रातच सर्वाधिक लोकप्रिय आहे. १९१४ साली असोसिएशन, खो-खोची प्राथमिक बांधणी आणि नियमावली सर्वप्रथम पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने केल्याचा उल्लेख आढळतो. आता कबड्डी या मराठमोठ्या खेळापाठोपाठ खो-खोदेखील आतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेईल अशी आशा करायला हरकत नाही. सध्या हा खेळ ५५ देशांत खेळला जात आहे. ऑलिंपिकमध्ये या खेळाच्या समावेशासाठी हा खेळ ७५ देशांत पोहोचणे गरजेचे आहे. हा खेळ ९० देशांमध्ये पोहोवचण्याचे लक्ष असल्याचे अखिल भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी सांगितले. आता आमचे पहिले लक्ष्य राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा असेल. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत या खेळाच्या समावेशासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्पर्धेपूर्वी अखिल भारतीय खो-खो महासंघांनी मैदानात आणि मैदानाबाहेर उत्तम तयारी केली होती. त्यामुळेच या पहिल्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या स्पर्धेचे शानदार उद्घाटन केले. या स्पर्धेच्या रंगारंग उद्घाटन सोहळ्यात भारतीय संस्कृतीचे शानदार दर्शन घडवण्यात आले. भारतीय महिला संघ पारंपरिक साडीत तर पुरुष संघ ब्लेझर परिधान करुन उद्घाटन सोहोळ्यात सहभागी झाला होता. आता खो-खो हा खेळ जागतिक पातळीवर पोहोचला आहे. भविष्यात तो आणखी किती मोठी झेप घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

स्पर्धेतील पुरस्कार विजेतेः

महिला विभाग: सर्वोतम- चैत्रा बी. आक्रमक- अंशु कुमारी (दोघी भारत) संरक्षक- मनमती धानी (नेपाळ)

पुरुष विभागः सर्वोत्तम- मेहुल आक्रमक- सुयश गरगटे संरक्षक- रोहित बर्मा (नेपाळ)


Continue reading

फलंदाजांना झुकते माप देणारे क्रिकेट पंच डिकी बर्ड!

हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला‌ तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे‌ एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध...

आशियाई चषकाने शुभमन गिलवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ आता युएई‌ येथे झालेल्या‌ आशियाई‌ चषक टी-२०‌ क्रिकेट स्पर्धेत‌ भारताने जेतेपदावर सहज कब्जा करुन क्रिकेटजगतावर आशियातदेखील आम्हीच राज्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून‌ दिले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ यंदादेखील जिंकणार हे भाकित करायला कोणा...

अमेरिकन टेनिसमध्ये अरिना, कार्लोसची बाजी!

यंदाच्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले तर पुरुष विभागात स्पेनचा युवा टेनिसपटू २३ वर्षीय कार्लोस अल्कराझने पुन्हा एकदा एका वर्षाच्या अवधीनंतर विजेतेपदाचा चषक उंचावला. या दोघांनी जेतेपदाला गवसणी घालून यंदाच्या...
Skip to content