कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पराभवाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काय वाटते यासंबंधीचा एक अहवाल छापला आहे. खरंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संघासंबंधीच्या विधानानंतर निवडणूक निकालावर संघाने काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. कारण आम्ही संघाच्या सल्ल्याने जाणारी माणसे नाहीत, पक्ष म्हणून आम्ही स्वतंत्र आहोत अशा आशयाचे विधान नड्डा यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी केलेले होते. अशा परिस्थितीत जर भाजप आपल्याला काही किमंत देत नसेल तर संघाने गप्प राहणे श्रेयस्कर होते. परंतु न बोलेल तो संघ कसला? कान समोर दिसला तर सोनार टोचल्याशिवाय राहणार का?
झाले.. आपल्या ऑर्गनायझर, या मुखपत्रात भाजपच्या पराभवास महाराष्ट्रात अजित पवार गटाशी केलेला समझोताच कारणीभूत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार आपल्याबरोबर बहुसंख्य आमदार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुतीत सामील झाले. अजित पवार तिकडे जाण्याआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत अजित पवार यांच्यावरील 70 हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराच्या आरोपांचा जोरजोरात उल्लेख केला होता. या आरोपानंतर तातडीने अजितदादा यांना युतीत सामावून घेतल्याबाबत खुद्द भाजपमध्येही कुजबूज सुरु झाली होती. पण उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता निवडणुका आहेत, आताच त्याबाबत कोणतीही चर्चा वा टिप्पणीही नको, असा सज्जड दम दिल्यानेच सर्वांनीच तोंडे बंद ठेवलेली होती. अजितदादांना सामावून घेणे तेव्हाही लोकांना आवडलेले नव्हते आणि पराभवानंतर तर मुखपत्रानेच घरचा आहेर दिल्यानंतर देवेंद्रभाऊ आता काय म्हणणार आहेत?
“Value bases behavior and culture is our Hinduness, therefore Hindutva unites us” (मोहन भागवत) असे प्रमुखांचेच मत असताना त्याला पूर्ण छेद जाईल असे वर्तन भाजपने केलेच कसे हा प्रश्न संघाने तेव्हाच उपस्थित करायला हवा होता. परंतु संघालाही तेव्हा वाटले असेल की नक्की 400 पार जाणार! आता मत व्यक्त करून फायदा नाहीच वर त्यात नड्डा यांनी आम्ही तुम्हाला गिनत नाही, असे सांगून वर्मी घाव घातला होता. त्यालाच उत्तर म्हणून मुखपत्राने आपला रोष व्यक्त केला असावा, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला हिंदूंच्या राजकारणाचा बेस तरी आहे. पण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तसा कुठलाच बेस नसताना, उलट गैरप्रकारचे आरोप असतानाही जवळ केल्याने भाजप कार्यकर्ते नाराज असण्यापेक्षा जास्त गोंधळून गेले होते असे मत भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केले. संघही दुटप्पीपणा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रात त्यांनी पराभवाबाबत अजितदादांना जबाबदार धरले तर मग उत्तर प्रदेशातील दणदणीत परभवाबाबत संघ अजून गप्प का? राजस्थान, पंजाब व हरियाणातही पडझड झाली ती कुणामुळे? तेही जनतेसमोर यायला हवे. कालांतराने ते येईल अशी अपेक्षा करू या.