Homeन्यूज अँड व्ह्यूजअखेर बदलापूरनेही दाखवून...

अखेर बदलापूरनेही दाखवून दिले ‘स्त्री’चे अस्तित्त्व!

15 ऑगस्टच्या रात्रीपासून ठाणे शहरापासून अवघ्या 40/42 किलोमीटरवर असलेले बदलापूर हे छोटेसे शहर आतल्याआत धुमसत होते. त्यांचे कुणी ऐकत नव्हते. सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या राजकीय नेत्यांना व समाजकार्यकर्त्यांना एकच समस्या भेडसावत होती की ‘आपल्या’ नेत्याच्या जिल्ह्यात झालेली ही निंदनीय घटना बाहेर समजली तर ‘छी.. थू..’ होईल आपल्या नेत्यांची! त्यांची प्रतिमा सांभाळण्याची अघोषित शपथ घेतलेल्या स्थानिक नेत्यांनी जणू चंगच बांधला की चिमुकल्यांना झालेल्या प्रचंड यातनांपेक्षा आपल्या नेत्यांची प्रतिमा उंच आहे आणि ती उंचच राहायला हवी! झाले सर्वांचे ठरलेच, त्यांनी जणू शपथच वाहिली की असे गलिच्छ वर्तन त्या दोन चिमुकल्यांबरोबरच कुणी केलेलेच नाही.

पण त्या चिमुकल्यांबरोबर दोन निर्भया होत्या. एक होती महिला कार्यकर्ती तर दुसरी होती धडाडीची महिला पत्रकार! या दोन्ही रणरागिणींनी माजी नगराध्यक्षाला सळो की पळो केले. प्रसंगी अरेला कारे.. केले. नेते मंडळी ज्या भाषेत बोलत होते त्याच भाषेत तर कधी त्यांच्यापेक्षाही आवाज चढवून या दोघींनी ठरवले ‘एफआयआर’पेक्षा कमी काहीही नाही. एकीने तर पोलिसांपेक्षा चपळाईने हातपाय हलवून एका खासगी डॉक्टरकडून चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करवून घेतली आणि त्यात किळसवाणे गलिच्छ कृत्य समोर आले.

त्या दुर्दैवी चिमुकलीचा घृणास्पदरित्या विनयभंग करण्यात आला होता. त्या दुसऱ्या चिमुकलीच्या पालकांनी ऐनवेळी माघार घेतली म्हणून शाळेच्या संस्थाचालकांची अब्रू काहीशी वाचली. खरंतर अब्रू बदलापूरच्या बाहेर गेलेलीच होती आणि डॉक्टरांच्या अहवालाने तर ती संपूर्ण जमीनदोस्तच झाली. दरम्यान या दोन्ही पीडित चिमुकल्या जिगरी मैत्रिणी आहेत. नराधम आरोपी या दोन्ही चिमुकल्या मुलींना गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता असे बदलापूर आणि आदर्श शाळेच्या परिसरात दबक्या आवाजात बोलले जात आहे.

सुमारे पाच-सहा तास बदलापुरात घालवल्यानंतर आणखी एक संतापजनक माहिती मिळाली की, याआधीही सुमारे आठ-दहा दिवसांपूर्वी नराधम आरोपीने यापैकी एका चिमुकलीला बराच त्रास दिला होता. या त्रासाने घाबरून ती शाळेतच गेली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अट्टल दाखलेबाज गुन्हेगार आहे. तर अशा या दाखलेबाज गुन्हेगाराला नावात आदर्श असलेल्या शाळेत नोकरीच कशी मिळते, हाच कळीचा मुद्दा आहे. याचाच दुसरा अर्थ कुणीतरी या आरोपीचा ‘देवपिता’ नक्कीच आहे.

बदलापुरातील या नावाजलेल्या शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा या दुर्दैवी घटनेच्या वेळी बंद होती. किंबहुना ती यंत्रणा बिघडली होती असे खुद्द पोलिसांनीच स्पष्ट केले असल्याने शाळेत अजून काय काय बंद आहे हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नर्सरीमधील विद्यार्थ्यांना प्रसाधनगृहात नेतेवेळी मावशीबाई बरोबर असावी असा नियम आहे. मग अशी मावशीबाई नेमकी त्याच दिवशी का नव्हती? की अशा मावशीबाईची नेमणूकच केलेली नाही? यातून निर्माण होणारा आणखी मोठा व गंभीर प्रश्न म्हणजे मावशीबाई नसताना हाच नराधम लहानग्या विद्यार्थ्यांना प्रसाधनगृहात नेत होता की काय? संबंधित शिक्षक व मुख्य लिपिकाने अशी परवानगी कशी दिली याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.

आंदोलक बदलापूरचेच

झालेल्या अभद्र प्रकाराने संतप्त झालेल्या बदलापूरवासियांनी जो उस्फूर्त रेलरोको केला त्याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी शंकाकुशंका उपस्थित केल्या आहेत. तसे करणे एका वेगळ्या अर्थाने खरेच आहे. कारण नेत्यांशिवाय हा रेलरोको कुणी केला? मुख्य म्हणजे आमचा ‘रोल’ आम्ही नसताना कुणी व का केला? या दळभद्री विचारातून ‘आंदोलन करणारे बाहेरचे होते’ अशी आवई उठत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसाच दावा केला आहे. बदलापूरमधील शह-काटशहाचे राजकारण लक्षात घेता ते क्रमप्राप्तच आहे. प्रस्थापित नेत्यांच्या विरोधी कुणी गेले की बदलापूरमधील ही राजकारणी भाऊ, दादा, दाजी तसेच वाहिनीसाहेब, ताईसाहेब ही सर्व मंडळी ‘डूख’ ठेवून काटा काढत असतात, असे अनेकांनी सांगितले. बदलापूरमधील चिमुकल्यांसाठी या आंदोलनात बाहेरची माणसे होती असा आरोप करणे म्हणजे बदलापूरकरांचा अपमान आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया एका तरुणाने दिली.

माजी नगराध्यक्षांचा तोंडाळपणा

स्वातंत्र्यदिनापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अभद्र टीकाटिप्पणी केल्याने मूळ प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या या टिप्पणीविरुद्ध काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नव्हती. ‘दादा रागाने बोलायला लागल्यावर काहीही बोलतो हे तुम्हाला माहित आहे’. मग तक्रार कशाला, अशी समजूत काढण्याचाही प्रयत्न पोलीसठाण्यात पोलिसांसमोर केला गेला. अखेर हे लिहायला घेतले तेव्हा जाधव यांची तक्रार दाखल करून घेतल्याचे समजले. त्यातही एक ट्विस्ट आहे. आता जाधव यांच्याविरुद्धही वामनरावांच्या पंटरने प्रति तक्रार केल्याचे समजले.

तेथे फेरी मारत असताना लोकांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली ती म्हणजे काल दुपारपर्यंत पोलिसांचा दुष्काळ असलेल्या या शहरात आज मात्र पोलिसांची गर्दी दिसत होती. सुमारे 25 पिंजरे आणि अनेक छोट्यामोठया गाड्या दिसत होत्या. रेल्वेस्थानक परिसरतात काल इनमीन पोलीस होते तर आज सर्व फलाटांवर पोलीस दिसत होते आणि तेही पुरेशा संख्येने!

लोकसभा निवडणूक तसेच प्रचाराच्या बंदोबस्ताने आधीच कावलेल्या पोलीसयंत्रणेने न बोलता आपला इंगा दाखवला अशी कुजबुज सर्वत्र होत होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पोलीस व इतर यंत्रणानी केलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी तसे नाराजच आहेत. आपल्याला शिस्तीच्या आवरणाने काहीच करता येत नाही म्हणून जनता उद्रेक करत आहे तर तो मर्यादेत करू दे असे विचारांचे आदानप्रदान झाल्याची चर्चा ठाण्याच्या कोर्ट नाका परिसरात केली जात होती. कालचा घटनाक्रम पाहता पोलीसही मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी आल्यानंतरच ठळकपणे दिसू लागले होते, असे लोकांनी सांगितले. आमदार किसन कथोरे हेही संध्याकाळीच बदलापूरमध्ये दिसले. त्याआधी ते कुठे दिसलेचे नाहीत, असेही अनेकांनी सांगितले.

एका वर्तमानपत्रात नुकतीच एक बातमी आली आहे. त्याचे हेडिंगच मुळी ’32 वर्षांपूर्वीचे सेक्स स्कॅण्डल, 6 जणांना जन्मठेप’ असे होते. म्हणूनच कालच्या रेलरोको आंदोलनात आरोपीला लगेच फाशी द्या अशी मागणी केली जात होती. समाजमाध्यमात तर ‘एक दिनमे नोटबंदी, एक दिनमे नयी सरकार, एक दिन मे नया पक्ष, तो एक दिन मे सुनवाई करके फाँसी क्यू नहीं’, अशा घोषणाचे मिम्स दिसत होते..

“बाईचे शरीर कायमच युद्धभूमी

हिंसा..

हिंसा आणि हिंसा..

छिन्नविछिन्न करून टाकायची असते..

.. काहीच नामोनिशाण उरू नये मागे

पण ती उरतेच

प्रत्येक बाईचा चेहरा

तिचा चेहरा बनतो..

.. नाकाने कांदे सोलणाऱ्या भावांनो आधी आपलं गलिच्छ मन आणि मेंदू साफ करा

बाई सामान असते प्रत्येक आरोपीसाठी” (वंदना महाजन)

यापेक्षा अधिक काय लिहू?

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content