महापुरुषांचा वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची हकालपट्टी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
वारंवार अवमानकारक वक्त्यव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा काम कोश्यारी यांनी केले आहे. कोश्यारी ही प्रवृत्ती असल्याची टीका दानवे यांनी केली असून या प्रवृत्तीला ठेचले पाहिजे आणि आता ती वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
दिल्लीच्या बादशाहला खुश करण्यासाठी जर ते असे बेताल वक्तव्य करत असतील तर या प्रवृत्तीला ठेचावेच लागेल. महाराष्ट्रातील जनता त्यांना घरी परत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या प्रवृत्तीला समर्थन, पाठींबा देणारे भाजप आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर आंदोलने केली जातात, मग छत्रपतींविषयी अवमानकारक वक्त्यव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात मिंधे सरकार रस्त्यावर का उतरत नाही? राज्यपालांना का विरोध करत नाही, असा सवालही त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणे व महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणे हाच त्यांचा अजेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, राजनीती, न्यायनीती, शेतकऱ्यांविषयीचे धोरण आजही महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला, जगाला मार्गदर्शन करत आहेत. आज जगतिक स्तरावर यावर अमेरिका, इंग्लंडमधील विद्यापीठांमध्ये स्वतंत्र प्रकरण शिकवली जात असताना या राज्यपालांच्या डोक्यात कुठून प्रकाश पडला? ते पुराने जमाने के आहे असे म्हणायला, असा उपरोधिक सवाल दानवे यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानाचे दैवत आहेत. शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारा आहे. त्यांना महामहिम म्हणावे की नाही, असे लाजिरवाणे वक्त्यव्य कोश्यारी सतत करत असतात. त्याचा निषेध आज आम्ही केला आहे. आम्हाला कितींदाही अटक झाली तर आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

