पोलीस आणि गुन्हेगारी जगताविषयी वाचलेले एक वचन आठवले “Police are here to create disorder, they are here to preserve disorder” समाजात शांतता राखण्याचे काम जसं पोलीस करतात तसंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त वेळा पोलिसी अन्यायाच्या कथाच वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असतात. अगदी काहीशी या वचनाशी मिळतीजुळती सत्यकथा माझ्या समोरील असलेल्या पोलिसांच्याच पेपरातून डोळ्यासमोर उभी राहत आहे, नव्हे उभी राहिली आहे. पोलिसांच्याच पेपरात असे नमूद करण्यात आले आहें की “फिर्यादी यांचा मित्र नामे चेतन वाघमारे यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून केलेल्या तक्रारीनुसार संदेश पटेकर, रोहन पटेकर व त्यांच्या १०/१५ मित्रांविरुद्ध तक्रार घेतली” (९१७/२०२५). वाचक हो, अजूनपर्यंत ही फोनवरचीच तक्रार आहे. मूळ फिर्यादी आता तीन महिने झाले तरी ‘पडद्यात’च वावरतोय! (माझ्या माहितीनुसार हा फिर्यादी त्याच्या पाच-सहा क्लब्सना सर्वांच्या देखत भेटी देत असतो व छन छन रुपये मोजत असतो.)
वास्तविक एका स्कुटीच्या धक्क्यातून हे किरकोळ हातापायी सुरु झाली व पाहता पाहता त्याने गंभीर वळण घेतले. स्कुटीचा धक्का व तिची काच फुटण्याची घटना नवरात्रीदरम्यान घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी स्कुटीच्या मालकाच्या पोरांना स्कुटीची काच फोडणारे टोळके दिसले व त्यांचे हात फुरुफुरू लागले. त्यांच्यापैकी कुणी लाला नामक भैयाला चेवच फुटला. त्याने आपला टी शर्ट वर करून फिल्मी स्टाईलने एक बाटली बाहेर काढली व टोळक्याच्या डोक्यात घालून फोडली व ती फुटलेली बाटली कुणाच्या तरी पोटात घुसवण्यासाठी पुढे सरसावत
असतानाच आणखी कुणी तरी स्टम्प बाहेर काढला! या मारहाणीत जखमी कोण झाले तर संजय आणि रोहन पटेकर व त्यांचे अन्य मित्र.. मारहाण करणारे मात्र नंतर नेहमीप्रमाणे ‘सेटिंग’ लावण्यासाठी पळून गेले. आश्चर्य म्हणजे पोलीस तेव्हापासून फिर्यादीला शोधत आहेत, मात्र ते त्यांना अजूनही सापडलेले नाहीत. संतापजनक बाब म्हणजे मारहाण ज्या हत्याराने केली ते हत्यारच पोलिसांना अजून सापडलेले नाही.
ही हाणामारी मुंबईत वरळीच्या सेंचुरी मिल कंपाउंड परिसरातील रॉयल बार व मीलन पंजाब हॉटेलदरम्यानच्या परिसरात झाली. अर्थात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध ५९०/२५, १०९, ११८, १९०,१९१-२, ३, १९१-३, आदी तसेच न्यायसंहिता ३७/१अ, १३५पोलीस कायदा या कलमानव्ये खटले दाखल केले गेले आहेत. २२ ते ३० वर्षे दरम्यानची तरुण मुले तुरुंगात गेल्याने सेंचुरी मिल कंपाउंड परिसर कमालीचा चिंतीत झाला. घरातील मोठ्या माणसांचे तर हातपाय गळले! तरीही तरुण मुले खितपत पडू नयेत म्हणून काहींनी पुढाकार घेऊन भेटीगाठी सुरु केल्या. पोलीसठाण्याच्या चकराही वाढल्या. काहींनी दलालांना मध्ये घालण्याचा सल्ला दिला. हो ना करता करता तोही मान्य करण्यात आला. त्या दलालाने पोलीसठाण्याशी संपर्क साधून त्या मध्यमवर्गीय कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचा आकडा सांगितला. आकडा ऐकून घरच्यांना भोवळच आली. घासाघिस केली गेली. आकडा खालीवर होत होता. तारखाही पडत होत्या. दरम्यान, विरोधी बाजूकडून कुणी हजरच होत नव्हते. तरीही न्यायालयातून एकतर्फी कोठडी वाढत होती. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पटेकर बंधू जखमी झाल्याने त्यांना कें ई एम रुग्णालयात रीतसर भरती करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले गेले. उपचार चालू असताना पोलिसांनी दबाव टाकून त्यांची रवानगी बाहेर करण्यात आली व तेथून त्यांना थेट कोठडीत नेण्यात आले. या मारहाणीचे फ़ोटो तसेच सी सी टीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आली. या फुटेज व फोटोत मारहाण करताना दिसणाऱ्या एकाही व्यक्तीची पोलिसांनी साधी चौकशीही केली नसल्याची तक्रारही नातेवाईकांनी केली आहे. पटेकर बंधूनी पूर्वी कधी केलेल्या मारहाणीचा संदर्भ द्यायला पोलीस विसरले नाहीत. मात्र पूर्वी दहा-बारा गुन्ह्यांत अडकलेल्या क्लबवाल्याचा अपवाद पोलिसांनी कसा केला?
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

