मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आपापल्या परिसरातल्या विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग आपल्याला वरळीत पाहयला मिळतो. वरळीच्या जांबोरी मैदानाचे स्वरूप मागच्या केवळ ४ महिन्यात बदलले. वरळीतील महात्मा गांधी (जांबोरी) मैदानात विविध क्रीडा प्रकारांच्या गरजांनुसार नानाविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत या मैदानाखाली असलेली ब्रिटिशकालीन पाण्याची टाकीही पालिकेला आढळून आली आहे.
मुंबईतील अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असणारे वरळीतील ‘महात्मा गांधी मैदान’ हे ‘जांबोरी मैदान’ या नावानेही मुंबईकरांना सुपरिचित आहे. गेल्या काही महिन्यांत पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने या मैदानात विविध क्रीडा प्रकारांना पूरक अशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मैदानास एक अनोखे व अभिनव रूप बहाल झाले आहे.
या मैदानात तब्बल १५ हजार चौरस फुटांचे एक स्वतंत्र क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कबड्डी, बॅडमिंटनसह इतरही खेळ खेळता येतील असे कोर्ट, फुटबॉल मैदान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी स्वतंत्र स्केटींग ट्रॅक, पदपथ, लाकडी उपकरणे असणारी खुली व्यायामशाळा, बसण्यासाठी बाके, सूर्यास्तानंतर मैदान उजळून निघावे यासाठी पर्यावरणपूरक एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, एलईडी दिवे असणारे शोभिवंत झोके, एलईडी दिव्यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले आकर्षक नंबर गेम यासारख्या विविध सोईसुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे या सुधारणा अवघ्या ४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत करण्यात आल्या आहेत. आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे मैदानाची कामे सुरु असताना मैदानाखाली सुमारे सव्वा लाख लीटर क्षमतेची ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली आहे. या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनासाठी करण्यात येणार आहे.
जांबोरी मैदानातील या सुधारणांबद्दल अधिक माहिती देताना ‘जी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले की, या मैदानात विविध सुविधा आणि सुधारणा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या या मैदानातली ही कामे ‘जिल्हा नियोजन समिती’च्या व पालिकेच्या प्रत्येकी ७५ लाख रुपये; यानुसार उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या संयुक्त निधीमधून करण्यात येत आहेत.
वरळीतील या ऐतिहासिक जांबोरी मैदानात लवकरच खुले वाचनालय व त्यावर व्ह्युईन्ग डेक, योग केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी सुविधादेखील लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही उघडे यांनी सांगितले.
या विस्तीर्ण मैदानातल्या सुविधा थोडक्यात अशा-
१. मैदानावर १४ ठिकाणी पाण्याचे फवारे:- मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना खेळताना धुळीचा त्रास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मैदानात ओलावा राहवा यासाठी या मैदानात १४ ठिकाणी ‘स्प्रिन्कलर्स’ अर्थात पाण्याचे फवारे बसविण्यात आले आहेत. याद्वारे निर्धारीत वेळी मैदानात पाणी शिंपडले जाते.

२. मैदानाखाली आढळून आली पाण्याची टाकी:- या मैदानाच्या समतलीकरणाचे काम सुरू असताना मैदानाच्या एका कोपऱ्यात जमिनीखाली एक ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आढळून आली. विशेष म्हणजे या टाकीची नोंद सरकारी दफ्तरात किंवा महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये आढळून आली नाही. सुमारे सव्वालाख लीटर पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या टाकीचा उपयोग आता वर्षा जल संचयनांतर्गत (Rain Water Harvesting) पावसाचे पाणी साठविण्यासाठी केला जाणार आहे. हेच पाणी नंतर ‘स्प्रिन्कलर्स’द्वारे मैदानावर शिंपडले जाणार आहे.
३. मैदानाच्या खाली वर्षा जल संचयन यंत्रणाः- मैदानात पडणारे पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी संपूर्ण मैदानाखाली सुमारे १ ते दीड फुटावर वैशिष्ट्पूर्ण पद्धतीने सच्छिद्र पाईप बसविण्यात आले आहेत. या पाईपांवर बसविण्यात आलेल्या आच्छादनांमुळे केवळ पाणी सच्छिद्र पाईपामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर मैदानात झिरपणारे हे पावसाचे पाणी ६ इंची पाईपद्वारे ब्रिटिशकालीन पाणी साठवण टाकीमध्ये साठविण्यात येणार आहे. याच पाण्याचा उपयोग ‘स्प्रिन्कलर्स’साठी करण्यात येणार आहे.
४. लाकडी उपकरणे असलेली खुली व्यायाम शाळा:- लोखंड किंवा पोलाद यासारख्या धातूंचा वापर करून तयार केलेली व्यायामशाळेतील अनेक उपकरणे आपण बघितली आहेत. पण वरळीच्या जांबोरी मैदानात उभारलेली खुली व्यायामशाळा प्रथमदर्शनीच आपले लक्ष वेधून घेते. कारण या व्यायामशाळेतील उपकरणे ही चक्क लाकडाची आहेत. याठिकाणी डंबेल्स, वेटलिफ्टिंग, पूल-अप्स आदी सर्व उपकरणे लाकडाची आहेत.
५. खुले योग केंद्र:- या मैदानालगत खुले योग केंद्र उभारण्यात येत असून याचे काम सध्या अंतिम टप्यात आहे. या योग केंद्रात एकावेळी सुमारे ३० व्यक्ती योगाभ्यास करू शकतील.
६. लवकरच सुरू होणार मल्लखांब सराव:- या मैदानात मल्लखांब या भारतीय खेळाचा सराव करण्यासाठी आवश्यक ते साहित्य लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
७. मल्टी-स्पोर्ट्स रबरमॅट कोर्ट:- या मैदानात ५ हजार १०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचे मल्टी-स्पोर्ट्स रबरमॅट कोर्ट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. चारही बाजूंनी जाळीचे आच्छादन असणाऱ्या या स्वतंत्र क्रीडांगणात कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यासारख्या विविध क्रीडा प्रकारांचा सराव नियमितपणे होत आहे.

८. स्केटिंग ट्रॅक:- या मैदानात सुमारे ५० मीटर लांबीचा स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. सध्या दररोज सकाळी आणि सायंकाळी याठिकाणी स्केटिंग या क्रीडा प्रकाराचा सराव करणारे खेळाडू दिसून येत आहेत.
९. जॉगिंग ट्रॅकः- परिसरातील नागरिकांना मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक घेणे सोईचे व्हावे, यासाठी या मैदानाच्या सभोवती १ हजार ३०० फुटांपेक्षा अधिक लांबीचा व १३ फूट रुंद असणारा प्रशस्त जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
१०. मैदानाच्या सभोवती जाळी:- मैदानात खेळल्या जात असलेल्या विविध क्रीडा प्रकारांना स्वतंत्र स्पेस मिळावी, या उद्देशाने मैदान व जॉगिंग ट्रॅक यादरम्यान जाळी बसविण्यात येत आहे. या जाळीमुळे मैदान खेळांदरम्यान वापरले जाणारे विविध प्रकारचे चेंडू मैदानाबाहेर जाण्यासदेखील काही प्रमाणात प्रतिबंध होणार आहे.
११. आकर्षक एलईडी दिवे असलेले झोके (एलईडी स्विंग):- या मैदानात काही आकर्षक झोके बसविण्यात आले आहेत. या झोक्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या अर्धपारदर्शक झोक्यांच्या आत रंगबिरंगी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे झोके सध्या परिसरातील लहान मुलांच्या आकर्षणाचे ठिकाण झाले आहे.
१२. एलईडी दिवे असलेले नंबर गेम:- आपल्या पारंपरिक आटापाट्या किंवा छप्पी या खेळाशी साधर्म्य साधणारा व विविधरंगी एलईडी दिवे असलेला नंबर गेम याठिकाणी बसविण्यात आला आहे. हा खेळ खेळण्यासाठी रोज संध्याकाळी लहानग्यांची लगबग दिसून येत आहे.
१३. सूर्यास्तानंतर प्रकाशासाठी एलईडी दिव्यांचे वैशिष्ट्यपूर्ण खांब:- मैदान परिसरात सूर्यास्तानंतर पुरेसा प्रकाश असावा, या हेतूने मैदानाच्या सभोवती एलईडी दिव्यांची वैशिष्ट्यपूर्ण सुमारे ४० खांब बसविण्यात आले आहेत. या खांबांमध्ये करण्यात आलेल्या आरशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वापरामुळे प्रकाश परावर्तन साधले जाऊन मैदान उजळण्यास मदत होत आहे. तसेच या मैदानाच्या चारही कोपऱ्यांवर ४ हायमास्ट यापूर्वीच बसविण्यात आले आहेत.

१४. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कट्टा:- ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी याठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा कट्टा तयार करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकमेकांकडे बघून एकमेकांशी संवाद साधणे सुलभ व्हावे, या हेतूने या कट्टयांचे आकार अर्धगोलाकृती करण्यात येत आहेत.
१५. लहान मुलांसाठी खेळणी:- या मैदानालगत लवकरच घसरगुंडी, सि-सॉ फळी, फिरते चक्र, झोके इत्यादी खेळणी बसविण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी जमिनीवर रबरमॅटदेखील टाकण्यात येणार आहेत.
१६. व्ह्युविंग डेकसह खुले वाचनालय:- मैदानालगतच्या एका बाजूला खुले वाचनालय उभारण्यात येत आहे. या वाचनालयाच्या वर व्ह्युविंग डेकदेखील उभारण्यात येणार आहे.
१७. मैदानाच्या सभोवती क्रीडा शिल्पे:- या मैदानाच्या सभोवताली वैशिष्ट्यपूर्ण क्रीडाशिल्पे बसविण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भालाफेक, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांची शिल्पे आकर्षिक पद्धतीने बसविण्यात आली आहेत.
१८. मैदानात हवा खेळती राहवी, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ग्रील:- मैदानात हवा मोकळी व खेळती राहवी, या उद्देशाने मैदानाच्या सभोवतील संरक्षण भिंत बांधण्याऐवजी ग्रील बसविण्यात आली आहे. यामुळे मैदानातील हवा खेळती राहण्यास मदत होत आहे.
१९. वैशिष्ट्यपूर्ण इल्युजनरी पेंटिंग व प्रवेशद्वार:- मैदानाच्या प्रवेशद्वारालगत विविध खांबांवर वैशिष्ट्यपूर्ण व अभिनव ‘इल्युजनरी पेंटिंग’ चितारण्यात आली आहेत. या पेंटिंगचे वैशिष्ट्य म्हणजे खांबांमुळे झाकला जाणारा मैदानाचा भाग खांबांवरच चितारण्यात आला आहे. यामुळे एका विशिष्ट कोनातून बघितल्यानंतर खांबांवर चितारण्यात आलेले चित्र आणि मैदानातील प्रत्यक्ष दृष्य, या दोन्ही बाबींचा अभिनव संगम भासमान पद्धतीने साधला जाऊन एक आगळेवेगळे चित्र दिसून येते. या ‘इल्युजनरी पेंटिंग’सोबत सेल्फी काढण्यासाठी सध्या तरुणांची लगबग दिसून येत आहे. त्याचबरोबर मैदानाचे प्रवेशद्वारदेखील आकर्षक व कलात्मकरित्या उभारण्यात आले आहे.
२०. पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची सुविधाः- या मैदानात खेळावयास येणाऱ्या खेळाडुंसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, या उद्देशाने अस्तित्त्वात असलेले प्याऊ (पाणपोई) सुधारित करुन लवकरच सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर जुन्या प्रसाधनगृहाचे अद्ययावतीकरणही लवकरच करण्यात येणार आहे.
२१. मैदानातील अतिक्रमणे हटविलीः- या मैदानालगत गेल्या काही वर्षांत अतिक्रमणे उद्भवली होती. गेल्या ४ महिन्यात झालेल्या सुधारणा कामांदरम्यान ही अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. यामुळे सुमारे १५ हजार चौरस फुटांची जागा मोकळी होण्यास मदत झाली आहे.

