राज्यात दुष्काळाची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही. पाण्याचा विषय खूपच गंभीर झाला आहे. माझ्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सिरयस नाही. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पाऊस.. शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने काल खासदार सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताच्या ज्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असे सुळे म्हणाल्या.
अभिनेता सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करावा लागेल. सलमान खान यांच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भररस्त्यावर असं होत असेल तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भररस्त्यावर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपकी बार गोळीबार सरकार या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांच्यावरील टीका ६० वर्षं सुरू आहे. शरद पवार यांच्यावर टीका केली की हेडलाईन होते हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दररोज शरद पवारांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेले ६० वर्षे मार्केटमध्ये खणखणीत वाजत आहे. त्यांना काहीही करून शरद पवारांना संपवायचं आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.

