राजकारणात कधी काय बोलावे हे अनेकांना समजते. पण कधी काय बोलू नये हे फार कमी लोकांना समजते. भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांनी स्वतःचा वावदुकपणा अशा नको ते बोलण्यातून सिद्ध केला आहे. सरत्या स्पताहात त्यांनी बोलताना दोन मोठ्या चुका केल्या. त्याचा ताप त्यांचे सध्याचे राज्यातील सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सोसावा लागला आहे. प्रथम चव्हाणांनी, “अजितदादांना सत्तेत घेऊन आम्ही चूक केली”, अशा प्रकारची कबुलीच देऊन टाकली. एका जाहीर सभेत ते म्हणाले की, मी नेत्यांना संगितले होते, विचार करा, विचार करा! यांना सोबत घेऊ नका. पण तेच झाले! अजितदादा सत्तेत आले…” याआधी अजित पवारांनी पुण्यातून भाजपावर ज्या तोफा डागल्या, त्याला प्रांताध्यक्षांचे हे उत्तर होते. दादा म्हणाले होते की, “माझ्यावर ज्यांनी सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्याच लोकांबरोबर मी सत्तेत आहे!” हा रोख थेट फडणवीसांच्या विरोधातच होता. त्याला फडणवीस व बावनकुळेंनी योग्य, पण सौम्य भाषेत उत्तर दिले खरे पण चव्हाणांचे उद्गार.. मी सांगत होतो, यांना घेऊ नका हेच टीव्हीच्या पडद्यावर आणि समजामाध्यमांमध्ये गुंजत राहिले! आपल्या बोलण्याने राज्यातील महायुतीचे गणित व वातावरण बिघडायला नको याचे भान प्रांताध्यक्षांनी ठेवले नाही.
लातूरमध्ये बोलताना चव्हाणांची जीभ अशीच पुन्हा एकदा जोरदापणाने घसरली. “विलासरावांच्या स्मृती पुसून जातील, असा विकास करू” असे काहीतरी ते बोलले. या बोलण्याला बरळले असाच शब्द योग्य ठरतो. चव्हाण हे मुळात रिक्षा-टेंपो चालकाचा व्यवसाय करत होते. अर्थातच या व्यवसायिकांकडे असतो तसा, त्यांच्याकडे एक निराळा स्ट्रीट स्मार्टनेस आहे. राजकारणात आलेले या व्यवसायातील लोक मोठ्या पदांवर पोहोचलेले आपण पाहतोच! महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत ते पैलवानकी करत होते. खेळांकडे त्यांचा कल अधिक होता. सहाजिकच शिक्षणात, ज्ञान-विज्ञानात त्यांची प्रगती बेताची राहिली असेल तर त्यात नवल नाही. अनेक नेते कमी शिकलेले, पण तरीही उत्तम वक्ते होऊन गेले आहेत. पण चव्हाण यांची वक्तृत्वासाठी फारशी प्रसिद्धी नाही. लोकांना प्रोत्साहित करेल, जनतेला एखाद्या विषयावर पेटून उठवेल अशीही मोठी भाषणे करण्यासाठी ते फारसे परिचित नाहीत. मग तरीही ते नेते कसे बनले हा प्रश्न आता भाजपाच्याच कार्यकर्त्यांना पडला असेल! चव्हाण संघटनेच्या कामात हुषार आहेत. ते बैठका उत्तम घेतात. ते रणनीती ठरवण्यात चतुर असावेत. संघटनेत अगदी खालच्या स्तरापासून त्यांनी काम सुरु केले. ते करताना त्यांनी व्यवसायतही यश कमावले. त्यामुळे चांगला व्यावसायिक व नेता अशी त्यांची प्रतिमा पक्षात तयार झाली.

प्रमोद महाजनांनी त्यांच्यातील आक्रमक धडपड्या कार्यकर्ता हेरला. त्यांना डोंबिवलीत नगसेवकपदाची संधी दिली. रविन्द्र चव्हाण कल्याण डोंबिवली मनपात नगरसेवक बनले. त्यातही पक्ष जिथे वर्षानुवर्षे हरतच होता, अशा जागेवरच त्यांना प्रथम लढवले गेले. ती जागा त्यांनी जिंकली. नंतर ते आमदार झाले. फडणवीसांनी त्यांना आधी राज्यमंत्री, नंतर मंत्री म्हणून संधी दिली. या सर्व प्रवासात त्यांना आधी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे आणि नंतर देवेन्द्र फडणवीस यांच्यासारखे नेते लाभले. नेता सांगेल त्या पद्धतीने काम करत राहणारा हनुमान असे बिरूदही त्यांना लागले. शांतपणाने काम करत राहणे हे त्यांनी आजवर साधले होते. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते पक्षाचे कार्याध्यक्ष बनले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधी काही महिने त्यांच्याकडे पक्षाने प्रांताध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत. पण तरीही या सर्व निवडणुकांचे सूत्रसंचालन चव्हाणांचे आधीचे नेते माजी प्रातांध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच करत आहेत.
नगरपालिका निवडणुकांवेळी चव्हाणांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिवसेनेशी पंगा घेतला होता. खरेतर एकनाथ शिंदे ठाकरेंना सोडून जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्या चाळीस आमदारांना आधी सूरतला, नंतर गुवाहाटीला व नंतर गोवा मार्गे मुंबईत घेऊन येण्याची जबाबदारी भाजपाने चव्हाणांकडे सोपवली होती. ठाणे जिल्ह्यातील नेते असल्याने त्यांची व शिंदेंची चांगली घसट, मैत्री आहेच. त्याचा लाभ चव्हाणांना, पक्षफुटी ते मुख्यमंत्री, या एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासातील एक वाटाड्या ही भूमिका निभावताना झालाच असेल. हे सारे जरी खरे असले तरीही रविन्द्र चव्हाण यांच्या रफटफ स्वभावाचा व तितक्याच खरखरीत बोलण्याचा ताप पक्षाला निवडणुकीत होतो आहे. दादांच्या बाबतीतील त्यांच्या, “सावधतेच्या हाका”, ना राज्यातील पक्षाने ऐकल्या होत्या, ना दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐकल्या. पण हा दादांच्या बाबतीतील वाद शमायच्या आधीच चव्हाणांनी लातूरमध्ये पक्षाच्या पायावर अक्षरशः कुऱ्हाड हाणून घेतली. विलासराव देशमुख व लातूरचा विकास हे समीकरण भाजपाला कधीच पुसता येणार नाही. तसा प्रयत्न करणेही राजकीयदृष्ट्या त्या पक्षाला, नेत्याला धोकायदायक ठरू शकते. कारण लातुरकरांच्या लेखी विलासरावांचे स्थान आज सर्वोच्चच आहे. रितेश देशमुख म्हणाले ते खरेच आहे. “ठसा पुसण्याचा प्रयत्न कराल, पण जे मना मनात कोरले गेले आहे, ते कसे पुसाल?”

ज्या गावाला ओळखच मुळी विलासरावांमुळे मिळाली त्या लातूरमध्ये जाऊन त्यांच्या स्मृती पुसण्याची भाषा लोक कसे काय सहन करू शकतील? साठ-सत्तरच्या दशकातील मराठवाड्यातील एक मोठे व्यापारी गाव, तालुक्याचे शहर इतपतच ओळख असणाऱ्या लातूरच्या विकासात दोन नेत्यांचा मोठा हातभार लागला. एक होते शिवराज पाटील चाकुरकर व दुसरे होते विलासराव देशमुख. तिसरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर हेही याच भागातील. पण चाकुरकरांची कारकीर्द महाराष्ट्रात कमी व दिल्लीत अधिक फुलली. महाराष्ट्राच्या लक्षात ते राहिले ते 1977-78 मध्ये राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. नंतरची त्यांची सारी कारकीर्द दिल्लीतच झाली. विलासराव 1980मध्ये प्रथम आमदार झाले व 1982ला त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी आली. त्यांनी 90च्या दशकात शरद पवारांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिले होते. अर्थात तेव्हा विलासराव, सुशिलकुमार शिंदे, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव देशमुख अशा अन्य दहा-बारा नेते व मंत्र्यांमध्ये एक होते. पण शरद पवारांनी विलासरावांच्या विरोधातील राग सातत्याने मनात जपला, हे त्यांच्या राजकीय पवालांनी दिसले होते. विलासरावंनी मंत्रिमंडऴात अनेक खाती सांभाळली. त्यात शिक्षण, सहकार, गृह, एस.टी., वीज अशी पुष्कळ खाती, मंत्री व आधी राज्यमंत्री म्हणून त्यांनी हाताळली.
शंकरराव चव्हाणांच्या एका मंत्रिमंडळात जिचकार व विलसारावांकडेच राज्याच्या प्रशासनाची सारी सूत्रे होती. विलासरावांनी जी जी खाती हाताळली, त्यातील विभागीय संचालनालये, महत्त्वाची कार्यालये असे सारे ते लातूरला घेऊन गेले! लातूरचा शैक्षणिक विकास व संस्कृतिक महत्त्वही विलासरावांनी हळुहळू वाढवत नेले. लातूर नगरीला मराठवाड्याचे व राज्याचेही उच्च शिक्षणाचे केंद्र बनवण्यात ज्या अनेक संस्थाचा सहभाग राहिला त्यात विलासरावांच्या स्वतःच्या अनेक उच्च शिक्षणाच्या संस्था, त्यांचे नेतृत्त्व व प्रसासकीय कौशल्य याचा मोठाच वाटा राहिला. लातूरला 2012मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. शहराची रेल्वे व रस्त्यांमुळे राज्याच्या अन्य भागांशी मुंबईशी जोडणी करण्यामध्येही विलासरावांचा वाटा मोठा होता, यातही शंका घेण्याचे करण नाही. तीन तीन खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे जे जाळे विलासरावांनी तिथे उभे केले त्यात आजही हजारो कुटुंबांची घरे चालवण्याची ताकद आहे. अशा विलासरावांच्या कार्य-कर्तृत्त्वविषयी शंका उपस्थित करणारे चव्हाण हे कोण मोठे कर्तव्यपुरुष आहेत? त्यांचे स्वतःचे कार्य काय? त्यांनी डोंबिवलीचा किती विकास केला? कल्याण-डोंबिवली मनपामध्ये आजही पाण्याची, रस्त्यांची बोंबच आहे. याची जबाबदारी तिथले शासक मंत्री नेते या नात्याने आधी चव्हाणांनी उचलायला हवी होती. नंतर विलासरावांचा ठसा पुसून टाकू वगैरे बोलण्याचे धाडस करायला हवे होते!

लातूरमध्ये सर्व सत्तर जागी भाजपाने उमेदवार दिले आहेत. शिवराज पाटील चाकुरकरांचे कुटुंब आज भाजपात आहे. शिवाजीराव निलंगेकरांचंही कुटूंब आज भाजपातच आहे. यामुळे चव्हाणांचा आत्मविश्वास बळावला असावा. “आता लातूरवर आपलीच सत्ता”, हा उन्मादही तयार झाला असावा. त्यातून त्यांनी असे घातक विधान केले असावे. तिकडे विलासरावांच्या कुटुंबाने काँग्रेसची जबाबदारी घेतलेली आहे. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह सर्व सत्तर जागी उमेदवार दिले आहेत. या दोघांना अजितदादांच्या राष्ट्रवादीने तगडे आव्हान उभे केले आहे. अशा तिरंगी लढतीत खरेतर भाजपाचे पारडे सुरुवातीपासून जड होते. पण चव्हाणांच्या बेताल बोलण्याने भाजपाचे कार्यकर्तेही संतप्त झाले. जनताही भाजपाच्या विरोधात बोलू लागली. लातूर व शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील जनताही चिडली. याचा परिणाम काही प्रमाणात जालना व संभाजीनगरातही भाजपाला फटका बसण्यात होऊ शकतो असे दिसू लागले. या स्थितीमुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने चव्हाणांचे कान पिळले असावेत. चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली. स्वतः फडणवीस लातूरला लगेचच गेले आणि त्यांनी भावनिक आवाहन जनतेला केले. “विलासरावांच्या कल्पनेतील विकास आम्ही करू, असे चव्हाणांना बोलायचे होते, पण त्यांचे बोलणे थोडे गैर झाल्याचेही”, मुख्यमंत्र्यांनी कबूल करून लातुरकरांचा संताप थोडा कमी केला. शिवाय चाकुरकरांचे भव्य समारक सरकारी खर्चाने लातूर महानगरपालिकेसमोरच उभे करू, असाही शब्द देऊन फडणवीसांनी लातुरकरांची थोडी सहानुभूती मिळवली. पण तरीही लातूरचे राजकीय निरिक्षक भाजपाच्या विजयाची पूर्ण खात्री आजघडीला देऊ शकत नाहीत. हा सारा फटका चव्हाणांमुळे सत्तारूढ भाजपाला बसला आहे. परवा त्याची तीव्रता समजेल.

