ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले, आज आपली आवडती कोर्ट परिसर भेट ठेवूचया! काय नशीब होते बघा. बसस्टॉपवर आलो तोच चक्क वाटानुकूलित बस सेवेशी हजर! तिकीट काढले व जरा विसावलो. सेंट्रल मैदान स्टॉप गेला आणि उभा राहिलो.. बस कोर्ट नाक्याकडे वळली आणि आश्चर्याचा झटकाच बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेरूनच पांढऱ्या रंगाचे पडदे चकाचक स्वरूपात लावले होते. जणू काही जिल्हाधिकारी कार्यालय पडदानशीन झाल्यासारखे दिसत होते. कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून आत जाताच निवडणुकीची लगबग जाणवली. कधी नव्हे तो सुरक्षा अधिकारी गाडयांना आत घेण्यास नकार देत होते. दुसरे आश्चर्य म्हणजे नकार ऐकताच मागच्या गाडीतून लगबगीने पीए किंवा बाह्या सरकवत कार्यकर्तेही बाहेर आलेले दिसले नाहीत. मग लक्षात आले की अरे ही तर निवडणुकीची झलक आहे. निवडणूक या पाच अक्षरांनी सर्वांना सुतासारखे सरळ केलेले दिसले. मनातून सुखवलो. पण आत जाताच गाड्यांचा प्रचंड ताफा पाहून काहीसा हिरमूसलोही!

नेत्यांना ऊन लागू नये म्हणून..

जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तर जवळजवळ सर्व कार्यालयाला टॉवेल गुंडाळतात तसे पडद्यात गुंडाळलेले दिसले. आजूबाजूला चौकशी केल्याशिवाय राहवले नाही. यह सफेद कपडा किसलीये भाई? त्यावर त्याने चक्क मराठीत सांगितले की, अर्ज भरायला येणाऱ्या राजकीय नेत्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हूणन? मनात आले की आपले राजकीय नेते गेल्या २० वर्षांपासून उन्हात फिरलेले कुणी पाहिले आहेत काय? जवळजवळ सर्वांकडे चांगल्या गाड्या आहेत. थोडे मोठे आहेत त्यांच्याकडे एसयुव्ही आहेत आणि त्यापेक्षाही मोठे आहेत त्यांच्याकडे परदेशी बनावटीच्या आलिशान गाड्या आहेत. सांगायचे विसरलो. या सर्व प्रकारच्या गाड्या बेफाट कूल असतात. आपल्या नेत्यांना उन्हाचा कधी त्रासच होत नसतो. कारण ‘गरमी’वर त्यांच्याकडे जालीम उपाय असतो. आता इतक्या गारेगार वातावरणातून जनतेला ‘गार’ करण्यासाठी निघालेल्या नेत्यांना पाच मिनिटे सूर्यदेवाची गरम किरणे लागली तर काय पाप लागणार आहे? पण आमचे जिल्हाधिकारी कोमल हृदयाचे असल्याने ही सर्व पडद्यांची व्यवस्था केलेली असावी.

पांढरा रंग किरणे परावर्तीत करतो असे आठवी-नववीत शिकलेले आठवले आणि मेंदूत लख्ख प्रकाश पडला. प्रकाशाबरोबर एक जुने गाणे आठवले. मालती पांडे ते गाणं म्हणत असत. “कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू..” तान्हया बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून एक माय सर्वांना विनवीत आहे. अरे सर्वांनो पाय न वाजवता (न आपटता) आत या .आताच बाळाचा डोळा लागला आहे, त्याची झोपमोड व्हायला नको. मायच ती, सर्वांना सांगते, चिमणीला सांगते, गायीलापण सांगते. तू हळूच हंबर! आता कोर्टनाका परिसर म्हटला की हॉर्नचे आवाज येणारच. ते कोण थांबवणार! तसेच नेत्यांच्या तसेच निवडणूक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाडयांनाही किरणांचा तडका बसू नये म्हणून नवीन छप्परही उभारण्यात आलेले आहे. बिसलेरीच्या थंडगार बाटल्या तसेच साध्या बाटल्यांचे तर अनेक खोके (पुन्हा खोके) दिसत होते.

नियोजन भवनात उभारलेल्या निवडणूक कक्षात सर्वांचीच लगबग होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीनंतर तरी सुखाचे दिवस येतील का, हा आम जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. हे सुख जर मिळणार असेल तर जनताही एक सुरात म्हणेल.. “ऊन नका देऊ नेत्याला, ऊन नका देऊ..!”

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content