महायुतीला राज्यातील जनतेने अभूतपूर्व यश दिल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाल्यानंतर सोमवारपासूनच त्या संभाव्य नाराजीनाट्याची झलक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिसून आली.
मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी थेट त्यांचे तारणहार असलेल्या नितीन गडकरींची भेट घेतली आणि गाऱ्हाणं मांडलं. त्याचवेळी विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दावा केला की मुनगंटीवार ज्येष्ठ नेते असून ते नाराज नाहीत. पक्ष आणि सरकार दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे केंद्रीय पक्षाने काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. गडकरी यांना भेटून आल्यावर मुनगंटीवार यांनी मात्र आपले नाव केंद्राकडे पाठवलेल्या यादीत असताना वगळले कसे गेले, हा सवाल केला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही सारं काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. मंत्रिमंडळातून वगळल्याचा धक्का बसलेले छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. माध्यमप्रतिनिधींच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, होय मी नाराज आहे. त्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललात का, असे पत्रकारांनी विचारताच भुजबळ उत्तरले, मी कशाला कुणाला विचारायला जाऊ. भुजबळ यांनी नागपूरमधून थेट नाशिकला प्रयाण केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते.
एकनाथ शिन्दे यांच्या शिवसेनेतही वेगळे चित्र नाही. मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलेल्या मंत्र्यांनी नाराजी जाहीर करू नये, यासाठी शिन्दे आणि पवार यांच्या पक्षांमध्ये मंत्रिपदे अडीच वर्षांसाठीच असून नंतर पुन्हा खांदेपालट केला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेतीलही काही आमदारांनी नाराजी अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांकडे बोलून दाखवली. भारतीय जनता पक्षाला प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी सतावणार असून संभाव्य नाराजीनाट्याची झलक सोमवारी विधिमंडळाच्या आवारातच बघायला मिळाली. ही नाराजी अधिवेशन संपेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.