Homeमुंबई स्पेशलअखेर ठाकरे-आंबेडकरांमधली चर्चा...

अखेर ठाकरे-आंबेडकरांमधली चर्चा आघाडीवरच अडकली!

महाराष्ट्रात सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला तोंड देण्यासाठी हातात हात घेऊन उभी ठाकलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गट (उद्धव ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीची (प्रकाश आंबेडकर) चर्चा महाविकास आघाडीतल्या समावेशाच्या चर्चेभोवतीच घुटमळत राहिल्याचे वृत्त आहे.

आज दुपारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेच्या वतीने खासदार विनायक राऊत तसेच सचिव मिलिंद नार्वेकरसुद्धा उपस्थित होते. ही चर्चा फार गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न झाला. चर्चेआधी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर आज कोणतीही बैठक नसल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात आपण नेहमीप्रमाणे पोलिसांशी चर्चा करायला जाणार आहोत. यापलीकडे आज आपला कोणताही कार्यक्रम नाही असे आंबेडकर म्हणाले.

परंतु नंतर अचानक लपतछपत ते ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहोचले. उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आधीच उपस्थित झाले होते. तेथे या सर्वांमध्ये साधारण दोन तास चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने मुंबई महापालिकेसह इतर महापालिका, नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा झाली. या निवडणुकांमध्ये एकत्रित लढण्यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. मात्र सर्व चर्चा अखेर महाविकास आघाडीभोवती घुटमळली.

उद्धव ठाकरे गट सध्या महाविकास आघाडीचा भाग आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. अशावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असेल की शिवसेनेच्या जागांमधला एक भागीदार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे ते स्पष्ट होईपर्यंत पुढे कोणताही निर्णय घेता येणार नाही यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली. मात्र, सत्ताधारी युतीला रोखण्यासाठी आघाडी करावीच लागेल यावर त्यांचे एकमत झाले, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content