राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती दडपली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची प्रत्यक्ष कागदपत्रांसमोर/करारपत्रांबरोबर पडताळणी केली असता हे साफ दिसून येत आहे, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. किरीट सोमैया यांनी आयकर विभागाकडे केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दडपलेल्या संपत्तीसंदर्भात निवडणूक आयोग, दिल्ली येथे तक्रार दाखल केल्यानंतर आज 8 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य रू. 4,37,00,000 दाखवले आहे. पण करारामध्ये बाजारमूल्य रु. 4,14,00,000 असल्याचे दिसून येते. परंतू, खरेदी मूल्य रु.2,10,00,000 असल्याचे दिसून येते. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 19 घरांचा (एकूण 23,500 स्क्वे. फूट बांधकाम), 8 वर्षांचा (1/4/2013 ते 31/3/2021पर्यंत) प्रॉपर्टी टॅक्स/कर 12 नोव्हेंबर 2020 रोजी भरला. ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार एकूण संपत्तीचे बाजारमूल्य रु. 5,29,00,000 आहे. अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोर्लाई, अलिबाग येथे रु. 10.50 कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे. पण सांपत्ती/मालमत्तेची किंमत व मूल्य रु. 2.10 कोटी एवढीच दाखवली आहे, असे सोमैया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.