Homeकल्चर +भारताला लाभले 40वे...

भारताला लाभले 40वे जागतिक वारसा स्थळ!

गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा, या स्थळाचे नामांकन, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. धोलाविरा: हडप्पा शहर याला जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळण्यासाठी यासाठी भारताने जानेवारी, 2020मध्ये जागतिक वारसा केंद्रात नामनिर्देशन पत्र सादर केले होते.

2014 पासून हे स्थळ जागतिक वारसा स्थळांच्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट होते. धोलावीरा: हडप्पा शहर हे दक्षिण आशियातील काही मोजक्या चांगल्या संरक्षित शहरी वसाहतींपैकी एक आहे, जे इसवीसनपूर्व  तिसऱ्या  ते दुसऱ्या मध्य सहस्त्रकाच्या दरम्यान वसवण्यात आले आहे.

वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर केंद्रीय संस्कृती विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी लगेचच ट्विटरवर ही बातमी जाहीर केली. तेलंगणा राज्यातल्या मुलुगू जिल्ह्यामधले पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाल्यानंतर काही दिवसांनीच ही घोषणा झाली आहे.

या यशस्वी मानांकनानाच्या माध्यमातून, भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृती मंत्र्यानी 40 किंवा त्याहून अधिक जागतिक वारसा स्थळ असलेल्या देशांचा उल्लेख केला ज्यात भारताव्यतिरिक्त यामध्ये इटली, स्पेन, जर्मनी, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

जागतिक वारसास्थळांच्या यादीत 2014पासून भारताने 10 नवीन जागतिक वारसास्थळे  कशी समाविष्ट केली आणि हे भारतीय संस्कृती, वारसा आणि भारतीय जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांची दृढ वचनबद्धताही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केली.

धोलाविरा या हडप्पा संस्कृतीतील शहराविषयी माहिती

धोलाविरा, हे हडप्पा संस्कृतीतील शहर, दक्षिण आशियातील, अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, याठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील, नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलाविरा हे साक्षीदार आहे. एवढेच नाही, तर त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते.

धोलाविरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागर वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते.

धोलाविरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञानदृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. आणखी एक विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

धोलाविरा हे प्रागैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. (या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृती आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात) या स्थळी, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या बहु-सांस्कृतिक आणि विभाजित संस्कृतीचे पुरावे आहेत. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात.

हे शहर, सुमारे 1500 वर्षे अत्यंत समृद्ध वसाहत होते, ज्यातून, एका प्रदीर्घ आणि सलग अधिवासाचे पुरावे आपल्याला मिळतात. खोदकामात मिळालेले अवशेष, ही वसाहत वसल्याचे, त्याचा विकास, भरभराट आणि नंतरच्या काळात झालेला ऱ्हास या सर्वांचे पुरावे आपल्याला मिळतात. त्याशिवाय, नगर म्हणून स्थापत्यशास्त्र आणि विविध बांधकामे आपल्याला दिसतात.

हडप्पा संस्कृतीच्या नागरी रचनेचेही हे एक अद्वितीय उदाहरण आहे. शहर वसवण्याच्या आधीच केलेले नियोजन, बहुस्तरीय तटबंदी, अत्यंत सुनियोजित, सुबक जलाशये आणि सांडपाणी व्यवस्था आणि बांधकामासाठी दगडाचा वापर, हे सगळे पुरावे, आपल्याला मिळतात. या वैशिष्ट्यांमुळेच संपूर्ण हडप्पा संस्कृतीत धोलाविराचे स्थान एकमेवाद्वितीय ठरले आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्ल्यांमध्ये आढळते. धोलाविरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे की, “या बातमीने अत्यंत आनंद झाला. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते आणि हा आपल्या भूतकाळाशी संबंधित असलेला सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणार्‍यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे.”

जी किशन रेड्डी यांनी ट्विट केले आहे की, “धोलाविरा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट भारतातील 40वा खजिना आहे, हे माझ्या देशवासीयांना सांगताना मला खूप अभिमान वाटतो. जागतिक वारसास्थळांच्या उत्कृष्ट-40 गटात आता आम्ही प्रवेश केला असून भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे”.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content