Friday, October 18, 2024
Homeमाय व्हॉईसदेवेंद्रभाऊ, तुम्ही चित्रपट...

देवेंद्रभाऊ, तुम्ही चित्रपट बनवाच!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसे आणि असेही हुशारच आहेत. कधी शब्दात सापडत नाहीत आणि समजा सापडले तर लगेचच निसटून जातात, साबण लावलेल्या हातातून! तसे पाहिले तर अभिनेता आणि नेता यांचे संबंध घानिष्ठ आहेत. अभिनेत्याकडे विशेषण असते आणि नेत्याकडे तर अनेक विशेषणे जणू हात जोडून उभीच असतात. जसे प्रसंग तसे विशेषण. जसे ‘एकच वादा, देवेंद्र दादा’ किंवा विरोधकांना ‘चारी मुंड्या चीत करणारे देवेंद्रभाऊ’ इत्यादी इत्यादी…!

अभिनेता – नेता आठवण्याचे कारण म्हणजे दोनच दिवसांपूर्वी धर्मवीर-2च्या एका समारंभात गृहमंत्र्यानी केलेले विधान! धर्मवीर 1 आणि 2ची संकल्पना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कल्पनेतून साकारलेली आहे हे सर्वांना माहीतच आहे. यावेळी बोलताना देवेंद्रभाऊ म्हणाले की “मलाही एक सिनेमा बनवायचा आहे. सध्या नाही. वेळ आहे त्याला. परंतु त्या सिनेमात अनेकांचे मुखवटे मी टराटरा फाडून त्यांचे खरे रूप जनतेला दाखवणार आहे.”

भले भले चांगलेच होईल की! कारण देवेंद्रभाऊंना राजकीय वारसाही आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्या घरात व आजूबाजूला राजकारण पाहिलेले आहे. शिवाय हिंदूंचे पंढरपूर समजले जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मुख्यालयही नागपुरातच आहे. त्याच्या अंगणातही देवेंद्रभाऊ बागडले आहेत. राजकारणात तर ते अनेक वर्षे आहेत. मुख्य म्हणजे ते भूतपूर्व मुख्यमंत्री होते. गृहमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. सध्या ते उपमुख्यमंत्री असले तरी सर्व राज्यशकट तेच सांभाळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथराव विराजमान होईपर्यंत अनेक नाट्यमय घटना घडलेल्या आहेत व त्याचे एकमेव साक्षीदारही देवेंद्रभाऊच आहेत!

हा कालावधी कदाचित कमी असेल. परंतु मातोश्री बंगल्याशी त्यांचा दोस्ताना पुराना आहे! तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्यांची दोस्ती जगजाहीर होती. ठाकरे आणि फडणवीस यांनी परस्परांनी तोंडातून शब्द काढायचा अवकाश की सारे ‘खमोश’ होऊन जात असत. यांचे अनेक किस्से मातोश्री व सागर तसेच वर्षा बंगल्याच्या आजूबाजूला अजूनही ‘रुंजी’ घालत असतात. यात भर म्हणूनच की काय महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते. म्हणजे नाट्यमय प्रसंगांचा खजिनाच जणू!! मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त परमवीर सिंग, अभिनेता सुशांत सिंग याची आत्महत्त्या, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवलेली स्फोटके, यात भर म्हणूनच की काय पोलिसांकडून 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप, सचिन वाझे प्रकरण… एकूणच नाट्यमय प्रसंगाना कमी नाही.  याला जोड म्हणून राजकीय तडका असणारच. म्हणजे काय मज्जाच मज्जा!!

याचा सरळ अर्थ इतकाच की धर्मवीरचे दोनच भाग झाले मग खऱ्या ‘होममिनिस्टर’चे पाच-सहा भाग कुठे गेले नाहीत. त्यात दिल्लीचे राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाह आदींचा समावेश करायचा ठरले तर दहा भाग नक्कीच होतील. आहे काय आणि नाय काय? “आज राजनीती मे नेताओंके वायदोसे, कोई भी यह नहीं तय कर सकता की कितनी सच्चाई है इन वायदोमें, कितनी वास्तविकता और कितना अभिनय?” (डी पी कुशवाह) असं म्हटल जात असलं तरी देवेंद्रभाऊंकडे विविध अनुभवांचा खजिनाच आहे. त्यात गृहमंत्री आणि दिल्लीचे लाडके नेते याचा दुहेरी फायदा होऊन देवेंद्रभाऊंचे अनुभव समीक्षकांच्या भाषेत बोलायचे तर ‘बहुपेडी’ झाले आहेत. त्यातच गृहमंत्री आणि तेही मोहमयी व बहुरंगी तसेच बहुढंगी मुंबापुरीचे!! म्हणजे विविध अनुभव जणू पैंजणाच्या तालावर रुंजीच घालत असणार!!

हे सर्व मनात आणि कागदावर उतरवताना काय तो महेश मांजरेकरांचा शब्द ‘जॉनर’.. मराठी चित्रपटांचा ‘कॅनवास’ किती मोठा असेल. देवेंद्रभाऊ याची कल्पनाच करवत नाही हो!! “An actor has to burn insight and with an outer earn”मध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही आतल्या आत बराच काळ जळला असालच! शेवटी आपल्या संस्कृतमध्येही म्हटलेले आहेच की कमालीचा शोक ‘श्लोक’ होतो तसेच काहीसे म्हणा ना!! केवळ शब्दांच्या अर्थावर जाऊ नका भाऊ, भावनांको समझो..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीसठाणी, कानिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ अधिकारी, आयपीएस अधिकारी, गृहसचिव यांच्याशी आपला अत्यन्त जवळून संबंध आला आहे. ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील जीवघेणी स्पर्धा, पोलीस आयुक्तांपासून अनेक अधिकाऱ्यांनी जमा केलेली ‘माया’ आणि लावलेली ‘माया’ आपल्यापासून काहीच लपलेले नाही. आमदारांचे तसेच खासदारांच्या संभाषणातील काही रोखींचे व्यवहार व सोयींचे व्यवहारही आपल्या कानावरून गेले असतीलच. या सर्वांचा लेखाजोखा तुमच्याकडे तयार असेलच. मग उशिर कशाला? लगेचच कामाला लागा. मुख्यमंत्री बघा किती बिझी असूनही सकाळी सात वाजल्यापासून बाहेर चक्रीप्रमाणे फिरत असूनही त्यांनी चित्रपटाचे दोन भाग पूर्ण केले आणि भाऊ तुम्ही अजून विचारच करताहे… हे बरोबर नाही. तुमची भूमिका पडद्यावर कोण करेल याचा फैसलाही बॉम्बे टाइम्सने केल्याचे सूचितही केलेले दिसते. खरंखोटं देवेंद्रभाऊच जाणे!! आता माझी चक्री थांबवण्याची वेळ आलेली आहे. तरीही जाता जाता कुसुमाग्रज यांची एक कविता…

“काळोखाचा सागर

कितीही अफाट असला

तरी त्यात

प्रकाशाची बेटं असतातच

हा सागर सनातन

आणि ही बेटही सनातानच

म्हणून अखेरी मीच

ठरवायचं

की काळोखाच्या लाटांवर

वाहत जाणारा

पराभूत नावाडी मी व्हायचं

की प्रकाशाच्या बेटावर

सूर्यकिरणांची लागवड करणारा

शेतकरी” (अप्रकाशित)…

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...

बाबा सिद्दीकींची हत्त्या दीड एकराच्या भूखंडासाठी?   

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या (पू.)च्या एका टोकाला असलेल्या साकीनाका विभागातील झोपड्या व छोट्या कारखाने तसेच गॅरेजनी किचाट झालेला सुमारे...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे बिष्णोई गँग की एसआरए? 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात येतो ही खरोखरच लाजिरवाणी घटना आहे. त्याहीपेक्षा संतापजनक गोष्ट म्हणजे तपास होण्याआधीच खून...
Skip to content