Homeमुंबई स्पेशल... तर इमारत...

… तर इमारत बांधताना ‘मियावाकी वन’ बंधनकारक!

मुंबईतल्या हरित क्षेत्रात वाढ होण्यासाठी १० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील इमारतीचे बांधकाम करताना विकासकाला मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; यासाठी पालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील पर्यावरणावर अत्यंत सकारात्मक परिणाम करणाऱ्या या निर्णयांतर्गत १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात ‘मियावाकी वन’ (Miyawaki Plantation / Urban Forest) विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यंत कमी जागेत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या या पद्धतीमुळे महापालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ (LOS : Layout Open Space) असणे बंधनकारक आहे. यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या आकाराचे ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे ‘मियावकी वन’ विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात येणार आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला ‘बांधकाम परवानगी’ (आय ओ डी / I.O.D.) विषयक अटींमध्ये मियावाकी वन विकसित करण्याच्या अटींचा समावेश करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या या वनांमधील झाडे अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. साधारणपणे २ वर्षांत विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर कमी असल्याने ती घनदाट असतात.

या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई महानगराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content