Saturday, July 27, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटभारत व मंगोलियातले...

भारत व मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध होणार आणखी सुदृढ

भारत आणि मंगोलियातले संरक्षणविषयक संबंध अधिक सुदृढ करण्याच्या उद्येश्याने या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांच्या संयुक्त कार्यकारी गटाची दोन दिवसांची 12वी बैठक काल मंगोलियाची राजधानी उलानबातर इथे समाप्त झाली. भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे स्टेट सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल गानखुयाग दावगदोर्ज या दोघांनी या बैठकीचे सहअध्यक्षस्थान भुषवले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

संयुक्त कार्यकारी गटाच्या या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण क्षेत्रविषयक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनाही निश्चित करून त्या दिशेने कार्यवाही सुरु करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या भूराजकीय परिस्थितीबद्दलच्या परस्परांची मते जाणून घेतली.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव अमिताभ प्रसाद यांनी भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राची क्षमता यावेळी अधोरेखित केली. मंगोलियाच्या सशस्त्र दलांसोबतची भागिदारी  फलदायी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंगोलियानेही भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्राच्या क्षमतेप्रती विश्वास व्यक्त केला. दोन्ही देशांच्या या प्रमुख प्रतिनिधींनी परस्परांमध्ये दृढ होत असलेल्या संबंधांची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

भारताच्या  संरक्षण मंत्रालयाचे  सहसचिव अमिताभ प्रसाद आणि भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे यांनी मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी. बयारमगनई यांचीही भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाने उलानबातर इथल्या प्रशिक्षण संस्थेला भेट दिली आणि तिथे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांचाही आढावा घेतला.

मंगोलियासोबत भारताचे जुने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांना परस्परांचे ‘आध्यात्मिक शेजारी’ मानतात. सध्याच्या आधुनिक काळात लोकशाही, स्वातंत्र्य आणि बाजारआधारित अर्थव्यवस्था यांसारख्या मूल्यांनी दोन्ही देशांना परस्परांच्या अधिक जवळ आणले आहे.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!