धर्मवीर आनंद दिघे वयाच्या पन्नाशीतच गेले. हे काही जग सोडून जाण्याचे वय नक्कीच नसते. दिघेंसाहेबांच्या पुढे राजकारणाचा मोठा पट अजुनी कोरा होता. त्यांच्यापुढे त्यांचे धर्मकार्य उभे होते. प्रचंड मोठे सामाजिक कामही त्यांची वाट पाहत होते. पण अचानक त्यांनी एक्झिट घेतली. एका मोठ्या नेत्याचे असे अचानक जाणे हे धक्कादायक होते. त्यांच्या प्रचंड मोठ्या संख्येने असणाऱ्या पाठिराख्यांसाठी अत्यंत वेदनादायीही होते. दिघेसाहेब 26 ऑगस्ट 2001 रोजी गेले तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री (आणि कदाचित भावी मुख्यमंत्री) तसेच देशाचे ग्रामविकास मंत्रीपद जेमतेम अठरा दिवस सांभाळून गोपीनाथ मुंडे यांचे मरण 3 जून 2014 रोजी ओढवले. या दोन्ही नेत्यांच्या मरणात काही साम्यस्थळे आहेत, त्यांच्या मरणाबाबत गूढकथा पसरवण्याचेही उद्योग सारख्याच पद्धतीने झाले आहेत.
वीस वर्षांपूर्वी ठाणे महानगरात एकच विख्यात रुग्णालय होते. ते होते रेमंड कंपनीच्या जे. के. परिसरातील सिंघानिया हॉस्पिटल. तिथेच दिघेंवर उपचार सुरू होते. 26 ऑगस्ट 2001 रोजी पहाटे त्यांना अपघात झाला होता. ठाण्यातील वंदना परिसरात त्यांची गाडी अपघातग्रस्त झाली. लगेचच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सिंघानिया रुग्णालयातच नेले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण दुपारी 3च्या सुमरास हृदयक्रिया बंद पडून (कार्डिअक फेल्युअर) त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
काही वेडसर मंडळींनी त्यांच्या शोकसंतप्त पाठिराख्यांना भडकावण्याचे काम केले. जमावात येऊन बडबड सुरू केली. आता आतापर्यंत साहेब चांगले होते. माझ्याशी बोलले. या हॉस्पिटलनेच त्यांना मारले.. आणि जमावाचा उद्रेक झाला. सिंघानियांनी उभे केलेले मोठे सुसज्ज रुग्णालय त्या रात्री जाळले गेले. आतल्या रुग्णांना वाचवून, स्वतःचे जीव वाचवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना, डॉक्टर मंडळींना, मोठी कसरत करावी लागली.
त्यावेळी राज्याचे गृहमंत्री छगन भुजबळ होते. त्यांनी व मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीचा अहवालही तयार झाला. एका-दोन पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या गेल्या. पण ज्यांनी जमावाला भडकवण्याची कामगिरी केली, त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई वगैरे काहीही झाली नाही. ठाणेकर मात्र एका चांगल्या सुसज्ज रुग्णालयाला कायमचे मुकले. पुढे अनेक वर्षांनंतर ज्युपीटर रुग्णालय आणि डॉ. भानुशालींचे कौशल्य यांच्या रूपाने ठाणेकरांना चांगली रुग्णालये मिळाली. पण तोवर एक उणीव जाणवत राहिली.
हा सारा विषय आता पुढे येण्याचे कारण म्हणजे हजारो ठाणेकरांसाठी दैवताचे रूप घेतलेल्या दिघे साहेबांच्या मरणाबाबत वेडीवाकडी विधाने करणारे, एकापरीने मरणाचे विडंबन करणारे काही व्हीडिओ काही प्रसिद्धीलोलुपांनी प्रसृत केले आहेत. ते समाजमाध्यमांतून फिरवण्याचाही उद्योग सुरू आहे. त्यांची नावे घेऊन त्यांच्या शिरपेचातील फिती वाढवण्याचे कारण नाही, पण दिघे साहेबांच्या मरणावर जे शिंतोडे उडवले गेले त्याचा समाचार घेणे गरजेचे आहे. आनंद दिघे यांच्या मरणाशी राज ठाकरे आणि नारायण राणे (ज्यांनी रुग्णालयाला त्या दुपारी भेट दिली होती) यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आहे. ते सर्वथा गैर आहे.
राज व राणेंनी म्हणे दिघेंना रुग्णालयातच मातोश्रीचा निरोप दिला. त्यांनी म्हणे सांगितले की तुमचे जिल्हाप्रमुखपद काढण्याचे ठरले आहे, तुम्ही राजीनामा द्या. असला निरोप ते गंभीर अपघातात सापडलेले असताना मातोश्रीवरून दिला जाईल असे मानणे हेच मुळात आचरटपणाचे ठरते. आनंद दिघे हे संघटनेचे मोठे नेते होते. ठाणे जिल्ह्यात शिवसेना संघटना वाढवण्याचे, विशेषतः ग्रामीण ठाण्यात सेना नेण्याचे मोठे काम त्यांनी केले होते. ठाणे महापालिकेत शिवसेनेचा दरारा कायम ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पण 2000पासून त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्याचे, त्यात बदल करण्याचे प्रयत्न संघटना स्तरावर सुरू होते यातही शंका नाही. त्यांच्या हयातीतच त्यांच्या जोडीला आणखी एक अतिरिक्त जिल्हाप्रमुख नेमण्याच्याही हालचाली सुरू झालेल्या होत्या.
दिघेंच्या मागे चौकशांची प्रकरणेही सुरुच होती. 1989मधील महापौर निवडणुकीवेळी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या पारड्यात मते टाकली होती. त्यातील एक श्रीधर खोपकर यांचा खून झाला होता. त्या प्रकरणात दिघेसाहेबांना तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यांच्याविरोधात टाडासारखा गंभीर कायदा लावला होता. पण त्यातून ते जामिनावर बाहेर आले होते. खोपकर खून खटला मात्र त्यांच्या मृत्यूपर्यंतही संपलेला नव्हता.
दिघेंच्या कार्यपद्धतीविषयी शिवसनेच्या वरिष्ठ वर्तुळात नाराजी नक्कीच होती. पण ते रुग्णालयात उपचार घेत असताना मातोश्रीचा निरोप घेऊन राज ठाकरे व नारायण राणे तिथे गेले ही शुद्ध लोणकढी थाप आहे. दिघेंसारख्या कडव्या व झुंजार नेत्यावर उपचार सुरू असताना तिथे असले निरोप घेऊन वरिष्ठ नेत्यांना पाठवून त्यांचा जिल्हाप्रुमुखपदाचा राजीनामा बाळासाहेब मागतील ही कल्पनाही करवत नाही. बाळासाहेबांकडे असणारी आपुलकी, माणुसकी व कार्यकर्त्यांचे प्रेम यामुळे त्यांनी तसे काही नक्कीच केले नसणार याची खात्री जुने सैनिक देतात. तरीही राज व राणेंच्या भेटीचा व दिघेंच्या कालांतराने झालेल्या प्राणोत्क्रमणाचा अर्थाअर्थी संबंध जोडण्याचा उद्योग काही मंडळींनी तेव्हाही करून पाहिला व आता दिघे साहेबांच्या मृत्यूला वीस वर्षे होत असतानाही तेच केले जात आहे, याचे वैषम्य शिवसैनिकांना वाटत आहे.
त्यावेळी रुग्णालयात दिघे साहेबांच्या जवळ असणारे लोक सांगतात की असला काही प्रकार झाला नव्हता. राज व राणे हे केवळ दिघेंच्या प्रेमापोटी व काळजीपोटीच त्यांना भेटायला येऊन गेले होते. उद्धव ठाकरेही नंतर उशिरा सायंकाळी सिंघानिया रुग्णालयात आले होते. पण तोवर दिघेंची प्राणज्योत मालवली होती. तिथे जमलेल्या मोठ्या जमवाला काबूत ठेवणे, शोकसंतप्त सहकाऱ्यांना आवरणे हे नंतर कोणाच्याच हाती उरले नव्हते आणि एका मोठ्या नेत्यांच्या मरणानंतरचा, रुग्णालयालाच आग लावण्याचा, दुर्दैवी प्रकार घडून गेला.
जेव्हा एकादा लोकप्रिय व मोठा नेता अचानक जातो, तेव्हा त्यांच्या समर्थकांना पाठिराख्यांच्या डोक्यात संशयाची अनेक भुते नाचतच असतात. गोपीनाथ मुंडे यांचे निधन हा अलिकडच्या ताज्या इतिहासातील असाच एक दुर्दैवी प्रसंग होय. मुंडे साहेब हे दिल्लीत मंत्रीपदाची शपथ घेऊन जेमतेम सतरा-अठरा दिवस उलटले होते. मुंबईचे विमान पकडण्यासाठी निघालेले असताना 3 जूनच्या पहाटे दिल्लीच्या रिकाम्या रस्त्यांवरही विचित्र अपघातात मरण पावले. राजकारणातील त्यांच्या प्रगतीकडे अपेक्षेने पाहणारे त्यांचे मित्र अन् समर्थक अचंबित झाले. कारण शरीरावर अपघाताची कोणतीही बाह्य खूण दिसत नसतानाही मोटार अपघातात मुंडेसाहेब दगावलेच कसे असा प्रश्न समर्थकांना छळत राहिला. त्यांच्या गाडीच्या चालकालाही फार काही लागले नव्हते. गाडीत दोघेच होते. पण तो वाचला, मग मुंडे साहेबच कसे काय गेले?
लोकांच्या मनातला सारा शोक व संताप दुसऱ्या दिवशी परळी गावातील अंत्यसंस्कारावेळी प्रकटला. त्यांच्या वेड्यापिश्या झालेल्या समर्थकांनी भाजपाच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांवर परळीत दगडपेक केली होती. पृथ्वीराज चव्हाणांपासून ते गडकरींपर्यंत अनेकांना जनतेच्या रोषाशी सामना करावा लागला होता. पण 2014च्या जुलैमध्ये विख्यात डॉक्टर व मुंडे साहेबांचे मित्र तात्याराव लहाने यांनी मुंडे साहेबांच्या मृत्युबाबतचे सत्य पत्रकारांना विधानभवनात उलगडून दाखवले होते. मोटारीत मागच्या सीटवर बेसावध बसलेल्या मुंडे साहेबांच्या मानेला असा विचित्र झटका त्या अपघातात बसला होता की त्यांच्या श्वसनलिकेला व मानेच्या मणक्याला गंभीर अंतर्गत इजा झाली होती. ती बाहेरून दिसून येत नव्हती. अचानक अपघाताने मणका तुटण्याचा तो प्रकार होता व त्यात प्राण जाणे हे अपिरहार्य होते.. अशाप्रकारे डॉक्टर लहानेंनी तेव्हा सांगितले होते.
पण जनतेच्या मनात दिल्लीतील भाजपा नेत्यांपासून ते मुंबईतील तत्कालीन राज्यकर्त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांपर्यंत अनेकांच्या बाबतीत संशय व राग खदखदत होता. मुंडेंच्या मृत्यूबाबतीतही संशयाची अनेक भुते उभी केली गेली. त्यात जसे तथ्य आढळले नव्हते तसेच ते दिघे साहेबांच्या अपघाती निधनातही नव्हते. उगीच जुने वादग्रस्त मुद्दे उकरून काढून काहींची प्रसिद्धीची हौस व गरजही भागेल, पण दिघेंना आजही मानणारा, त्यांच्या आठवणीने हळवा होणारा, त्यांच्या आठवणी विसरू न शकणारा मोठा वर्ग आहे. तो मात्र अधिक दुःखी होईल. खरेतर असे कोणी काही करू नये, बोलूही नय. हे उत्तम!
चांगली माहिती.