Homeएनसर्कलयशवंतराव चव्हाण यांची...

यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि यंदाचा “हेमांगी”!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची उद्या ३७वी पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या या दिवंगत नेत्याने पाहिलेले आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यांच्याच नजरेतून पुन्हा पुन्हा पाहवे लागेल, असे बजावताहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यंदाच्या “हेमांगी”, या दिवाळी अंकाततून!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर झालेल्या दिवाळी स्नेहसंमेलनात “हेमांगी” दिवाळी अंकाचे नुकतेच औपचारिकरित्या प्रकाशन झाले.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राची प्रखर बौद्धिक परंपरा आणि सांस्कृतिक संपन्नता पुन:प्रस्थापित करण्यासाठी विचारवंत, साहित्यिक, उद्योजक आदींचा राज्यातील राजकारणात आणि समाजकारणातील सक्रिय सहभाग वाढण्याच्या आवश्यकतेवर भर देणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांचे परखड संपादकीय आणि “महाराष्ट्राची एकसष्टी” या अंकाच्या मध्यवर्ती संकल्पनेला न्याय देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख “हेमांगी” दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे.

देश महासत्ता बनण्यासाठी झेपावत असताना महाराष्ट्राला मागे राहून चालणार नाही असे बजावताना कुलकर्णी यांनी, महाराष्ट्राला खरोखरच पुढे जावयाचे असल्यास ६० वर्षे मागे जाऊन यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यांच्या नजरेतून पुन्हा पुन्हा पाहवे लागेल असे बजावले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्त्वसंपन्नतेचा उल्लेख इतर काही लेखातही ठळकपणे आला आहे.

हेमांगी

मुकुंद कुळे (लोकवांड्मयाचा अंध:कार), सतीश तांबे (तुडुंबले ते तुंबलेले साहित्य), मीनाक्षी पाटील (दृश्यकलाबाबतची सार्वत्रिक अनास्था), मुकुंद संगोराम (भवितव्य अभिजात संगीताचं), राजीव जोशी (नाट्यपरंपरा), गणेश मतकरी (चित्रपट), नीलेश अडसूळ (लोककला), प्रभाकर ढगे (महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचे मिथक) आदींचे लेख कलाप्रेमी सुजाण वाचकांना अस्वस्थ करतील.

प्रदीप पुरंदरे (पाण्याला लागली तहान), सुरेश वांदिले (महाराष्ट्राची साठी- काठावर पास की थेट अनुत्तीर्णच), दिलीप चावरे (रोजगार हमीची दुर्दशा) हे लेख महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर कोरडे ओढणारे आहेत. याच विभागातील सुषमा शाळिग्राम, श्रीराम पचिंद्रे, विजय चोरमारे, विनायक पात्रूडकर, प्रा. प्रदीप पेंडसे, डॉ. चंद्रहास देशपांडे, एड. शफी काझी आदींचे लेख मुळातून वाचायला हवेत.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महिला शेतकरी एक वेगळीच क्रांती करीत आहेत. तिचा वेध घेणारे लक्ष्मीकांत माळवदकर आणि नाटककार श्याम पेठकर यांचे लेख आवर्जून वाचण्याजोगे आहेत.

याखेरीज, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक उन्मेष वाघ यांची प्रकाश कुलकर्णी आणि अनिकेत जोशी यांनी घेतलेली विशेष मुलाखत हेही “हेमांगी”चे एक आकर्षण ठरले आहे. कोरोना महासाथीच्या काळातही हे महत्त्वाचे बंदर कार्यरत ठेवून आपण देशाचे अर्थचक्र फिरते ठेवण्यास कसा हातभार लावला याची वाघ यांनी तपशीलवार माहिती दिली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजे देशाची ऊर्जा वाहिनी. सार्वजनिक क्षेत्रातील या नवरत्न कंपनीनेही कोरोना महासाथीचे आव्हान अत्यंत समर्थपणे पेलले. कंपनीच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी अधिकारी सिध्दार्थ शंकर बोस यांची यसंदर्भातील मुलाखत विशेष वाचनीय झाली आहे.

कोरोना महामारीने संबंध देशाचे अर्थचक्र ठप्प केले. पण, या काळात महाराष्ट्रात उद्योग विकास आणि रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आले अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या लेखात दिली आहे.

रविप्रकाश कुलकर्णी यांनी अलीकडेच दिवंगत झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक रंजक आठवणींना दिलेला उजाळा, डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांनी चितारलेले त्यांच्या आप्पांचे- आजोबांचे हृद्य व्यक्तिचित्र, उदय कुलकर्णी यांनी उकललेली नेल्सन मंडेला यांची महत्ता, डॉ. वासंती फडके यांनी सांगितलेली प्रेमासाठी सिंहासन सोडणाऱ्या आठव्या एडवर्डची कथा, प्रशांत कुलकर्णी यांनी रेखाटलेले व्यंगचित्रकलेचे वेगळे वळण, उमा कुलकर्णी आणि संग्राम गायकवाड यांच्या आगामी कांदबऱ्यांतील एकेक प्रकरण आणि नामवंतांच्या भरपूर कविता, असा भरगच्च साहित्यिक ऐवज या अंकात वाचायला मिळतो.

शेवटी आवर्जून उल्लेख करायलाच हवा तो समीर समूद्र यांनी हळुवारपणे सांगितलेल्या त्यांच्या अनुभवांचा. समीर आणि अमित गोखले या सुविद्य उद्योजक युवकांनी केलेल्या समलिंगी विवाहाकडे पुण्यासारख्या कथित प्रगत शहरानेही उदारमतवादाने पाहिले नाही, हे बुरसटलेल्या मनोवृत्तीचे प्रतिक मानायचे का?

चित्रकार संतोष पेडणेकर यांनी मराठमोळ्या सौंदर्यवतीला कलात्मकतेने मुखपृष्ठावर विराजमान केले आहे.

संपादक: प्रकाश कुलकर्णी

पृष्ठेः २०८, किंमतः रु. २००/-

Continue reading

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर...

महाराष्ट्रात ‘लॉकडाऊन’?

पश्चिम आशियातील युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशभरात एकच खळबळ उडाली. "ऊर्जा संकट गहिरे होतेय, सरकार कठोर उपाययोजना करणार" या आशयाचे संदेश सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि त्यातूनच पुन्हा लॉकडाऊन येणार, अशी बेछूट अफवा काही...
Skip to content