खरंतर फेरीवाल्यांसबंधी लिहायचं तर संपूर्ण मुंबईसाठी लिहावं लागेल व तो एक न संपणारा प्रचंड मोठा ग्रंथच होईल, अशी भीती वाटते. शिवाय मुंबईतील फेरीवाल्यासंबंधी विचारासाठी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर आधीच आहे. त्याची सुनावणीही सुरु आहे. ती विविध कारणास्तव लांबत आहे हे तितकेच खरे आहे. गेल्या काही दिवसांत परळ, दादर पूर्व व भोईवाडा पोलीसठाण्याच्या परिसरात जाण्याचा योग आला. दादासाहेब फाळके मार्ग, केइएम रुग्णालय परिसर तसेच भोईवाडा पोलीसठाण्याच्या आसपास असलेला सदकांत ढवण मैदानाचा परिसर आदी भागात चारपाच दिवस मिळून सुमारे १५/२० तास तरी घालवले असतील. त्यानंतर यावर लिहिण्याकरीता हात शिवशिवले नसते तरच नवल.
खरंतर मुंबईकरांना फेरीवाला हा शब्द वा फेरीवाले नवीन नाहीत. सुमारे २५/३० वर्षांपूर्वी हे फेरीवाले (कदाचित त्याच्या आधीही) आले व आता तर फेरीवाला हा मुंबईचा एक अविभाज्य घटकच होऊन बसलेला आहे किंवा असे म्हणू या मुंबईकरांनीच त्याला अविभाज्य बनवले आहे. फाळके मार्गांवरील माफियागिरी, खरंतर फेरीवाला हा विषय डोक्यातच नव्हता. परंतु दोन-चार दिवस दादर (पू.) रेल्वेस्थानकावरून कैलास लस्सीवाल्याच्या दारावरून फाळके मार्गांवर शिरताना जी कसरत करावी लागते आणि ही कसरत फाळके मार्ग संपेपर्यंत सुरु ठेवावी लागते तेव्हा खरोखरच संयम संपतो. फाळके मार्गांवर नेहमीच कापड-साड्या खरेदीसाठी गर्दी असतेच. त्यात नवीन नाहीच. दोन्ही बाजूला दुकाने, त्यांच्यासमोर अगदी छोटा पदपथ, त्यावरही फेरीवाले तसेच पदपथ सोडून पुढे पाच फूट पुन्हा फेरीवाल्यांचेच!
सहाजिकच खरेदीसाठी आलेली गर्दी रसत्यावरूनच पाहत पाहत चालत असते. या फाळके मार्गावरील गिनेचुने दोन-तीन दुकाने सोडून एक आश्चर्यच दिसले! दुकानासमोर फेरीवाला नाही, इतकेच नव्हे तर दुकानासमोरील रस्ता अगदी मोकळा! मनात विचार आला आपली छोटी गाडी येथे सहज पार्क करता येऊ शकेल. ड्राइव्हरला तशा सूचना देऊन मी खाली उतरून पदपथावर उभा राहिलो. तोच मागून आवाज आला. ‘काका गाडी लावू नका, टो करून घेऊन जातील. मी म्हटले बरे, मी दंड देईन. तोच बाऊन्सरटाईप दोन बॉडीबिल्डर त्या आवाज देणाऱ्या माणसासमोर उभे राहिले आणि त्यांची काहीतरी नेत्रपल्लवी झाली. तोपर्यंत मी दंड भरायला मागेपुढे पाहणार नाही असे जरा जोरात सांगितले. आणि ठणकावून सांगितले की कोण येतो ते मी पाहीन. दहा-पंधरा मिनिटांत मी जाणारच आहे हे ऐकताच टोईंगचा सुका दम देणाऱ्याच्या आवाजाची पट्टी चावी फिरवल्याप्रमाणे अगदी कमी झाली.

मग मी सुमारे अर्धा तास त्या गल्लीत दोनतीन फेऱ्या मारल्या. तेव्हा समजलेली माहिती धक्कादायक होती (मला तरी). या गल्लीतील काही दुकानदार व काही समाज कार्यकर्ते (?) दुकानासमोरील पदपथ व रस्त्यावरील जागा भाडेतत्त्वावर बोलीने देतात. मध्ये कुणी घुसायचा प्रयत्न केला तर त्याला अर्धमेला करतात. अशाप्रकारे संपूर्ण रस्त्याचा काही लाख रुपयांचा मलिदा अनायसे माफियाच्या हातात जातो. आणि या मालिद्यात लोकप्रतिनिधी (सर्वपक्षीय), महापालिका अधिकारी, अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांचाही वाटा असतो आणि हो पोलिसांना विसरून कसे चालेल? दादासाहेब फाळके मार्गाची जशी दशा आहे त्याहूनही बेकार अवस्था केइएम रस्त्यांची आहे. अनेक गल्ल्या एकमार्ग दिशा केल्याने तेथे लहान बस जाण्यासही सात-आठ मिनिटे लागतात. रुग्णालयाच्या तोंडाशी गाड्या पार्क केल्या जातात. फळ विक्रेत्यांचा तर उच्छाद आहे तसेच खाण्याच्या गाड्यांची तर गणतीच नाही. रुग्णालयाच्या मोठ्या पदपथावर विक्रेत्यांनी आपले पाय पसरलेले आहेत. तिच गोष्ट ढवण मैदानाच्या आसपास आहे. हा सर्व विभाग भोईवाडा पोलीसठाण्याच्या नजरेच्या टप्प्यात आहे. तरीही म्हणावी तशी कारवाई केली जात नाही, हे दुदैव असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
“They work to survive not to save” असे फेरीवाल्यांबद्दल पूर्वी म्हटले जायचे. ते काही अंशी खरे होते. पण जी दक्षिण विभागातील हे फेरीवाल्यांचे साम्राज्य पाहता हा माफियाचा उच्छाद वाटतो असे खेदाने म्हणावे लागत आहे. माझी तर उच्च न्यायालयाला विनंती आहे की, या परिसरातील फेरीवाल्यांची पाहणी करण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत म्हणजे वस्तुस्थिती अजून बाहेर येईल.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर