गेल्या १०० वर्षांत प्रथमच जागतिक साथीचा सामना करावा लागला. या महामारीला हाताळणे हे एक मोठे आव्हान होते. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेंतर्गत आम्ही केवळ लस विकसित केली नाही तर 100हून अधिक देशांना लसीचा पुरवठा करीत आहोत. जनतेवर कोविडचा कोणताही अधिभार नको, असे स्पष्ट आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. सरकारनेही अरथसंकल्पात कोविडचा अधिभार जनतेवर टाकलेला नाही. मात्र, विरोधक कोविडचा अधिभार जनतेवर टाकल्याची अफवा पसरवून देशाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी केले.
मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित सर्वस्पर्शी अर्थसंकल्प-२०२१ अभिनंदन सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. देशाच्या विकासासाठी आम्हाला एस.बी.आय.सारख्या बड्या बँकांची गरज आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर चुकवणाऱ्यांवर अंकुश ठेवला जात आहे. देशातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सनीही बनावट, फसव्या बिलांवर बारीक नजर ठेवली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक करदात्याचा पैसा देशाच्या विकास कामांमध्ये उपयोगी येईल असे सीतारामन म्हणाल्या.
यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी दिशादर्शक, मानसिकतेत बदल घडविणारा आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प आहे. करदात्यांच्या पैशातूनच सरकारी उद्योगांची उभारणी झाली आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक रूपया योग्य पद्धतीनेच खर्च व्हायला हवा, अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीने जनतेचा पैसा गुंतवला पाहिजे. त्यासाठीच केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीकरणाचे स्पष्ट धोरण देशासमोर मांडले आहे. आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यात सुसूत्रता नव्हती. मोदी सरकारने प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडले आहे. यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील, असे त्या म्हणाल्या.
गरिबांना सुरक्षा, युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्यमींना नवे अवकाश देत देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी हा कराचा पैसा वापरला गेला पाहिजे. आयात शुल्काबाबत सुधारणा प्रस्तावित आहेत. त्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली जाईल. विचारविनिमयानंतर ऑक्टोबरमध्ये याबाबतच्या सुधारणा निश्चित केल्या जाणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्वागत केले. जागतिक महामारीच्या काळातही केंद्र सरकारने सर्वोत्कृष्ट बजेट देशाला दिले आहे. या अर्थसंकल्पात देशातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी आशिष चौहान, कमलेश विकमसे, मिलिंद कांबळे, राजीव पोद्दार, श्रीकांत बडवे, कोलीन शाह तसेच स्वीडन, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व मॉरिशसच्या दूतवासातील अधिकारी उपस्थित होते.