नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयएनएस शिवाजी येथे कार्बनडायऑक्साईड आधारित अनोख्या वातानुकूलन संयंत्राचे नुकतेच उद्घाटन केले. जहाजावरील एचएफसी (हायड्रो फ्लुरो कार्बन) आणि एचसीएफसी (हायड्रो क्लोरो फ्लुरो कार्बन) आधारित वातानुकूलन प्रणालीच्या जागी हे वातानुकूलन संयंत्र बसवण्यात येणार असून अशाप्रकारचे हे पहिलेच संयंत्र आहे.
हे पाऊल 2028पासून एचएफसी आणि एचसीएफसी आधारित कृत्रिम प्रशीतक कमी करण्याच्या 2016च्या किगाली कराराप्रती भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने असून ट्रान्सक्रिटिकल CO2 आधारित वातानुकूलन संयंत्र हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. हे तंत्रज्ञान हवामान बदलाचा मुकाबला करण्याच्या जागतिक प्रयत्नांशी मिळतेजुळते असून शाश्वत हरित पर्यायांच्या दिशेने भारतीय नौदलाच्या पुढाकाराला समर्थन देते.
हे वातानुकूलन संयंत्र प्रगत डिजिटल नियमन प्रणाली आणि स्मार्ट तंत्रज्ञान संकलनाद्वारे किफायतशीर मनुष्यबळात संयंत्र चालवण्यासाठी सुसज्ज आहे. ही प्रणाली बंगलोरमधील आयआयएससीच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे, जी सशस्त्र दलांमध्ये भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या दिशेने संरक्षण-प्रशिक्षण समन्वय सुरळीत करण्याचा पुरावा आहे. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे नौदलाला केवळ अत्याधुनिक यंत्रसामग्रीच उपलब्ध होणार नाही तर व्यावसायिक वातानुकूलन आणि प्रशीतन बाजारात त्याचा व्यापक वापर करण्याची क्षमता आहे.
उद्घाटन समारंभाला आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर मोहित गोयल, प्रा. बी गुरुमूर्ती, सीईओ, एफएसआयडी, आयआयएससी बंगलोर, टाटा कन्स्लटिंग इंजिनिअर्स लिमिटेडचे एमडी, सीईओ अमित शर्मा आणि बंगलोरच्या त्रिवेणी टर्बाइन्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक अरुण मोटे हेदेखील उपस्थित होते.