प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया, निवासस्थानाजवळ मोटारीत जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणाची चौकशी चालू असतानाच या प्रकरणाशी विविध कारणांनी संबंधित असलेले चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक आणि राजकुमार कोथमिरे यांच्या थेट गोंदिया-गडचिरोलीला बदल्या करण्यात आल्या.
अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काल या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. अँटिलिया प्रकरणाचा तपास सुरूवातीला आरोपी सचिन वाझेच करत होता. नंतर त्याच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला. विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लावून धरत याप्रकरणी एनआयएच्या तपासाची मागणी केली. दरम्यानच्या काळात या प्रकरणातल्या स्कॉर्पिओ मोटारीचे मालक मनसुख हिरण यांची हत्त्या झाली. या विषयावरून वातावरण तापल्यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास दहशतवादीविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळचा आणि स्फोटकांचा विषय असल्यामुळे एनआयएने स्फोटक प्रकरणाचा तपास स्वतःहून हाती घेतला. त्यानंतरही राज्य सरकारने हिरणच्या हत्त्या प्रकरणाचा तपास स्वतःकडेच ठेवला होता. एटीएस हा तपास करत होते आणि त्या पथकांत एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांचा समावेश होता. मनसुख हिरण यांच्या हत्त्या प्रकरणातील पुरावे गोळा करण्याच्या कामात दया नायक यांचा मोठा सहभाग होता. याच प्रकरणाच्या तपासात ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाचे प्रभारी राजकुमार कोथमिरे यांचाही तितकाच सहभाग होता.
न्यायालयाच्या प्रक्रियेत मनसुख हिरण हत्त्येचा तपासही एआयएकडे गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी दया नायक आणि कोथमिरे यांनी केलेल्या तपासाची सखोल चौकशी केली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठीही बोलाविण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी चालू असतानाच सचिन वाझे यानेही एका पत्राद्वारे अनिल देशमुखांवर आरोप केले. याच वेगवेगळ्या आरोपांविरूद्ध देशमुखही न्यायालयात गेले. परंतु त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या सर्व घडामोडी चालू असतानाच शासनाने गुरूवारी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना थेट गोंदिया आणि गडचिरोलीला पाठविल्याने पोलीस खात्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
या आदेशात दया नायक तसेच राजकुमार कोथमिरे यांना ताबडतोब कार्यमुक्त करण्यास व नव्या स्थानावर हजर करवून घेण्याचे आदेश देण्यात आले असून याची अंमलबजावणी झाल्याचा अहवालही मागविण्यात आला आहे. दया नायक यांची गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत तसेच राजकुमार कोथमिरे गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षकांचे वाचक म्हणून प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.