Homeमाय व्हॉईसबेशिस्त ठाण्याला वेळीच...

बेशिस्त ठाण्याला वेळीच आवरा!

गेले दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडत असताना काही कामानिमित्त ठाण्याच्या रेल्वेस्थानक परिसरात जायला लागले होते. वेळ अर्थात संध्याकाळची! टीएमटीने सॅटिसवर गेलो तोच जोरदार पाऊस सुरु झाला. सॅटिसवर संध्याकाळी तुफान गर्दी असतेच. त्यात पावसाने सॅटिस अगदी किचाट झाले होते. सॅटिसच्या अवतीभवती चिखलाचे काळे पाणी पसरले होते. तेथील पायरीशेजारीच खड्डासदृश्य उंचसखल भाग आहे (तो तेथे किमान चार वर्षे तरी ठाण मांडून असावा, असो). एक बरे आहे की, सॅटिस बऱ्यापैकी उंचावर असल्याने तसे पाणी साचत वा तुंबत नाही. मात्र प्रत्येक फलाटच्या ठिकाणी मात्र पाणी साचून राहते. ते साफ करण्यासाठी तेथे कधीच सफाई कामगार नसतो. चौकशी करता हे कामगार संध्याकाळपर्यंत फेऱ्या मारून झाडू मारत असतात. मात्र संध्याकाळ झाली की मात्र गायब होतात, ते सकाळीच उगवतात. तेही आठ-साडेआठ वाजेपर्यंत.. व कामाला सुरुवात होते नऊ वाजेपर्यंत!

हे इतके विस्ताराने इतक्यासाठीच सांगितले की, त्या जमलेल्या काळ्या पाण्यामुळे नागरिकांचे पाय घसरून पडण्याची शक्यता असते. रेल्वेस्थानक परिसर असल्याने प्रवाशांची धावपळ नेहमीच सुरु असते. तेथील टीएमटीच्या टपरीवजा केबिनमध्ये कुणी जबाबदार अधिकारीच नसतो आणि समजा तेथे कुणी तैनात असेल तर तो त्या टपरी केबिनमध्ये का बसेल? कारण उघड आहे. टीएमटीच्या बेभारवशी बसफेऱ्यांमुळे प्रवाशी आधीच कावलेले असतात. त्यात तेथे किमान पाऊण तास वाट पाहिल्याशिवाय बसेसच येत नाहीत. सबब सुरक्षा अधिकारी वा रक्षक ही चीजच तेथे गेल्या पाच वर्षांततरी दिसलेली नाही. टीएमटी वा ठाणे महापालिकेच्या कोणी ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपली वातानुकूलित केबिन सोडून संध्याकाळी वा रात्री या सॅटिस परिसराला केव्हा भेट दिलेली होती यावरच संशोधन होण्याची गरज आहे.

याचठिकाणी याआधीही संध्याकाळी नोकरी करून परतणाऱ्या लाखो प्रवाशांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. परंतु कोठल्याच यंत्रणेने त्या व्यथा गांभीर्याने घेतलेल्या नाहीत, हे ठाणेकरांचे दुर्दैव आहे. वाहतूककोंडीमुळे सॅटिसवर बसेस लवकर येऊ शकत नाहीत असे प्रशासनातर्फे सांगण्यात येते. हे खरेही आहे. पण यावर उपाय शोधायला नकोत का? सॅटिस पुलाखालीच एसटी स्थानक आहे. मोठी जागा आहे. एसटीच्या बसेस सतत सुटत नसतात हे मी स्वतः पाहिलेले आहे, तर या स्थानकाच्या मोकळ्या जागेत अल्प काळासाठी बसेस आणून ठेवल्या तर आकाश कोसळणार आहें काय? बरे, उपमुख्यमंत्री एकनाथराव व परिवहनमंत्री प्रतापराव, दोघेही ठाण्याचेच. दोघांनाही ठाणेकरांच्या समस्या तंतोतंत कळतात म्हणे! चांगलेआहे. मग वेळ कशाला दवडता? एसटी बसस्थानकात टीएमटीला तात्पुरत्या वापरासाठी ती मोकळी जागा देऊन टाका. नाहीतरी जमिनीच्या वापरातील बदलाला राजकीय नेते त्वरितच संमती देतात, अशी धारणा आहे. तशीच याही वापरला त्वरित समंती देतील अशी आशा करूया, कारण यात ‘अर्थ’प्राप्ती नसली तरी लोकप्रियता मात्र नक्की मिळेल व ती मतांमध्ये परिवर्तीत होण्याची खात्री आहे.

सॅटिसवरून खाली ठाणे रेल्वेस्थानकात आलो तर तेथे जत्राच हॊती. तीन-चार दिशेला फुटलेले रस्ते व दर पाच-सहा मिनिटांनी फलाटावर 10 ते 15 हजार प्रवासी नोकरदार टाकणारी लोकल गाडी. यांना फलाट सोडायलाच पाच मिनिटे लागतात. पावसात बाहेर आलं की, घोडबंदर 200 रुपये, लोकमान्य, नितीन, चेकनाका, भास्कर कॉलनी, आनंद नगर असे ओरडणारे रिक्षावाले.. यांच्या आवाजाला न जुमानता आपल्या छत्र्या सावरत, फोनवर बोलत स्थानक परिसरातील पदपथावर चालणे म्हणजे जणू कसरतच. धो धो पडणाऱ्या पावसातही कानाचा फोन न सोडणारे धन्यच समजायला हवे. यातच थोडे अंतर चालून गेले की, गोखले रोड व तलाव पाळीकडे जाणारा नाका येतो. तेथे तर पदपथ आपले अंग अजूनच आखडून घेतात. आधीच जेमतेम दोन फुटांच्या पदपथावर फेरीवाला असतोच. त्यातून दुर्दैव म्हणजे येथील कुठलाही पदपथ चांगला नाही. अनेक ठिकाणी खड्डे आणि तुटलेल्या टाईल्स, त्यात फोनवर बोलणारे आणि गार्डनमध्ये चालत आहोत या फीलिंगने.. तोच फोनवर ‘बेबी माझं ऐक तरी’.. यावर मी म्हणालो, सायबा जरा बाजूला थांबून बेबीशी बोल. ‘त्यावर तो जोरात म्हणाला’ आजोबा मी बाजूलाच आहे. पण त्याने बोलणे काही सोडले नाही. हीच स्थिती महिला व युवतीची असते.

स्थानकातून एक चिंचोळा रस्ता / दादा पाटीलवाडी रस्ता जातो. तो इतका चिंचोळा आहे की हा रस्ता विनासुनावणी एकमार्गी करावा असाच आहे. या रस्त्यापासून स्थानकातील वाहतूकचौकी अवघ्या काही पावलांवर आहे. परंतु तेथे नेहमीच रस्ता जाम असतो. बाईक्स, स्कूटर, रिक्षा दोन्ही बाजूंनी आणि हजारो प्रवासी पायी.. यांचा मेळ होऊन दादा पाटीलवाडीला एका उरुसाचे स्वरूप येते व ही वाडी पार करणे म्हणजे दिव्य होऊन बसते. या सर्वावरून आपण अंदाज बांधलाच असेल की ठाणे शहराला नव्याने नियोजन करण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झालेली आहे. नव्याने नियोजनाची मागणी कुठलाही राजकीय पक्ष मान्यच करणार नाही. पण राज्याच्या प्रमुखांनी, मुख्य सचिवांनी राजकीय नेत्यांचे मन वळवले नाहीतर ठाणे शहरात हाहाःकार माजायला वेळ लागणार नाही. ठाणे शहरात प्रवेश केल्यापासून घरी जाण्यास लागणारा एक तास, स्थानक परिसर ओलांडायला लागणार अर्धा तास, रिक्षाच्या लाईनीत पाऊण तास, माजिवाडा चौक पार करायला अर्धा तास, कोर्ट नाका परिसर ते स्थानक जाण्यासाठी अवघी 45 मिनिटे म्हणजे सरासरी 60 वर्षांच्या आlयुष्यातील सुमारे 30 वर्षे प्रवासातच घालवायची. यातच नियोजनाची वाताहत दिसते. “Buy for the greatest and admirable form of wisdom is that needed to plan and leaving cities and home communities” हे हजारो वर्षापूर्वीचे विचार असले तरी “Do not try to make circumstances fit for your plans. Make plans that fit the circumstances” हा विचार मध्यवर्ती ठेवूनच शहाराच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे 40 लाखांच्या घरात गेली आहे. दररोज आदळणारे लोंढे पाहता ती केव्हा 59/60 लाख होईल ते आपल्यालाच समजणार नाही. म्हणून सर्वांनी जागे होऊन ठाणे शहर वाचवण्यासाठी ठोस पावले उचला.

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...
Skip to content