Homeमाय व्हॉईसआतून कीर्तन वरून...

आतून कीर्तन वरून तमाशा…

आतून कीर्तन वरून तमाशा… या म्हणीची आठवण यावी, तसं चित्र बुधवारी रात्री विधान भवनाच्या प्रांगणात होतं. फक्त कीर्तनाची जागा अर्थसंकल्पावरील विभागनिहाय मागण्यांवरील चर्चेने घेतली होती तर तमाशाची जागा हिन्दी फिल्मी गाण्यांनी घेतली होती… ती स्वर्गीय मुकेश यांनी गायलेल्या… कारण कारण कुणालाच माहीत नाही…

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही सभागृहातील आमदारांसाठी या संगीत मेजवानीसह भोजनाचे आयोजन विधान भवनाच्या आवारातच केले होते. सभागृहात सांगितले गेले त्यानुसार हिन्दी चित्रसृष्टीतले गायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम नार्वेकर यांनी आयोजित केला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला आमदारांना चांदीच्या ताटात भोजन दिल्याचा उल्लेख एका महिला आमदाराने नंतर सभागृहातच केला होता.

मुकेश यांची गाणी त्यांचे पुत्र नितीन मुकेश यांनी सादर केली. रात्री दहा वाजता ध्वनिवर्धक सार्वजनिक ठिकाणी बंद केले जावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे रात्री पावणेदहा वाजता नितीन मुकेश यांनी स्वतः गायलेले तेजाब चित्रपटातील सो गया ये जहाँ.. सो गया आसमाँ.. हे गाणे सादर केले. पुढच्या रांगेत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, त्यांच्या शेजारी अध्यक्ष राहुल नार्वेकर, त्यांच्या शेजारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि हरिभाऊ बागडे बसलेले पत्रकारांच्या दालनातून दिसत होते. तसेच काही आयएएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे नार्वेकर यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकीकडे विधानसभेत रोज अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. नाशिकहून पुन्हा एकदा लाँग मार्च विधान भवनवर यायला निघाला आहे. त्याच वेळी सरकारी कर्मचारी संपावर असल्याने अत्यावश्यक सेवा ठप्प होऊ पाहत आहेत. पण विधानभवनात संगीत कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाचे प्रयोजन काय, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची इच्छा… इतकेच उत्तर त्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिले. या कार्यक्रमाचा खर्च वैयक्तिकरीत्या अध्यक्ष करणार आहेत की करदात्याच्या खिशातून, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

वास्तविक, विधान भवन म्हणजे कायदे करण्यासाठीचे राज्यातील पवित्र मंदिर. पण विधान भवनाच्या आवारात झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत सुरू राहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहाला ध्वनिवर्धक बंद व्हायला हवा होता. पण जिस देशमें गंगा बहती है…, हे गाणे नितीन मुकेश संपवले त्यावेळी रात्रीचे दहा वाजून पाच मिनिटे झालेली होती…

तुम्ही आवश्यक म्हणालात तर मी पुरेशी…

राजकारणात कुरघोड्या नेहमीच चालतात आणि अर्थसंकल्पावरील चर्चा म्हटली की त्याचे दर्शन कायमच घडत असते. राज्याच्या २०२३-२४च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ७२ मिनिटांच्या भाषणात अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर तर दिलेच पण आर्थिक प्रत्युत्तर देतानाच विरोधकांच्या सर्व आक्षेपांना आणि टीकेला चोख राजकीय उत्तरही दिले.

विविध महामंडळांना निधी देतानाच अमुक गोष्टीसाठी नेमका निधी किती, हे समजत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. तो धागा पकडून फडणवीस म्हणाले, दादा तुम्ही केलेली टीका योग्य आहे, कारण अर्थसंकल्पात आपण मांडतो आणि नंतर प्रशासकीय मंजुरी घेऊन खर्च करतो. त्यामुळे सर्व आकडे अर्थसंकल्पात येत नाहीत. हे सांगताना फडणवीस यांनी अजित पवार यांनी महाविकास घाडीच्या काळात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील योजना आणि निधी वाचून दाखवताना अमुक कामासाठी आवश्यक निधी, तमुक कामासाठी आवश्यक निधी… असेच सांगितले होते, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली.

अजितदादा तुमचा स्वभाव कडक आहे म्हणून तुम्ही ठासून आवश्यक निधी, असे सांगितलेत. पण माझा स्वभाव मृदू आहे. त्यामुळे पुरेसा निधी, असा शब्दाप्रयोग केलेला आहे, अशी टिप्पणी फडणवीस यांनी करताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला आणि अजितदादांसह सर्व विरोधकांनीही त्यांना दाद दिली.

कीर्तन

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. ती करताना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या क्षेत्रात ६६ टक्के तर शिवसेनेच्या आमदारांसाठी अर्थसंकल्पात फक्त ३४ टक्के रक्कम दिली गेली आहे, अशी टीका केली. त्याकडे लक्ष वेधून अर्थमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, दादा तुमची टीका बरोबर आहे. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष होता. त्यांचे ५६ आमदार होते. पण तुम्ही सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिवसेनाला फक्त १५ टक्के निधी दिला होता. अजित पवार यांनी फडणवीस यांच्या या युक्तिवादावर कपाळावर हात मारून घेतला आणि पुन्हा तुम्ही मागचे काढता, अशी तक्रार केली. त्यावर दादा आता तुम्हाला ऐकून घ्यावे लागणार, अशी पुस्ती फडणवीस यांनी हसत हसत जोडली.

तुम्ही केली त्यांची कोंडी…

शिवसेनेला तुम्ही फक्त १५ टक्के निधी दिला. पण आम्ही शिवसेनेचे चाळीस आमदार आणि आमचे १०५ असूनही १४ टक्के निधी दिला आहे. आणि रामदास आठवलेंच्या शब्दात सांगायचे तर…

तुम्ही केली त्यांची कोंडी…

म्हणून तर आही मारली मुसंडी…

संत तुकाराम महाराज म्हणाले असते, देतो पोटभरी…

अजितदादा म्हणाले, बोलाचीच कढी बोलाचाच भात, जेवोनिया कोण तृप्त झाला… असे तुकाराम महाराज म्हणाले होते. ते बरोबरही आहे. पण ते संत तुकाराम महाराज महाविकास आघाडी सरकारबद्दल म्हणाले असते. संत तुकाराम महाराज आमच्या आजच्या सरकारबद्दल म्हणाले असते की, आजि देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरि…

धनंजय मुंडे यांनी हा अर्थसंकल्प कॉपी, एडिट, पेस्ट आहे, अशी टीका केली. पण हा तसा अर्थसंकल्प नसून तो कंट्रोल, अल्टर, शिफ्ट असा अर्थसंकल्प आहे, असे प्रत्युत्तर देऊन फडणवीस म्हणाले की,

इत्र से कपडोंको महकाना कोई बडी बात नही,

मजा तो तब है, जब आपके किरदारसे खुश्बू आए…

असे मुंडे म्हणाले खरे…

पण मी त्यांना इतकेच सांगतो की,

दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत

यह एक चिराग कई आंधियों पे भारी है…

मुष्किले जरूर है मगर ठहरा नहीं हूं मै

मंझिलोंसे कह दो अभी, पहुँचा नही हूं मै…

आर्थिक मुद्द्यांसह राजकीय उत्तरही फडणवीस यांनी दिले आणि नेहमीप्रमाणे विरोधकांच्या टीकेतील हवा काढून घेतली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content