Saturday, July 6, 2024
Homeमुंबई स्पेशलचवदार तळे होणार...

चवदार तळे होणार सुवर्ण मंदिराप्रमाणे सुशोभित!

महाड येथील चवदार तळ्याचे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुशोभिकरण केले जाईल आणि त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा प्रकल्प उच्चाधिकार समितीपुढे पंधरा दिवसात ठेवला जाईल, असे मंत्री उदय सामन्त यांनी आज मुंबईत विधानसभेत जाहीर केले.

प्रश्नोत्तराच्या तासात महाड येथील चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाचे काम प्रलंबित असल्याचा प्रश्न संजय गायकवाड, प्रशान्त ठाकूर, समीर कुणावार, मनीषा चौधरी आदी आमदारांनी विचारला होता. त्या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच आमदार नितीन राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या ठिकाणी वाहनतळ विस्तारित करण्याला प्राधान्य दिले जाते तितकेच चवदार तळ्याच्या कामाला द्यावे आणि दादरच्या इंदू मिल स्मारकाला द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

त्यावर उत्तर देताना सामन्त म्हणाले की, विधानसभेत निवडून आलेले सर्व २८८ आमदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्याशी संबंधित सर्व स्मारकांचे काम युद्धपातळीवर केले जाईल. त्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सांगितले की, हा प्रस्ताव उच्चाधिकार समितीपुढे जाणार आहे. पण अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम सुरू झालेले नाही.

सामन्त यांनी त्यांना उत्तर देत स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारांनीच बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर ताब्यात घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल सर्वच सदस्यांना आणि लोकांना आदरच असल्याने त्यांच्यासंदर्भातील विषयांवरून राजकारण केले जाऊ नये.

Continue reading

आनंद घ्या नंदिनी वर्माच्या ‘फ्लो ऑफ लाईफ’चा!

राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईच्या काळाघोडा येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. 'फ्लो ऑफ लाईफ' हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच ७ जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

मुंबईत फेरीवाल्यांकडून होत असलेली वीजचोरी उजेडात

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध चाललेल्या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी केलेली वीजचोरी उजेडात आली आहे. विजेच्या खांबांवरून वीजचोरी करणाऱ्या दादर रेल्वेस्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना काल पालिकेने अनेक अनधिकृत वीजजोडण्या खंडित...

दक्षिण मुंबईतल्या हिंदू मंदिरांचे जतन होणार?

मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक...
error: Content is protected !!