Thursday, September 19, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राच्या परदेश शिष्यवृत्तीच्या...

महाराष्ट्राच्या परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, नियोजन, उच्च व तंत्र शिक्षण, या विभागांमार्फत स्वतंत्रपणे परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता येण्याच्या उद्देशाने या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे.

परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. आता 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयापूर्वी बार्टी (प्राप्त अर्ज 763), सारथी (प्राप्त अर्ज 1329), महाज्योती (प्राप्त अर्ज 1453) या संस्थांमार्फत देण्यात आलेल्या अधिछात्रवृत्ती जाहिरातींनुसार आलेल्या अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण 3545 संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना 50 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेली मर्यादा 200वरून 300 इतकी करण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेली मर्यादा 100वरून 200 इतकी करण्यात आली आहे. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 55 टक्के गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान 55 टक्के गुणांसहीत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी संबंधित यंत्रणेने थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करावयाची आहे.

शिष्यवृत्ती

परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल. मात्र, या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यास सुरू असताना त्या विद्यार्थ्यास डॉक्टरेट पदवी (पीएच.डी)साठी शासननिर्णयात अंतर्भूत विषयांत दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास तो विद्यार्थी याच योजनेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र असेल. त्यासाठी विद्यार्थ्याने निवड समिती/शासनास रितसर अर्ज करून मान्यता घेणे बंधनकारक राहील. अशा प्रकरणात संबंधित शैक्षणिक संस्थेची जागतिक क्रमवारी (QS World Ranking) त्यावेळी लागू असलेल्या शासननिर्णयाच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. मात्र अशा प्रकरणात विद्यार्थ्यास मिळणारा एकूण लाभाचा कालावधी त्यावेळी लागू असलेल्या शासननिर्णयाच्या मर्यादेतच दिला जाईल.

एकाच कुटुंबातील जास्तीतजास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेशप्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. एकदा किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केल्यावर विद्यार्थ्याच्या केवळ भविष्याच्या अनुषंगाने अधिक लाभ मिळू शकेल. यादृष्टीने त्या वर्षीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेची जागतिक क्रमवारी (QS World Ranking) गुणवत्ता क्रमवारी लक्षात घेऊन विद्यार्थांची गुणवत्तायादी बनवावी. दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची विद्यापीठाची क्रमवारी समान असल्यास अशा प्रसंगी त्यांच्या लगतच्या पदवी परीक्षेची गुणवत्ता लक्षात घ्यावी. कुटूंबाची उत्पन्नाची वार्षिक मर्यादा 8 लाख इतकी राहील, असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता विहीत निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा व क्यूएस वर्ल्ड रॅकिंगची (QS World Ranking) मर्यादा शिथिल करून विद्यार्थ्यांस परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल. तथापि, हा लाभ देताना उत्पन्नाची वार्षिक मर्यादा 8 लाखांपासून जास्तीतजास्त 10 लाखांपर्यंत शिथिल करण्यात यावी. तसेच (QS World Ranking)ची मर्यादा 200पासून पुढे चढत्या क्रमाने मंजूर पदे भरेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी. अल्पसंख्यांक विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीची विद्यार्थी संख्या 27वरून 75 एवढी करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Continue reading

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...

मोटोरोलाने लाँच केला ‘रेडी फॉर एनीथिंग’!

मोबाईल तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या मोटोरोलाने भारतात motorola edge50 Neo नुकताच सादर केला. मोटोरोलाच्या प्रीमियम एज स्मार्टफोन लाइनअपमध्ये सर्वात नवीन भर घालण्यात आली आहे, ज्यात शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आकर्षक, कमीतकमी डिझाइनचा समावेश आहे. ज्यात 'रेडी फॉर एनीथिंग' ही टॅगलाइन समाविष्ट आहे. हे उपकरण जास्तीतजास्त...
error: Content is protected !!
Skip to content