2019मध्ये LeadITचा प्रारंभ झाल्यापासून आंतरराष्ट्रीय अजेंड्यावर उद्योग संक्रमणाने मोठी झेप घेतल्यामुळे जागतिक औद्योगिक परिदृश्यात लक्षणीय बदल झाला. मात्र असे असले तरीही, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील संक्रमणाच्या खऱ्या आव्हानांना अद्याप सामोरे जाणे बाकी आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल सांगितले.

दुबईतील COP28 शिखर परिषदेत न्याय्य आणि समान उद्योग संक्रमणासाठी भागीदारी, या विषयावरील कार्यक्रमात बोलताना भूपेंद्र यादव यांनी या विषयावर सकारात्मक मत नोंदवले. हे आव्हान सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय यंत्रणांद्वारे हाताळले जाऊ शकते. या यंत्रणेने बौद्धिक संपदा अधिकार सारखे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे विकसित देशांकडून विकसनशील देशांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

उद्योग संक्रमण व्यासपीठावरील भारत-स्वीडन संयुक्त घोषणापत्र ही केवळ दोन राष्ट्रांमधील भागीदारी नसून शाश्वत भविष्यासाठी असलेली आघाडी आहे, असे स्वीडनसोबतच्या सहकार्याबाबत बोलताना ते म्हणाले. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याच्या आणि उद्योगांची पर्यावरणाशी सुसंगती साधून भरभराट होत असलेल्या जगाला आकार देण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाचा हा दाखला असल्याचे त्यांनी सांगितले.

भूपेंद्र यादव यांनी भविष्यातील उद्योगाला आकार देण्यासाठी नवोन्मेष, सहयोग आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी भागधारकांना एकत्र काम करण्याचे आवाहन करताना यादव म्हणाले की, एक असे उद्योगजगत हवे जे शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी समृद्धी आणणारे असेल.

