Homeपब्लिक फिगरसाहित्य पुरस्कार रद्द...

साहित्य पुरस्कार रद्द करण्याची कृती ही अघोषित आणिबाणी! 

साहित्य संस्कृती मंडळाच्या समितीनं उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी अभ्यासपूर्वक निवडलेल्या पुरस्कार्थीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करण्याची राज्य शासनाची कृती ही अघोषित आणिबाणी आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

साहित्य, कला, क्रीडासारखी सांस्कृतिक क्षेत्रं राजकारणविरहीत असली पाहिजेत, पुरस्कार्थींची निवड करणे किंवा निवड रद्द करण्यासारख्या बाबतीत सरकारचा हस्तक्षेप गैर व निषेधार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाचे 2021 या वर्षातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचे पुरस्कार 6 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाले. एकूण 33 पुरस्कार्थींची नावे जाहीर करण्यात आली. अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी (फ्रॅक्चर्ड फ्रीडमः तुरुंगातील आठवणी व चिंतन) जाहीर झाला. 6 तारखेला पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या 6 दिवसांत पडद्यामागे काही घटना घडल्या आणि 12 डिसेंबरला राज्य सरकारने शासन आदेश काढून साहित्य पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कारही रद्द केला. राज्य सरकारची ही कृती साहित्याच्या क्षेत्रात सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप आहे. अभिव्यक्ती स्वांतंत्र्य आणि लोकशाहीसाठी ही कृती मारक आहे, असे ते म्हणाले.

आम्हीही यापूर्वी अनेक वर्षे शासनकर्ते म्हणून जबाबदारी सांभाळली. परंतु साहित्य, कलेच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. तिथले निर्णय त्या क्षेत्रातल्या जाणकारांनी घ्यावेत, अशी भूमिका घेतली. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा शासनकर्ते म्हणून आदर केला.  झालेला पुररस्कार रद्द करण्याची घटना यापूर्वी आणीबाणीच्या काळात एकदा घडल्याचे ऐकिवात आहे. परंतु ती घोषित आणीबाणी होती. त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली. राज्यातील सध्याच्या सरकारने पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला आहे. या अघोषित आणिबाणीचा तीव्र निषेध करत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

सुरेश द्वादशीवार यांची निवडही रोखली

साहित्य क्षेत्रातील या सरकारचा हा पहिलाच हस्तक्षेप नाही. वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास निश्चित होती. परंतु त्यांचे भाषण सरकारला अडचणीत आणणारे ठरेल या भीतीने सरकारमधील घटकांनी संयोजकांवर दबाव आणून त्यांची निवड रोखली. अशा रितीने हे सरकार साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र निडर असून ते अशा दबावाला जुमानणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद बाविस्कर आणि आनंद करंदीकर यांनी जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय सरकारच्या कृतीचा निषेध करणारा आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रज्ञा दया पवार, कवयित्री नीरजा यांनीही साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचे राजीनामे सादर केले आहेत. सरकारसाठी हे लांच्छनास्पद आहे, असेही अजित पवार म्हणाले.

वर्ष २०१५ साली दादरी येथील अखलाखच्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर देशभरात पुरस्कार वापसीची चळवळ सुरू झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होत आहे. खरेतर यशवंतराव चव्हाण यांनी ज्या राज्याचा सांस्कृतिक पाया घातला त्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असे घडणे राज्याच्या प्रतिमेला साजेसे नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content