श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याचा मानस होता. परंतु माऊलींनीच बोलावल्यामुळे आळंदी येथेच माऊलींसह विठ्ठल दर्शन घडले. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. यानिमित्ताने आळंदीकरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
त्या पुढे म्हणाल्या की, संगीताच्या माध्यमातून अनेक तरुण मुले-मुली आध्यात्म आणि वारकरी संप्रदायाशी जोडली जात आहेत. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम यादृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. आपण सर्वजण गुरुकुल परंपरेतून वारकरी संप्रदायाची सेवा करत आहोत. माऊलींचे आपल्यावर आणि सरकारवरही आशीर्वाद आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार महायुती सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. विधानपरिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे माऊलींचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी विधानपरिषदेतून सातत्याने आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी पाठपुरावा केला. मीदेखील वैयक्तिक आणि शासनस्तरावर या कार्यासाठी प्रयत्नशील आहे. आपली बांधिलकी बळीराजाशी आहे. अलीकडील पूर, अतिवृष्टी व पीक नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. आळंदीच्या या आध्यात्मिक केंद्रातून त्याला सहकार्य, वात्सल्य आणि आपुलकीचा आधार मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत.
आजचे दर्शन माऊलींनी दिले असून आपण त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यास त्या सोडविण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमास आळंदी संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, कबीरबाबा, अॅड. रोहिणी पवार, प्रकाश वाडेकर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भक्तगण उपस्थित होते.