मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून आरे परिसरातील ७.२ किलो मीटरचा मुख्य रस्ता आता लवकर सिमेंट काँक्रीटचा होणार आहे.
वायकर यांनी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सिमेंट काँक्रीटच्या या नियोजित रस्त्याच्या कामासाठी तब्बल ४७ कोटी ७५ लाख रूपये खर्च येणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा रस्ता बांधण्यात येणार आहे. आरेतील अंतर्गत रस्तेही लवकरच सुस्थितीत करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
मुंबईच्या आरे परिसरातील मुख्य रस्ता, दिनकर देसाई मार्ग मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत गेल्यानंतर या मार्गावरुन सुखकर प्रवास करणे प्रवाशांना सोयीस्कर झाले. आमदार तसेच रविंद्र वायकर यांनी हा ७.२ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अशी विनंती केली होती. त्याला मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून आरेतील आदिवासींसाठी विशेष आयोजित केलेल्या वॅक्सीन ड्राईव्हच्या कार्यक्रमावेळी याबाबतची घोषणा केली. विविध पाडे तसेच वस्तींपर्यंत जाणारे आरेतील अंतर्गत रस्तेही लवकरच सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
गोरेगाव (पूर्व) येथील दिनकर देसाई मार्ग पूर्वी आरे प्रशासनाच्या ताब्यात होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने हा रस्ता वारंवार नादुरुस्त होऊन वाहतुकीसाठी गैरसोय होत होती. असे असतानाही या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांकडून आरे प्रशासन जबरदस्तीने टोल आकारत होते. या विरोधात आमदार वायकर यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली तसेच विविध आयुधाच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले होते.
या टोलवसुली विरोधात ३० सप्टेंबर २०११ रोजी जन आंदोलन करुन टोल बंद करुन हा रस्ता मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणारा हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत असल्याने हा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, यासाठी वायकर यांनी आदित्य ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीत आग्रहा मागणी केली होती.
दिनकर देसाई मार्ग- लांबी- ७.२ किलोमीटर, रुंदी- ९ मीटर, मार्गावर बांधण्यात येणार्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनची लांबी. १२०० मीटर.

