Homeपब्लिक फिगरब्लॅकमेल करुन भाजपाने...

ब्लॅकमेल करुन भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते, पण भारतीय जनता पक्षाने षडयंत्र करुन ते पाडले. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार यावे यासाठी केंद्र सरकारनेही जोर लावून अनेक आमदारांच्यामागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला, खोट्या तक्रारीत फसवण्यात आले. ब्लॅकमेल करुन भाजपाने महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे चोरांचे सरकार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

खा. मल्लिकार्जून खर्गे काल काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच मुंबईत आले होते. त्यांचा मुंबई काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगढी, नासिर हुसेन, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, कन्हैया कुमार, चरणजित सप्रा, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, भालचंद्र मुणगेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षाचा समाचार घेत मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आमदार खरेदी करून सरकार बनवले. आज भाजपाकडे तेच लोक आहेत ज्यांच्यावर भाजपानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्यात या भ्रष्ट लोकांना घालून ते स्वच्छ करतात. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण तुम्ही घाबरू नका, केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचे सरकार आहे. उद्या येथे येऊनही मोदी-शाह तेच म्हणतील, डबल इंजिनचे सरकार आहे. डबल इंजिनचे सरकार असू दे, नाहीतर आणखी चार बोगी लावा… पण जनहिताचे काम काय केले ते सांगा? ‘खोटं बोल पण रेटून बोल’, ही भाजपाची नीती आहे, सगळी जुमलेबाजी आहे.

देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, पण तुम्ही ते कुठुन देता? हे तर काँग्रेसने केलेले काम आहे. अन्नसुरक्षा कायदा काँग्रेसने दिला. रेशन दुकानांची व्यवस्था काँग्रेस सरकारनेच उभी केली. देशात अन्नाचा तुटवडा असायचा. पण काँग्रेस सरकारने हरित क्रांती आणली. धवलक्रांती आणली. म्हणून देशात धान्यांची गोदामे भरलेली आहेत. आज मोफत धान्य देत आहेत. पण एकेदिवशी मोदीजी हे मोफत धान्यसुद्धा बंद करतील, असे ते म्हणाले.

दलित, महिला, वंचित, मागास, अल्पसंख्याक लोकांना मी मुंबई, या ऐतिहासिक शहरातून संदेश देतो की, आपण सर्वांनी मिळून लोकशाही, संविधान वाचवायचे आहे. हे आपले कर्तव्य आहे. आरएसएस, भाजपा लोकशाहीला संपवून हुकूमशाही आणू पाहत आहेत. भाजपाने कितीही घाबरवण्याचे काम करू द्या… तुम्ही घाबरू नका, खंबीरपणे काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले हक्क व अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर भाजपाला सत्तेतून खाली खेचा, असेही खर्गे म्हणाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसची स्थापना याच मुंबई शहरात झाली व येथून स्वातंत्र्याची मशाल देशभरात गेली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारताकडे काहीच नव्हते. पण पं. जवाहरलाल नेहरुंच्या कुशल नेतृत्त्वामुळे देशाने प्रगती केली. आज केंद्रातील सत्ताधारी फक्त देश विकून देश चालवत आहेत. खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरू करताच दिल्लीतील सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच राहुल गांधी व पदयात्रेला भाजपा बदनाम करत आहे. आपले पूर्वज जसे इंग्रजांविरोधात लढले त्याच पद्धतीने आपल्याला आता भाजपाविरोधात लढायचे आहे. मुंबई महानगरपालिकेवर अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मागील काही वर्षांपासून ती आपल्याकडे नाही. पण पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आपण प्रयत्न करू.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, भाई जगताप, खा. इम्रान प्रतापगढी, कन्हैया कुमार यांनीही यावेळी जनतेला संबोधित केले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content