बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील भांडूप परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.
मात्र, या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी या प्रसूतिगृहाचे स्थलांतर हे भांडूप परिसरातच असणाऱ्या नजीकच्या “सुषमा स्वराज प्रसूतिगृह, लालबहादूर शास्त्री मार्ग, भांडूप” येथे करण्यात आले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुषमा स्वराज प्रसूतीगृह येथूनच आवश्यक त्या वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘एस’ विभागातील भांडूप (पश्चिम) येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहाची दुरूस्ती करण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार रूग्णांच्या सोयीसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहातील वैद्यकीय सेवा जवळच्या सुषमा स्वराज प्रसूतीगृह, लाल बहादूर शास्त्री, भांडूप येथून नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात द्वारे करण्यात आले आहे.