प्रिय वाचक,
किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.

किरण हेगडे, संपादक

प्रिय वाचक,

किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. किरण हेगडे, संपादक

Homeब्लॅक अँड व्हाईटबच गया साला…

बच गया साला…

या लेखातला फोटोच त्याचा आत्मा आहे. तीच तर त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद लुटणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी.. फोटो पाहताक्षणीच चित्रपटरसिकांच्या किमान तीन-चार पिढ्यांच्या डोळ्यासमोर आले असेल.. रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले”मधील क्रूरकर्मा गब्बरसिंगचे (अमजद खान)चे अतिशय विकृत गडगडाटी हास्य, जालीम नजर आणि प्रचंड खुनशी बोलणे… कितने आदमी थे?.. हे गब्बर विचारतो आणि मग जो त्याचा पिस्तूल घेऊन पडदाभरचा दहशतवाद सुरु होतो तो मुंबईतल्या मिनर्व्हाच्या भव्य सत्तर एमएमचा पडदा व स्टीरिओफोनिक साऊंड यात विलक्षण अक्राळविक्राळ वाटे. पन्नास वर्षांपूर्वी मिनर्व्हात हाऊसफुल्ल गर्दीत शोले पाहणाऱ्या चित्रपटरसिकांतील मीदेखील आहे… गब्बरसिंग तीन गोळ्या हवेत उडवतो आणि चित्कारतो, इस पिस्तूल मे तीन जिंदगी… तीन मौत बंद है… देखते है किससे क्या मिलता है… असे म्हणत तो एकेक करत त्या तिघांच्या कानावर पिस्तूल रोखतो. पहिल्याच्या कानावर पिस्तूल रोखतो. चाप दाबतो. पण त्यात गोळी नसते. ते पाहून गब्बरसिंग म्हणतो, बच गया साला…

एव्हाना तो सगळाच थरारक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आला असेलच. त्या तिघांतील एक कालीया म्हणजे विजू खोटे तर जो पहिलाच असतो त्याचे नाव मेजर आनंद. चेहरा ओळखीचा पण नाव माहित नाही असे अनेक कलाकारांबाबत घडते. असे अगदीच छोट्याछोट्या भूमिका साकारत असलेले अनेक चेहरे आपण रुपेरी पडद्यावर पाहतो. आणि मग कधीतरी त्याचे नाव माहित होते. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर गुगल सर्च, ही एक मोठीच गोष्ट आहे. पण त्यात सगळीच नावे व माहिती मिळेलच असे नाही. “शोले”च्या अफाट खणखणीत यशाने अनेक कलाकारांना स्टारडम दिला. मॅकमोहन त्यातलाच. तो चित्रपटसृष्टीत साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आला. पण सांभाने त्याला ओळख दिली. मेजर आनंदचा चेहरा मनात/डोक्यात फिट्ट बसला. पण नाव समजत नव्हते. अखेर ते हिंदी चित्रपटसृष्टीतूनच मिळाले.

त्याचे खरे नाव अमरजितसिंह आनंद. जन्म १० ऑगस्ट १९४१ रोजीचा. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्य़ातील पडरौना या गावातील. गोरखपूर येथील डीएवी शाळेत शिक्षण घेत असताना त्याला शाळेतील सांस्कृतिक गोष्टीत रस होता आणि तो फूटबॉलदेखिल उत्तम खेळायचा. उच्च शिक्षण त्याने प्रथम गोरखपूर विद्यापीठात आणि मग अलिगढ मुस्लिम विद्यापीठात घेतले. त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. १९६८ला तो भारतीय सैन्य दलात सामिल झाला आणि त्याची बंगलोर येथे पोस्टिंग झाली आणि आता तो मेजर आनंद झाला. बंगलोरजवळ (सध्याचे बेंगळुरू) फिरोज खान, संजय खान यांचा स्टड फार्म होता. ते तेथे गेल्यावर सैन्य दलाला भेट देत. अशाच एका भेटीत मेजर आनंदने संजय खानला सांगितले, मला चित्रपटात काम करण्यास आवडेल. प्रत्यक्षात ते किती व कसे अवघड आहे हे संजय खानने त्याला व्यवस्थित समजावून सांगितले. पण “पिक्चरचं येड” असलेला कधी शांत बसतो काय? मेजर आनंद लहानपणापासून सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये टाळ्या-शिट्ट्यांनी चित्रपट एन्जाॅय करीत असे. राजेश खन्नाचा तो विलक्षण चाहता. सिनेमाचे वेड स्वस्थ बसू देत नसल्याने तो खरोखरच मुंबईत आला व संजय खानच्या जुहूच्या बंगल्यावर पोहोचला. संजय खान तेव्हा “चांदी सोना” या चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची तयारी करत होता. मेजर आनंदला करारबद्ध करत त्याने त्याचा हुरुप वाढवला. (हा चित्रपट १९७७ साली मुंबईत प्रदर्शित झाला). मेजर आनंद आता मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माता व दिग्दर्शकांना भेटू लागला. अनेक ठिकाणी त्याला “मिलते रहो” असे फिल्मी आश्वासन मिळाले तर कुठे छोटेछोटे रोल मिळालेही. त्या काळात अशा धडपड्या अर्थात स्ट्रगलर नवीन कलाकारांनी दोन-चार वृत्तपत्र वा साप्ताहिकात आपले एखादे छायाचित्र व थोडक्यात माहिती प्रसिद्ध करुन आणणे खूप महत्त्वाचे मानले जाई. चित्रपटविषयक साप्ताहिकात तशी प्रसिद्धीही मिळत असे. गोष्ट खूपच छोटी वाटते, पण खूपच महत्त्वाची आहे.

मेजर आनंदचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता, रामसे बंधुंचा हाॅररपट “अंधेरा”. तो मुंबईत १ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात चक्क सात खलनायक होते. त्यात एक मेजर आनंद होता. त्याचदिवशी उत्तर भारतात त्याची अशीच छोटी भूमिका असलेला “मेरा वचन गीता की कसम” प्रदर्शित झाला. तुम्हालाही माहित्येय १५ ऑगस्ट १९७५ रोजी मुंबईत शोले पडद्यावर आला. तो आजही सुरुच आहे. या यशाने मेजर आनंद देशविदेशातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिला. पण चित्रपट धो धो चालत असला तरी त्यातील कामाचे पैसे मात्र एकदाच मिळालेले असतात. मेजर आनंदला आणखीन चित्रपट मिळत जाताना अर्थकारण अवघड जात होते. त्रिमूर्ती (जुना), कलाबाज, देवता, भयानक, जख्मी इन्सान, अब्दुल्ला (हा संजय खानचाच चित्रपट), डायल 100, हमसे है जमाना, पहरेदार, कानून मेरी मुठ्ठी मे, इतनी जल्दी क्या है, आखरी बाझी वगैरे वगैरे..

अनेक चित्रपटांतून लहानमोठ्या भूमिका साकारत साकारत त्याने वाटचाल केली. काही भूमिकांना चेहराही नव्हता. अगदी राजेश खन्नाची भूमिका असलेल्या शक्ती सामंता दिग्दर्शित “आवाज” या चित्रपटातही काम केले. पण दुर्दैव असे की, राजेश खन्नासोबतच्या दृश्यात संधी मिळाली नाही. मालिकांच्या काळात त्याने “और ढोल बजने लगा” या मालिकेत काम केले. या एकूणच प्रवासात त्याने ज्युली नावाच्या युवतीशी लग्न केले. मग मुंबईतच सात बंगला येथे भाड्याच्या घरात संसार थाटला. सीमा व दिशा अशा दोन मुलीही झाल्या. पण म्हणावा तसा पैसा हाती येत नव्हता. कुतरओढ होत होती. कालांतराने चित्रपटात कामे मिळणेही अवघड होत गेले. एकेदिवशी त्याने निर्णय घेतला आणि चित्रपटसृष्टी सोडून तो इस्टेट एजंट झाला आणि काही वर्षांतच सात बंगल्यातील त्याच इमारतीत स्वत:च्या मालकीचे घर घेतले. चित्रपटसृष्टीतील हेदेखील एक वास्तव. कालांतराने ३ सप्टेंबर २०२० रोजी त्याचे निधन झाले.

“शोले” पुन्हा पुन्हा अनेकदा पाहत असलेल्या प्रत्येकाने लेखासोबतचा फोटो पाहताक्षणीच त्यांना आठवले असणारच.. हाच तो घाबरत घाबरत गब्बरसिंगची खुनशी नजर चुकवण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारा… आता आपल्या नजरेत राहिलीय फक्त तो आणि त्याचा तो थरथर कापत असलेला, घाबरलेला चेहरा आणि त्यातच हसण्याची व्यर्थ धडपड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

द्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा हुकमी चाहतावर्ग असलेला चतुरस्र लेखक!

पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे. त्यांना ते पटकन कसे सुचते आणि ते अनेक उपमा, अलंकार, अनेक जुने-नवे संदर्भ देत देत...

कणेकर, तुम्ही कायम लक्षात राहाल…

अरुण पुराणिक यांचा फोन आला. अंधेरीतील माझ्या घरी शिरीष कणेकर येताहेत. गप्पांची मस्त मैफल जमवूयात... हे ऐकेपर्यंत मी मनाने तेथे पोहोचलो होतोच. कणेकर त्यांचे सहकारी उज्ज्वल वाडकर यांच्यासोबत आले. पण आश्चर्य वाटत होते ते, खास कोकणातून दूरवरचा प्रवास करीत काही...

गिरगावात ‘बत्तीजवळ’! म्हणजेच २८, खोताची वाडी!!

आपण लहानाचे मोठे होत जाताना आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसं, वातावरण, वास्तू  यांच्याशी असं आणि इतकं एकरुप होतो की ते सगळेच आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. काहींच्या बाबतीत तर ते सगळेच आयुष्यभरची साथसंगत असते, तर कोणी त्या सर्वच आठवणींवर पुढचे...
Skip to content