शिवतीर्थ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजीपार्क मैदानाचे ‘शिवतीर्थ’ हे नामकरण केले. 30 ऑक्टोबर 1966च्या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याचा शुभारंभ बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावर केला होता. त्याच शिवतीर्थावर एप्रिल 1980मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ अशी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनासभेत भविष्यवाणी केली होती. ‘कमळ’ हे अटलबिहारी वाजपेयी यांचं आवडतं.. आणि वाजपेयी यांच्या या आवडत्या ‘कमळ’लाच भारतीय जनता पक्षाने निवडणूकचिन्ह बनवलं. ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ ही वाजपेयी यांची भविष्यवाणी 2014मध्ये खरी ठरली आणि लोकसभेच्या 543 जागांमधून 282 ‘कमळं’ उगवली. खरे पाहता भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट बहुमताचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली 2014 साली भारतात आले, ही अटलबिहारी वाजपेयी यांचीच देणगी होती.
पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी हे एक व्यक्तिमत्व. ‘वीर अर्जून’ या दैनिकातून पत्रकारिता सुरू करणारे अटलजी खऱ्या अर्थाने अर्जुनासारखे वागले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसमवेत अटलजींनी सार्वजनिक व राजकीय कार्याचा श्रीगणेशा केला. वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक! भारतीय जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कुशल नेतृत्त्व त्यांनी केलं. सर्वस्पर्शी असं त्यांचं व्यक्तिमत्व. कवी म्हणून त्यांची ख्याती. गेल्या काही दिवसांत त्यांच्या सर्व कविता सर्वतोमुखी झाल्या. एक प्रभावी वक्ता जो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात आपलंसं करीत असे.
पं. जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान असताना समाजवादी साथी बॅ. नाथ पै आणि भारतीय जनसंघाचे वाजपेयी ही अमोघ वक्तृत्व असणारी जोडी भारताच्या संसदेत होती. नाथ पै आणि वाजपेयी जेव्हा सभागृहात बोलायला उभे राहत तेव्हा पंडित जवाहरलाल आवर्जून सभागृहात त्यांची भाषणे ऐकायला धावत येत असत. पंडित नेहरु यांनी त्या तरुण वाजपेयींकडे पाहून “यह भारत का प्रधानमंत्री बन सकता है!” अशी भविष्यवाणी केली होती. ती खरी ठरली.

1971 साली भारताने पाकिस्तानशी युद्ध करुन बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे वाजपेयी यांनी इंदिराजींना ‘दुर्गा’ म्हणून गौरविले. पण हीच ‘दुर्गा’ 1974च्या नवनिर्माण आंदोलनानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण व तमाम विरोधी नेत्यांच्या मुळावर उठली आणि 25 जून 1975 रोजी आणिबाणी लादत त्यांनी जयप्रकाश, मोरारजी, अटलबिहारीजी, अडवाणी, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस अशा तमाम विरोधी नेत्यांना तसेच मोहन धारिया, चंद्रशेखर, कृष्णकांत या तरुणतुर्क काँग्रेस नेत्यांना तुरुंगात डांबले. 19 महिन्यांच्या आणिबाणीच्या काळात सर्व विरोधकांनी तुरुंगात चर्चा केली आणि मतभेदाचे 10 टक्के बाजूला ठेवून 90 टक्के मतैक्य साधत जनता पार्टीची मुहूर्तमेढ रोवली. इंदिराजींना कल्पना आली होती. त्यांनी आणिबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका 20 जानेवारी 1977 रोजी जाहीर केल्या.
`संपूर्ण क्रांती अब नारा है, भावि इतिहास हमारा है’, `जनता आयी है, सिंहासन खाली करो’ अशा बुलंद घोषणा देत जनता पार्टी सत्तेवर आली. जनता पार्टी स्थापन होऊन निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना या प्रचारासाठी वाजपेयी यांनी अक्षरश रान उठवले होते. अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर अटलजींची सभा दणदणितपणे पार पडली. आम्ही तरुण कार्यकर्ते त्यांच्या स्वागतास होतो. वडिल वसंतराव त्रिवेदी हे पदाधिकारी होते. त्यांनी `आहुति’ साप्ताहिकाचा खास अंक प्रकाशित केला. त्या अंकाच्या घड्या अटलजींनी आपल्या जाकीटातल्या खिशात टाकल्या. `जनसंघ की नैया हमने डुबो दी है’, असे ठासून सांगत `अभी हमारा जो कुछ है वह जनता पार्टी में ही है।’ असे ठणकावून सांगितले. जनता पार्टी सत्तेवर आली. मोरारजी पंतप्रधान बनले आणि अटलजी परराष्ट्रमंत्री..
अटलजींनी परराष्ट्रमंत्री या नात्याने संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत केलेले भाषण हा गौरव मानला गेला. त्यानंतरही त्यांना नरसिंहराव यांनी जिनिव्हाला पाठवले. तेथेही त्यांनी छाप पाडताना पाकिस्तानला तोंडात बोटं घालायला लावली. परराष्ट्रमंत्री असताना अटलजींनी चीन दौरा केला तेव्हा मराठी पत्रकार म्हणून माधवराव गडकरी हे त्यांच्यासमवेत चीनला गेले होते आणि माधवरावांनी हे अनुभव ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या अंबरनाथ अभ्यास शिबिरात सांगितले होते.

शिवसेना आणि भाजपा हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले आणि प्रमोद महाजन व अटलजी यांचे बाळासाहेबांबरोबरचे संबंध अगदी कौटुंबिक झाले. शिवसेना भाजपाबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामिल झाली आणि अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या काळात सुरेश प्रभू शिवसेनेचे पहिले केंद्रीय मंत्री झाले. आज ते भाजपात आहेत. अनंत गीते, बाळासाहेब विखे पाटील, डॉ. मनोहर जोशी, आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे मंत्री केंद्रात वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होते. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार 1995च्या मार्चमध्ये अधिकारारुढ झाले तेव्हा अटलजी आणि अडवाणी यांचे खास सौहार्दाचे, सलोख्याचे संबंध आणि त्यामागे युती टिकण्यासाठी अटलजी बाळासाहेब मैत्री कारणीभूत ठरली.
मोदी पंतप्रधान झाले तेही अटलजींमुळेच
भारतातून नाराज होऊन नरेंद्र मोदी अमेरिकेत निघून गेले होते. वाजपेयी असेच एकदा न्यूयॉर्कला गेले आणि त्यांना नरेंद्र मोदी अमेरिकेत असल्याचे कळले. तेव्हा अटलजींनी नरेंद्र मोदींना बोलावून घेत, ‘तुम्हारा यहां काम नहीं, तुम दिल्ली चले आओ, वहां तुम्हारा काम है’, असे सांगितले आणि नरेंद्र मोदी भारतात परतले. तेथून 2001 साली मोदींना वाजपेयींनी गुजरातचे नेतृत्त्व करण्यासाठी गुजरातला पाठवले. 12 वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी 2013 साली भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले आणि 2014च्या 26 मे रोजी ते भाजपाच्या 282, या स्पष्ट बहुमतावर एनडीएची सत्ता आणून पंतप्रधान बनले.
2002ला गुजरातला दंगल झाली आणि पंतप्रधान अटलजींनी नरेंद्र मोदी यांना राजधर्मची आठवण करुन दिली ती त्यांनी मानली. त्याचवेळी मोदी यांना हटविण्याचा विचार वाजपेयी यांनी केला होता. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा बाळासाहेबांनी `नरेंद्र मोदी गया समझो गुजरात से भाजपा गया’ असे सांगून मोदी यांना वाजपेयींकडून अभय मिळवून दिले. महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना 1997 साली अटलबिहारी वाजपेयी आणि ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या शुभहस्ते आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आमच्या मातोश्री मनोरमाबेन त्रिवेदी यांचा सत्कार ही आमच्या दृष्टीने अमूल्य भेट होती.
अटलजी आणि बाळासाहेब यांच्या मैत्री आणि गप्पांचे किस्से अनेक ऐकायला मिळतात. त्याच काळात दहिसर येथील डॉ. प्रवीण भाटिया शिवसेना विभागप्रमुख, उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासमवेत मातोश्री येथे गेले आणि बाळासाहेब तसेच अटलजींनासुध्दा डॉ. प्रवीण भाटिया यांनी `रेकी’ या वैद्यकीय शास्त्राद्वारे उपचार दिले होते. अटलजींवर ग्रंथ निघतील, अंक निघतील, पुरवण्या निघतील आणि ते अवश्य निघावेत. त्यांच्या साहित्यसंपदेचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ठेवा जतन करावा. केंद्रात आणि राज्यात भाजपाप्रणित सरकार आहे. ते अटलजींच्या स्मृती जतन करतील यात वाद नाही. अटलजींना विनम्र अभिवादन!

