Monday, December 23, 2024
Homeटॉप स्टोरीअखेर मुंबई महापालिकेला...

अखेर मुंबई महापालिकेला जाग आली!

अखेर ३३ हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प मांडणाऱ्या मुंबई महापालिकेला जाग आली. कोरोना लाटेला तब्बल वर्ष उलटल्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या १२ रूग्णालयांत ऑक्सिजनचे एकूण १६ प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. वातावरणातील हवेतून (ऑक्सिजन) प्राणवायू तयार करणाऱ्या या प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्याअसून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण महिन्याभरात हे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कोविड-१९ विषाणू बाधेमुळे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर मुख्यत्वाने प्राणवायू पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, मुंबई महापालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्‍धतेबाबत कायमस्‍वरुपी उपाययोजना म्‍हणून एकूण १२ रुग्‍णालयांमध्‍ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प (प्‍लांट) उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यात येईल. या सर्व १६ प्रकल्‍पांतून मिळून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार असल्‍याने प्राणवायू पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्‍व कमी होण्‍यासही मदत होणार आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

प्राणवायू प्रकल्‍पांची आवश्‍यकता

कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्‍यांना सातत्‍याने आणि अधिक क्षमतेने (लीटर प्रति मिनीट) प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवावा लागतो. यामुळे देशभरातील रुग्‍णालयांकडून प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्राणवायू उत्‍पादक आणि वाहतूकदारांच्‍या क्षमता व मर्यादा लक्षात घेता तसेच प्राणवायू उत्‍पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्‍या मर्यादा पाहता मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना सरकार, प्रशासन यांची कसरत होत आहे. या सर्व स्‍थ‍ितीला मुंबईदेखील अपवाद नाही. वेळप्रसंगी प्राणवायू पुरवठ्याअभावी कोविडबाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागले आहे.

निम्म्या किंमतीत ऑक्सिजन

प्राणवायू पुरवठादारांकडून जंबो सिलेंडरद्वारे मिळणाऱ्या प्रती लीटर प्राणवायू खर्चाशी तुलना केली तर त्‍याच्‍यापेक्षा अर्ध्‍याहून अधिक कमी दराने या प्रकल्‍पांमधून प्राणवायू निर्मिती होईल. हे प्रकल्‍प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे संचालित राहू शकतात. परिणामी महानगरपालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहेत.

यापूर्वीही यशस्वी झाले आहेत असे प्रयोग

यापूर्वीही मुंबई महापालिकेने असे यशस्वी प्रयोग केले होते. मात्र, यानंतरही महापालिका सुस्त राहिली. मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारला आहे. तर जोगेश्‍वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्येदेखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्‍प उभारला आहे. या दोन्‍ही रुग्‍णालयांतील प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प व्यवस्थित कार्यरत असून कोविड-१९ संसर्गाच्‍या काळात ती अत्यंत मोलाची ठरत आहेत. हे दोन्‍ही प्रकल्‍प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत.

नवीन प्राणवायू निर्मिती प्रकल्‍पांविषयीः

महापालिकेच्‍या १२ रुग्‍णालयांमध्‍ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याची कार्यवाही सुरू झाली आहे. वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती (पी.एस.ए.) तंत्राद्वारे जागेवरच (ऑनसाईट) प्राणवायूची निर्मिती (ऑक्सि‍जन जनरेशन) करणारे हे प्रकल्‍प (प्‍लांट) असतील. निविदा प्रक्र‍िया पूर्ण होवून कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महि‍न्‍यात हे प्रकल्‍प उभारले जातील. या सर्व १६ प्राणवायू प्रकल्‍पातून मिळून प्रतिदिन अंदाजे ३३ हजार घनमीटर (सुमारे ४३ मेट्रिक टन) इतका प्राणवायू साठा निर्माण करणे शक्‍य होणार आहे. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या प्रकल्‍पातील संयंत्रांचे आयुर्मान किमान १५ वर्षे असते. या संयंत्रातून निर्माण होणाऱ्या प्राणवायूचा प्रती घनमीटर दर हा द्रव स्‍वरुपातील प्राणवायूच्‍या (लिक्विड ऑक्सिजन) दराइतकाच आहे. जंबो सिलिंडरशी तुलना करता त्‍याच्‍या अर्ध्याहूनही कमी आहे. त्यामुळे महानगरपालिकेची भविष्यात मोठी आर्थिक बचत देखील होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

असा तयार होणार प्राणवायू..

हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्‍स‍िजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्वाभाविक आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना प्राणवायू पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फिल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात.

या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहि‍न्‍या/पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो. या प्रकल्पाची अनुषंगिक कामे प्रभावी पद्धतीने करण्यासाठी उपायुक्त (विशेष) संजोग कबरे आणि प्रमुख अभियंता (यांत्रिक व विद्युत) कृष्णा पेरेकर काम करणार आहेत.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content